जोशी काकूंची डोअरबेल वाजली. एकदा नाही, दोनदा.. तीनदा.. चारदा.. काकू देवपूजेतून उठून बाहेर येऊन बघतात तर कोणीच नाही. चिडल्या आणि बडबडल्या,
” या नक्की अन्वी अनुश्री असणार, वैताग आणला नुसत्या या दोन्ही कारट्यांनी ,आता तक्रारच करते यांची सोसायटीमध्ये “.
अन्वी अनुश्री, दोन मैत्रिणी, इयत्ता सहावी, दोघींचाही स्वभाव एकसारखा, खोड्या करण्याचा तेवढाच चिकित्सक आणि ओरडे खाण्याचा. म्हणूनच त्यांची लहानपणीपासूनची मैत्री अजूनच घट्ट झाली. आता दोघी मिळून उपद्वाप करायच्या. तसा अभ्यास पण करायच्या.
सोसायटी सोबतच शाळेत पण यासाठी कु प्रसिद्ध होत्या. कितीतरी वेळा त्यांच्या पालकांना निस्तरावे लागले. त्यांच्या खोड्यांची यादी बघा.. जाता येता कोणाच्याही दाराच्या बाहेरून कड्या लावणे, शाळेतली इन्व्हर्टरचे बटन बंद करणे, वॉशरूमला जायच्या बहाण्याने शाळेची घंटा वाजवणे, (तास चालू असताना) टाइमपास म्हणून शाळेच्या वाचनालयात जाऊन तिथल्या लोकांच्या वागण्याच्या नकला करत बसणे आणि खूप खूप ..
भीती हा शब्द तर फिरकत नव्हता त्यांच्याजवळ.
एकदा अशाच लायब्ररीमध्ये गेल्या, पुस्तके नुसते इकडचे तिकडे खोचून ठेवायचे. याच भानगडीत त्यांच्या हाती एक पुस्तक लागलं.
हॉंटेड गेम्स
दोघींनी चमकून एकमेकींकडे पाहिले. झालं माकडाच्या हातात आयतेच कोलीत लागलं. चुपचाप ते पुस्तक शाळेच्या दप्तरातून घरी आलं. आता वेळ मिळाला तेव्हा त्या दोघी सोसायटी पार्किंग, बागेत बसून ते पुस्तक चाळून काढीत आणि ठरलं हॉंटेड गेम खेळायचा. वयाच्या मानाने जरा जास्तच उडी मारली त्यांनी.
दोघींनी मिळून चार्ली गेम खेळायचे ठरवले. त्या खेळाचे काही नियम होते. जसे, हा गेम अमावस्येच्या रात्री बाराच्या नंतर खेळायचा असतो.
आता मोठा प्रश्न की खेळायचा कुठे? दोनच ऑप्शन एक तर अन्वीकडे नाही तर अनुश्रीकडे . पण घरच्या लोकांना काय सांगायचं ? आणि खरं सांगितलं तर कोण त्यांना परवानगी देतील?आता त्यांना संधी हवी होती घरात कोणीही नसण्याची आणि लवकरच अशी वेळ चालून आली. अनुश्रीचे आई-बाबा कुठेतरी परगावी जाणार होते. घरात एक मोठी बहीण, फार मोठी नाही बारावीत.
अन्वीने अनुश्रीकडे एक रात्र तिच्या सोबत राहण्याची घरून परवानगी मिळवली. दोन्ही कुटुंब एकमेकांचे परिचयाचे असल्याने काही आढेवेढे घेतले नाही दोघींची उत्सुकता शिगेला पोचली होती. दोघी बाहेरच्या खोलीत होत्या. बहीण आत झोपली होती. यांनी इकडे जय्यत तयारी करून ठेवली. म्हणजे एक पेपर, दोन पेन्सिल, मेणबत्ती. थोडी वातावरण निर्मिती. आणि हो या दोघींसोबत अनुश्रीच्या घरचे एक काळ्या रंगाचे पेट डॉग होते. गेमची मांडणी अशी, एक कोरा कागद घ्यायचा त्यावर दोन पेन्सिली अधिकच्या चिन्हा सारख्या ठेवायच्या त्याचे चार भाग होतील पेपरवर एका भागात yes दुसऱ्या भागात No असे लिहायचे. म्हणजे दोन yes, दोन No.पेन्सिल षटकोनी शेपच्या निवडल्या, मुद्दामूनच,गोल असत्या तर एकमेकावर क्रॉस मध्ये बसणार नसत्या म्हणून. खिडक्यादारे बंद, पडदे टाकले. लाईट पंखा बंद फक्त मेणबत्तीचा उजेड.
आता चार्लीला एक एक प्रश्न विचारायचा डोळे बंद करून. एक प्रश्न तीनदा विचारायचा. दोघी समोरासमोर बसल्या एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले.
पहिला प्रश्न : चार्ली चार्ली आर यु हियर ? तीन वेळेस . तिसऱ्यांदा विचारल्या बरोबर आणि अन्वीने एकदम डोळे उघडले तर….. तर पेन्सिल हळूहळू Y कडे फिरत होती.
भीतीयुक्त उत्सुकता दोघींच्या डोळ्यात दिसत होती. शेरी (पेट डॉग) कोपऱ्यातल्या टेबलाखाली शांतपणे झोपली होती. अनुश्रीने पेन्सिली पुन्हा पहिल्यासारख्या केल्या.
प्रश्न दुसरा : चार्ली चार्ली कॅन वी प्ले धिस गेम ?तीन वेळेस .
या वेळेस घाबरून अन्वीने डोळे उशिरा उघडले. पेन्सिल Y वर सरकली होती. सहज घेतल्या गेलेल्या खेळाची गंभीरता आता त्यांना वाटायला लागली.
प्रश्न तिसरा : चार्ली चार्ली डू यू वॉन्ट टू हर्ट अस ?
प्रश्न चौथा : चार्ली चार्ली इज देअर बॅड स्पिरिट हियर विथ यु ?
असे कुतूहलापोटी दोघी मनाला आले ते प्रश्न विचारू लागल्या.
आता शेवटचा प्रश्न विचारायचा ठरले. रात्र बरीच झाली होती. अनुश्रीची बहीण जागी व्हायच्या आत सगळं आटपायचं होतं.
चार्ली चार्ली कॅन यु शो युवरसेल्फ टू अस राईट नाऊ?
तीन वेळेस.
यावेळी पेन्सिली हलल्या नाहीत.
दोघी एकमेकींकडे अचंबित होऊन बघत होत्या.
थोड्यावेळाने जोरजोऱ्याने आणि मोठ्याने श्वास घेण्याचा पुरुषी आवाज येत होता आणि शेरी उलट दिशेला असणाऱ्या दाराच्या कोपऱ्यात बघून जोरजोरात भुंकत होती.
…. मोहिनी शैलेश पाटनुरकर










उत्कंठा वर्धक कथा
उत्सुकता वाढवणारी उत्कंठावर्धक कथा