ती
मोरपीस
ती माझ्या आयुष्यात विशिष्ट दिवशी किंवा प्रसंगी आली असं नाही घडलं,पण माझं लक्ष तिनं वेधून घेतलं होतं . शाळेत आठवी ते अकरावी अशी चार वर्ष ती आमच्या वर्गात होती .असे असले तरी ती वर्गमैत्रिण होती असं नाही म्हणता येत . माझ्या वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे सातव्या इयतेपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या शाळेत शिकणारा मी आठवीसाठी तालुक्याच्या गावातील शाळेत आलो होतो . पण इथे आल्यानंतर एक मोठा फरक जाणवला तो म्हणजे वर्गातील मुलंमुली एकत्र बोलत नव्हती . त्यापूर्वीच्या शाळेत आम्ही मुलंमुली एकत्र शाळेत जायचो .आणि खेळायचो सुद्धा . अर्थात ते वय ही मुलींकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचे नव्हतेच .
सत्तेचाळीस वर्षांपुर्वीचे ते गावातले वातावरण विशेषतः मुलींसाठी बंधनात जगण्याचेच होते . त्यामुळे वर्गातल्या मुलींशी बोलणे तर दूर पण पाहणेही व्हायचे नाही .पण तरीही ती वर्गात आहे आणि इतर मुलींपेक्षा हुशार आहे हे माहित होते. किंबहुना तिची अभ्यासातील हुशारी आणि परीक्षेत येणार पहिला किंवा फार तर दुसरा नंबर हा तिचा गुण त्यामुळे ती लक्षवेधी होती
आठवी नववीची वर्षे तशी बालपणीची असली तरी दहावी आणि अकरावीची वेगळी होती. मुलींबद्दल आकर्षण निर्माण होण्याचे ते वय होते. आता हे लक्षात येऊ लागले होते की , ती फक्त हुशार नव्हे तर खूप सुंदरही आहे. वर्गात असलेल्या इतर सर्व मुलींपेक्षा ती हुशार आणि सुंदर होती त्यामुळे ती वेगळी होती. सारखेच तिच्याकडे पाहावेसे वाटायचे,पाहायचोही, पण …. तिच्या नकळत आणि हळूच. कारण थेट पाहणे त्या काळात आगाऊपणाचे होते .
ती आता मला आवडायला लागली होती. खूपच आवडत होती. तिला भेटावे, बोलावे असे वारंवार वाटे पण ते अशक्य होते.
ती मात्र अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सर्व परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवीत होती. लवकरच आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय असं नव्हतं.
वर्गातल्या अनेक मुलांना ती आवडत होती. सर्व जण फक्त तिच्याबद्दलच बोलायचे. त्यावरून एक लक्षात आले की , तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा मी एकटाच नव्हतो. अर्थात ती होतीच तशी कोणालाही आवडण्यासारखी.
पुढे अकरावीची परीक्षा झाली आणि ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली. त्यामुळे तिच्याशी कधीच काही बोलणे झाले नाही. पण तरीही ती मनातून नव्हतीच गेली. मनात एक कायम स्वरूपी जागा तिने व्यापली होती. त्यावेळेपर्यंत मी पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी तीच होती. त्यामुळे कथा कादंबऱ्या वाचताना सौन्दर्याचे वर्णन आले कि तीच डोळ्यासमोर यायची.
नंतर शिक्षण, लग्न , नोकरी हे सगळे झाल्यानंतरही तिचा विसर कधीच पडला नाही. त्यामुळे बरेच प्रयत्न केल्यानंतर तिच्याशी पुन्हा संपर्क करण्यात यश आले पण ते तब्बल ४७ वर्षांनी मे २०२० मधे. आता मी आणि तिने वयाची साठी ओलांडली असल्याने मानसिकतेत खूप बदल झालेत. तिच्याशी पुन्हा परिचय देऊन बोलणे सुरु झाले आणि आणि अगदी अनपेक्षित प्रतिसाद तिच्याकडूनही मिळाला. हळूहळू तिच्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतर तिच्याबद्दलच्या माझ्या मनातल्या सर्व भावना मी मोकळेपणी तिला सांगितल्या. ती मला त्यावेळी आवडायची व मी तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचो हे ऐकून तिला आश्चर्य तर वाटलेच पण आनंदही झाला. त्यामुळे मीही खूप खुश झालो आणि आहे.
माझ्या लक्षात आलेल्या फक्त दोनच गोष्टी तेव्हा तिच्याकडे होत्या. सौन्दर्य आणि बुद्धिमत्ता ! पण आता संवाद वाढलाय. फोनवर बोलून आणि chatting च्या माध्यमातून मी तिच्या खूपच जवळ गेलोय. जसजसा तिच्याशी संवाद वाढला तसतशा तिच्याबद्दलच्या अनेक चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या. आणि ती आणखी आवडू लागलीआणि मनापासून तिच्यावर प्रेम करू लागलो. अगदी माहिती असूनही कि
या मैत्रीपूर्ण प्रेमाला, नात्याला फक्त
आणि आमचे मैत्रीपूर्ण नाते बहरू लागलेय. तिनेही मनापासून प्रतिसाद दिलाय.
मी एवढ्या वेळा तिच्याशी संवाद करतो तेव्हा प्रत्येक वेळी ती आनंदीच असते. तिचे अनेक गुण पाहून मी प्रभावित झालो आणि तिच्या आणखी आणखी प्रेमात पडू लागलोय. तिच्याशी संवाद हा माझा आनंदाचा भाग झाला आहे. एवढ्या मोठ्या कालखंडानंतर ती पुन्हा माझ्या आयुष्यात येणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. खरं तर माझी एवढी अपेक्षाच नव्हती. पण तिने मला भरभरून आनंद दिलाय,देतेय.
तिची पुन्हा भेट हे माझ्या मनात जीवापाड जपलेले ” मोरपीस “……
पूर्ण झाले आणि फुलले …. मी तृप्त आणि आनंदी आहे….
आज मी तिला अगदी सहज ” आय लव्ह यु ” म्हणू शकतो कारण त्यामागे कोणतीही अपेक्षा नाही.
गौतम बुद्धांचे एक सुंदर उदाहरण …. त्यांना कोणी तरी विचारले…..
What is the difference between I like you and I love you
Beautiful answer by buddha,
When you like a flower,you just pluck it but
When you love a flower,you water it daily.
“ One who understand this understands life “
माधुरी जोशी
https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील कविता






सुंदर
सुरेख
Waahwaa