भाग -२  Reunion-मराठी कथा
भाग -२ Reunion-मराठी कथा

भाग -२ Reunion-मराठी कथा

Reunion-मराठी कथा
भाग -२
मी परत येत आहो राधा
कुठे ?
कुठे म्हणजे? वेडाबाई तुझ्याजवळ
माझ्याजवळ?
आता?
हो. आता म्हणजे? 
आता खूप  उशीर झाला श्रावण.
श्रावण कधीच काही उशीरा करत नाही.
डोळ्यातील पाणी वाहू देत राधाने फोन ठेवला.
श्रावण पुन्हा पुन्हा फोन करत राहिला….
राधा बेडवर बसून फोनची रिंग ऐकत होती.
माझी राधा माझ्यावर का रागवली?
श्रावणचा मैसेज आला.
तुझी राधा आता तुझी नाही….राधाने मैसेज केला.
राधा मी उद्या पहाटे पोहचतोय.
Airport वर भेटूया आपण.
नाही श्रावण,माझे लग्न झाले.
मला कळले ते.
फक्त एकदा भेट राधा.
नाही,
मी शालीनला फसवू शकत नाही.
अग एकदाच भेट फक्त.
प्रियकर म्हणून नको मित्र म्हणून भेट.
त्याच्या आग्रहाखातर राधा त्याला भेटायला तयार झाली.
शालीन जरा उशीराच घरी आला.
का रे,
आज उशीर?
आज काही meetings होत्या.
का ग अस्वस्थ दिसतेस?
तुला कसे कळते रे सगळे?
अतरंगी ओळखतो मी तुला राधा.
पण कसे? 
ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांचे मन ओळखणे अवघड नसते.
मला नाही जमले असे…राधा पुटपुटली.
जमेल जमेल.
जेवण आटोपून दोघेही आईस्क्रीम खायला बाहेर पडली.
शालीन उद्या मी एका मित्राला भेटायला चालले.
कोणाला?
श्रावणला
तो खूप वर्षांनी येत आहे इथे.
Airport वर भेटायचे आहे.
मी सोडून देवू का?
अरे नको.उद्या तुला सुट्टी असते.आरामात ऊठ.
जाईन मी.
बरं.
उद्या श्रावणला भेटायचे आहे.
खूप दिवसांनी तो दिसेल…विचारानेच ती सुखावत होती.पण मन आनंदाबरोबर अस्वस्थही होत होते.
माझ्या मनात अजूनही श्रावण आहे….नाही आता शक्य नाही. आणि थोडा असेलही तरी ते सगळे व्यर्थ आहे.
श्रावण -तेव्हा मला सोडून गेला नसता तर …आज किती वेगळे आयुष्य राहले असते दोघांचेही.
राधाचे मन मागे मागे गेले.हातातून निसटून गेलेले क्षण पकडता येईल?
श्रावण आणि माझी पहिली ओळख—-संपदाच्या घरी भेटलो होतो आम्ही.तिच्या भावाचा श्रावण मित्र.
हसरा श्रावण सगळ्यांना भावायचा.संपदाच्या घरी ओळख झाली तेव्हा लहान होतो आम्ही.भेटी वाढल्या.मैत्री झाली.प्रेमात पडलो.
माझ्या मनात श्रावण रुजला.धरतीवर महिनाभर भेटणारा श्रावण मला मात्र रोज भेटत राहला.मला प्रेमवर्षावात भिजवत राहला.मीही भिजत राहले.
आणि  एक दिवस अचानक आयुष्यातून अचानक श्रावण निघून गेला.त्याची विदेशात करियर करण्याची महत्वाकांक्षा,  इथेच राहण्याची माझी जिद्द एकमेकांवर कुरघोडी करत राहले.आम्ही वेगळे झालो.दोन वर्षांनी तिथले शिक्षण संपवून तो परतेल म्हणून वाट बघितली.
आता त्याला पाच वर्ष तरी तिथेच नौकरी करायची होती.
आई-बाबांना माझ्या लग्नाची घाई झाली.
मी आणि  शालीनचा संसार सुरु झाला.
शालीनच्या सहवासात मी श्रावणला विसरु लागले….
पहाटेच उठून राधा श्रावणला भेटायची तयारी करु लागली.
शालीन झोपून होता.
राधा
श्रावणने लांबूनच साद घातली.
तसाच दिसतो अजून.
श्रावण घाईघाईने जवळ आला.तिला मिठीत घेतले. श्रावणच्या मिठीत राधा विरघळली. 
जरावेळ Airport वरच गप्पा मारुन राधा घरी जायला निघाली. 
ए थांब ना जरा वेळ.
मनातून गेलेला श्रावण पुन्हा मनात …
आली का ग मित्राला भेटून? 
शालीनने विचारले.
राधा-शालीनच्या भेटी वाढत गेल्या. बोलक्या श्रावणने पून्हा एकदा राधाच्या मनाचा ताबा घेतला.राधा शालीन-श्रावणची मनातल्या मनात तुलना करु लागली.
श्रावणचे भेटवस्तु देणे, हाॕटेलमध्ये जेवू घालणे,मनसोक्त फिरणे राधाला भावू लागले.
