थोडंसं आकाश
शांतपणे मोठी होणारी माझी मुलगी
मुली कधी मोठी होतात हे आईला कधी कळतच नाही.
कालपरवाच हातात धरलेलं माझं चिमुकल बाळ… कधी माझ्या पेक्षा जास्त समजूतदार झालं, हे माझ्या लक्षातही आल नाही.
माझी मुलगी सेजल अशीच …
लहानपणापासूनच गोड, प्रेमळ आणि मनाने खूप कोमल.
ती फार बोलकी नव्हती, पण तिच्या डोळ्यांत सतत काहीतरी चाललेलं असायचं.
घरातलं वातावरण नेहमी खूप आनंदाचं असायचं असं नाही.
कधी आर्थिक चिंता, कधी घरातील मतभेद, कधी न बोललेली नाराजी…
ती सगळं पाहत होती.
“ती कधी माझ्या जवळ बसायची, शांतपणे माझं बोलणं ऐकायची.
कधी कधी मला असं वाटायचं —
माझ्या आयुष्यात अपूर्ण राहिलेली स्वप्नं जणू तिच्या रुपात पुन्हा उभी राहिली आहेत.”
मी आई म्हणून रोज धडपडत होते.
घर सांभाळणं, जबाबदाऱ्या निभावणं, मनातल्या इच्छा बाजूला ठेवणं…
मला नेहमी वाटायचं —
जीवनात मला जे मिळालं नाही, ते माझ्या मुलीला मिळावं.
ती माझ्याकडे खूप लक्ष देऊन बघायची.
मी थकलेली असले तरी हसण्याचा प्रयत्न करायची… आणि ती सर्व शांतपणे हे पाहायची.
कदाचित त्याच वेळी तिच्या मनात एक जिद्द जन्माला आली.
ती लहान होती, पण एकदा म्हणाली होती —
“आई, मी मोठी झाल्यावर खूप काम करेन.
मी तुला कधीच रडू देणार नाही.”
त्या वेळी मी हसून टाळलं.
पण आज वाटतं —
त्या छोट्या वाक्यात तिचं संपूर्ण आयुष्य दडलेलं होतं.
माझ्या मुलीच्या हातात नेहमी पेन्सिल असायची.
ती कागदावर काहीतरी काढत बसायची.
कधी एखादी स्वप्नाळू मुलगी,
कधी उडणारे पक्षी,
कधी रंगीबेरंगी जग…
एक दिवस ती माझ्याकडे धावत आली.
“आई, तुला माहिती आहे का?
चित्रं जिवंत करता येतात!”
मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.
ती उत्साहाने सांगू लागली —
“त्याला ॲनिमेशन म्हणतात.
मोठ्या शहरात शिकवलं जातं.”
तिच्या डोळ्यांत त्या वेळी इतकी चमक होती की मला वाटलं —
हेच तिचं खरं स्वप्न आहे.
ती म्हणाली —
“आई, मला मोठ्या शहरात जाऊन शिकायचं आहे.
मी मोठी ॲनिमेटर बनेन.”
आई म्हणून मला तिचं स्वप्न खूप आवडलं. मी घरात याबाबत तिच्या बाबां जवळ विषय काढला..
पण घरातले विचार वेगळे होते.
मोठं शहर… मुलगी एकटी…
समाज काय म्हणेल…
तिच्या बाबांनी शेवटी निर्णय घेतला —
“इथंच शिक. मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही.”
त्या दिवशी माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं मंदावलं.
पण ती काही बोलली नाही.
फक्त एवढंच म्हणाली —
“ठीक आहे बाबा.”
त्या एका वाक्यात तिच्या मनातली कितीतरी स्वप्नं शांत झाली.
पण तिची जिद्द मात्र कमी झाली नाही.
तिने शिक्षण पूर्ण केलं.
आणि एका शाळेत नोकरी सुरू केली.
लहान मुलांमध्ये ती खूप रमायची.
त्यांच्या हसण्यात तिला आनंद सापडायचा.
कधी एखादा जखमी पक्षी दिसला तरी ती त्याला हातात घेऊन जपायची.
तिचं मन खूप मोठं होतं.
ती प्राण्यांनाही जीवापाड सांभाळायची..
हळूहळू वेळ पुढे जात होता.
घरात आता तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
एक संध्याकाळ होती.
मी स्वयंपाकघरात काम करत होते.
ती शांतपणे माझ्या जवळ आली आणि म्हणाली —
“आई, थोडा वेळ बसशील का?”
आम्ही दोघी गॅलरीत बसलो.
ती काही क्षण शांत होती.
मग ती हसत म्हणाली —
“आई, आता माझं लग्नाचं वय झालं आहे ना?”
माझं मन हलकंसं दचकलं.
ती पुढे म्हणाली —
“तुझं आणि बाबांचं स्वप्न आहे ना… माझं घर बसलेलं पाहण्याचं.”
मी काही बोलू शकले नाही.
पण ती पुढे म्हणाली —
“आई, मी लग्नाला नाही म्हणणार नाही.
पण माझी स्वप्नं मी सोडणार नाही.”
मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.
ती म्हणाली —
“कदाचित लग्नानंतर मला मोठ्या शहरात राहण्याची संधी मिळेल.
कदाचित मला ॲनिमेशन शिकता येईल.”
तिच्या डोळ्यांत पुन्हा तीच जुनी चमक दिसली.
ती हसत म्हणाली —
“आई, मी खूप मोठी होईन बघ.
खूप मेहनत करेन.
खूप कमाई करेन.
सगळ्यांना सुखी ठेवेन…
आणि तुला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करून देईन.”
त्या क्षणी माझे डोळे भरून आले.
आई म्हणून माझ्या मनात एकच प्रार्थना आहे —
माझ्या मुलीला असा जोडीदार मिळो
जो तिच्या स्वप्नांना समजून घेईल.
जो तिच्या पंखांना कापणार नाही…
तर तिला आकाश देईल.
कारण मला माहित आहे —
माझी मुलगी उंच उडू शकते.
फक्त तिला थोडंसं आकाश हवं आहे.
आणि आई म्हणून मला आयुष्यात एकच क्षण पाहायचा आहे —
ज्या दिवशी ती आनंदाने म्हणेल —
“आई…
तुझ्या मुलीने तिचं स्वप्न खरं केलं.”
लेखिका ..सौ.दर्शना ओमकुमार भुरे
ही कथा लिहिलेली नाही…
तर ती एक आई म्हणून जगलेली आहे.










थोडंसं आकाश … छान मांडणी दर्शना.
तुझ्या लेकीच्या स्वप्नासाठी खूप शुभेच्छा
खूप छान, सेजल.
तिच्या स्वप्नांची पूर्तता होवो, हीच सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना