माझं छोटं वादळ..
घरात एखादा दिवस शांत गेला तर मला स्वतःलाच काळजी वाटायची.
कारण माझं बाळ घरात असलं की घरभर त्याच्या उड्या, खोड्या, बोबडे बोल आणि सतत काही ना काही उद्योग सुरू असायचे.
लहानपणापासून तो इतका हट्टी आणि खोडकर होता की एका जागी दोन मिनिट शांत बसणं त्याला माहीतच नव्हतं. त्याचे छोटे छोटे पाय सतत घरभर पळत असायचे… आणि मी त्याच्या मागे हातातली कामं सोडून धावत असायचे.
असं माझं करामती बाळ…
त्याच्या खोड्या सांगाव्या तेवढ्या कमीच!
खोलीत कोंडलेलं माझं बाळ
एकदा तर त्याने कहरच केला.
मी अंगणात बसून कपडे धुत होते. दुपारची वेळ होती आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता.
माझी कामाची घाई… आणि याची मधे मधे लुडबुड!
कधी बादलीतलं पाणी माझ्या अंगावर उडवायचा… तर कधी धुतलेले कपडे इकडे तिकडे फेकून द्यायचा.
मी त्याला समजावत म्हणाले,
“अरे बाळा… आईला काम करू दे…”
पण त्याला ते कुठे कळणार होतं?
शेवटी मी त्याला उचलून आतल्या खोलीत नेऊन ठेवलं.
विचार केला, “थोडा वेळ खेळेल… कदाचित झोपेल… तोपर्यंत माझं काम आटोपून घेते.”
काम आटोपलं. थोडावेळ बसले.
आणि अचानक मनात धस्स झालं.
“अरे… हा एवढा शांत कसा?”
ना आवाज… ना रडणं…
मी धावत खोलीकडे गेले.
आणि बघते तर काय…
माझ्या छोट्या बाळाने खेळता खेळता आतून दाराची कडी लावून घेतली होती!
मी बाहेरून दार ओढत होते… आणि तो आतून “आई… आई…” करत रडत होता.
तो इतका लहान… दीड-दोन वर्षांचा…
त्याला कडी लावता आली होती, पण उघडायची कशी हे कुठून कळणार?
नशीबाने खिडकी उघडी होती.
त्यातून तो मला दिसत होता.
मी त्याला खिडकीतून पाणी दिलं… बिस्कीट दिलं…
रडत रडत सांगत होते—
“बाळा… असा हात लाव… इथे ओढ…”
पण तो फक्त माझ्याकडे बघून रडत होता.
मला उचलून घे म्हणून हात वर करत होता…
आणि मी…
त्याच्याकडे नुसती बघत उभी होते.
माझं डोकंच बंद झालं होतं.
तेवढ्यात माझी मुलगी शाळेतून आली.
भावाला आत अडकलेलं पाहून तीही रडायला लागली.
मी स्वतः घाबरलेली…
एकीकडे मुलगा… एकीकडे मुलगी…
क्षणभर मला काहीच सुचत नव्हतं.
मी शेजाऱ्यांकडे धावले. सगळ्यांनी प्रयत्न केले, पण दार उघडेना.
इतक्यात शेजारच्या घरात लाईटचं काम करणारे दोन माणसं दिसले.
मी अक्षरशः हात जोडून त्यांना म्हणाले,
“भाऊ… माझा मुलगा आत अडकला आहे… कृपया मदत करा…”
ते लगेच आले.
त्यांच्या हातात दोन लांब काठ्या होत्या.
त्या त्यांनी खिडकीतून अलगद कडीपर्यंत पोहोचवल्या…
आणि एका क्षणात…
टक!
दार उघडलं!
माझं बाळ धावत बाहेर आलं आणि मला घट्ट बिलगलं.
त्या क्षणी माझ्या डोळ्यातून आलेले अश्रू थांबतच नव्हते.
मला असं वाटलं… जणू माझा जीवच परत माझ्याकडे आला होता.
दुपारी त्याचे बाबा ऑफिसमधलं काम सोडून दोन माणसं घेऊन आले.
त्यांना वाटलं दार कापावं लागेल.
मी म्हणाले,
“बाळ सुरक्षित बाहेर आलं…”
पण ते माझ्यावर खूप रागावले.
“कामात एवढी गुंततेस की मुलाकडे लक्षच राहत नाही!”
त्या दिवशी आमच्यात बराच वाद झाला.
आणि त्या दिवसानंतर त्यांनी घरातल्या प्रत्येक दरवाज्याला दोऱ्या बांधून ठेवल्या…
पुन्हा माझ्या छोट्या महाशयाने स्वतःला आत कोंडू नये म्हणून..