भविष्याची बचत करणारा,नेहमी खर्चावर ताबा ठेवणारा,तिला वेळ कमी देणारा शालीन तिला कोता वाटू लागला.
राधा चल माझ्यासोबत अमेरिकेत.
कसे शक्य आहे श्रावण?
प्रेम असेल तर सगळे शक्य होईल.
नाही रे.
शालीनला मी नाही सोडू शकत.
दोन वर्षात शालीनने एवढी काय जादू केली तुझ्यावर?
मला विसरली तू राधा?
विसरेन कशी?
मला विचार करायला वेळ दे.
दिला.
खूप सारे प्रश्न मनात घेऊन राधा घरी परतली.
श्रावणला सगळ्याःना भेटायचे होते.त्यासाठी Reunion करायचे ठरवले.
शालीन पुढील आठवड्यात Reunion आहे.
कुठे ग?
मुंबईजवळ एका रिसोर्टमध्ये.
एकटी जाशील ना व्यवस्थित?
इथून कोणी सोबत आहे का?
आहेत ना.तू नको काळजी करु.
शालीन आॕफिसमध्ये गेला.
श्रावणचा फोन आला.
का रे दोन दिवसात फोन नाही केला तू?
अग जरा बिझी झालो होतो.
मी वेड्यासारखी वाट बघत होती.
तू आहेसच वेडी.
अरे पण एक फोन तरी करायचा.
वेळच नव्हता.
श्रावण तू तसाच आहेस.तुझ्या मनानी वागणारा.
राधा Reunion च्या दिवशी तू ये निघून.
बघते.
तू काल हो म्हणाली होती.
हो रे पण मन दोलायमान झालयं.तुझ्या शिवाय काही सुचत नाही हे खरयं पण शालीनचे काय? त्याची काही चूक नसतांना त्याला शिक्षा मिळणार.
माझ्या राधेशी त्याने लग्न केले हीच त्याची चूक.
राधा तू माझ्याशिवाय राहू शकशील…मला विसरु शकशील…
नाही रे.
मग ठरले तर शनिवारी तू निघून ये कायमची.
बरं
नक्की नं.
हो .नक्की 
आज सोमवार.अजून फक्त पाच दिवसानंतर माझी राधा कायमची माझी होणार.
श्रावण त्याआधी भेटूया एकदा.
अग नाही जमेल.मी शनिवारीच पोहचणार.
बरं.मी वाट बघतेय शनिवारची.
Doorbell वाजली.राधा घाईने दार उघडायला गेली.
Doormat पाय अडकून पडली. 
बराच वेळ बेल वाजत राहली.
शालीनने त्याच्या जवळच्या किल्लीने दार उघडले.
अग काय झाले राधा असे विचारत त्याने तिला उचलून पलंगावर झोपवले.
तिच्या पायातील वेदना कमी होत नव्हत्या.
शालीनने लगेच तिला डाॕ.कडे नेले.
पाय फॕक्चर नाही झाला पण तीन दिवस डाॕ.नी पायाची हालचार बंद ठेवायला सांगितली.
शालीनने लगेच एका  आठवड्याची  सुट्टी टाकली.
शालीन तू नको एवढ्या सुट्या घेऊ.मी माहेरी जाते.
नाही.तू माझी जबाबदारी आहेस राधा आणि तुझ्यासाठी सुट्ट्या नाही घेऊ शकलो तर नौकरीचा काय फायदा?
शालीनने पूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली.
तिला औषधी,खाणे-पिणे,पायाची मालिश …सगळे वेळच्या वेळी करु लागला.
तीन दिवसात श्रावणचा एकदाच मैसेज आला.
 राधा शनिवारी येतेयं ना नक्की.
 आपले Reunion आहे.
 राधाने रिप्लाय दिला नाही.
राधा हे घे गरमागरम सुप
अरे एवढे कशाला करतो?
मला आवडते तुझ्यासाठी करायला.
तू मला फार रुक्ष ,कंजूष समजतेस.मला माहित आहे.
मी गरिबीत वाढलो.पैशांचे मोल जाणतो मी.
आणि आपल्या भविष्याची सोय करायला हवी म्हणून मी बचत करतो.
रधा त्याच्याकडे बघत होती.
बरं ते जाऊ दे.उद्या तू शाळेच्या Reunion ला जावू शकते.चालतांना पायांची काळजी घे.मी सोडून देतो तुला.
बघते.
नाही ग .जा.मजा येईल तुला.
चल झोप आता.
मी शालीनला ओळखलेच नव्हते. मी समजायची त्याहून किती वेगळा आहे हा.नेहमी श्रावणसोबत तुलना करायची.
कायम त्याच्या आणि माझ्यात थोडे अंतर ठेवत आली.
सकाळीच मोबाईलवर मैसेज झळकला
राधाराणी आज भेटूया
नाही श्रावण
आज शालीन आणि  माझे Reunion….
समाप्त

याआधीचा भाग वाचा खालील लिंकवर

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com

 

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!