पण त्याच्या खोड्या काही कमी होत नव्हत्या..
महिन्याचा किराणा आणून ठेवला की हा छोटा महाशय संधी शोधून साबण, बिस्कीट, शॅम्पू… जे हाताला लागेल ते उचलून अंगणात फेकून यायचा.
पहिल्यांदा मला वाटलं पिशवीतल्या वस्तू हरवत आहेत.
नंतर लक्षात आलं—
“अरे! हे तर माझं छोटंसं वादळ आहे!”
मग माझा रोजचा दिनक्रमच ठरला होता.
सकाळी उठल्यावर आधी अंगण तपासायचं…
आणि मग घरकामाला लागायचं!
गंमत म्हणजे त्याने रात्री फेकलेल्या वस्तू मला अंगणात जशाच्या तशा परत मिळायच्या.
त्याची ती निरागसता पाहिली की त्याच्यावर रागवावं की हसावं हेच कळत नसे. तर अशा या छोट्या वादळाला प्राण्यांची पण भयंकर आवड ..
एकदा मी गरम गरम पोळ्या करत असतानाचा किस्सा..
मी पोळ्या करून मागे टोपलीत ठेवत होते.
पण काही वेळाने लक्षात आलं—
टोपली भरतच नव्हती!
मी शांतपणे मागे वळून पाहिलं…
तर माझं बाळ एकेक पोळी उचलून हळूच बाहेर नेत होतं.
मी त्याच्या मागे गेले.
आणि अंगणात पाहते तर काय—
चार-पाच भुकेली कुत्री आरामात गरम पोळ्या खात होती…
आणि माझं छोटंसं बाळ त्यांच्याकडे टक लावून समाधानाने बघत उभं होतं.
त्या क्षणी मला त्याच्यावर खूप माया आली.
एवढ्या छोट्या वयात त्याला मुक्या जीवांची भूक समजत होती.
“केळ गरम करून दे…”
त्याला सर्दी खूप व्हायची.
डॉक्टरांनी थंड खायला बंद केलं होतं.
एकदा त्याने केळ खाण्याचा हट्ट धरला.
मी म्हणाले,
“नको बाळा… तुला सर्दी होईल…”
तर लगेच निरागसपणे म्हणाला—
“मग गॅसवर गरम करून दे… पण मी खाणार!”
त्याचं ते बोलणं ऐकून मला इतकं हसू आलं की रागवायचंच विसरले.
“आई… ती काळी पोळी करून दे…”
अशाच त्याच्या हजारो आठवणी आहेत…
त्यातली माझी सगळ्यात आवडती आठवण म्हणजे त्याची “काळी पोळी”.
तो पहिलीत होता.
एक दिवस शाळेतून आला आणि म्हणाला—
“आई… ती काळी पोळी करून दे ना…”
माझ्या मित्राच्या आईने त्याला डब्यात दिली होती खूप गोड लागली तू ही कर..
मी विचारात पडले.
“काळी पोळी? अशी कोणती पोळी असते?”
मी त्याला वेगवेगळ्या पोळ्या करून दिल्या.
पुरी, पराठा, गुळपोळी, तिळपोळी, थालीपीठ, दशमी, शेंगदाणा पोळी, गोड धिरडं, चटणी मिठाचे धिरडं…
पण प्रत्येक वेळी त्याचं एकच उत्तर—
“नाही… ही नाही…”
शेवटी अचानक माझ्या लक्षात आलं—
“कदाचित पुरणपोळी असेल!”
मी प्रेमाने गरम गरम पुरणपोळी करून दिली.
आणि पहिला घास खाताच त्याचे डोळे चमकले.
तो आनंदाने म्हणाला—चं
“आई… हो! हीच ती काळी पोळी!”
त्या क्षणी मी त्याच्याकडे फक्त बघत राहिले.
त्याचे ते छोटे हात…
तोंडभरून खाणं…
डोळ्यांतला आनंद…
सगळं माझ्या मनात कायमचं साठून गेलं.
आज माझं ते बाळ मोठं झालंय.
शांत… समजूतदार… जबाबदारही झालंय…
पण अजूनही कधी त्याच्याकडे पाहिलं की मला तोच छोटासा खोडकर मुलगा दिसतो…
जो कधी स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचा…
कधी कुत्र्यांना पोळ्या खाऊ घालायचा…
आणि कधी “काळी पोळी” मागत माझ्या मागे फिरायचा…
आणि मग नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं…
— सौ. दर्शना ओ. भुरे, हिंगोली





या छोटयाशा वादळात आईला पळता भुई थोडी करण्याची ताकद असते.
सुरेख लिखाण
किती छान खोडकर वादळ , मस्त अनुभव आईचा.
Chan