झिजुनी स्वतः चंदनाने
झिजुनी स्वतः चंदनाने

झिजुनी स्वतः चंदनाने

झिजुनी स्वतः चंदनाने
प्रिया देशपांडे

राधिका आज प्रचंड अस्वस्थ होती . घर, नोकरी, मुले , सासू-सासरे यांचे सारे करता करता तिची पुरेवाट होऊन जायची. शिवाय घरात चिडचिड कोणावर करणार ? तर…. मुलांवर. ऑफिसमध्ये आली तरी तिचा मूड कायम तणावपूर्ण असायचा. जणू काही ओढून ताणून ती जगत होती. प्रत्येक वेळी तिच्या घरगुती जीवनात दखल देणे मलाही योग्य वाटत नव्हतं तरी पण मी तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
आज मात्र राधिका जाम वैतागलेली दिसत होती.
तशी तिची आणि माझी ओळख होऊन फार तर एखाद वर्ष झालं असावं . तेव्हा ती 32 वर्षाची आणि मी 35 ची . जवळपास समवयस्क असल्याने आमच्यात चांगले जमू लागले. एकत्र डबा खाणे , जाता येताना सोबत , गप्पा मारणे, चर्चा चालायचीच. तशी ती तरुणच सडपातळ बांधा. राधिका खरच कृष्ण सखी राधे सारखी पण या चिडचिडेपणामुळे तिचे सारे तेजच लोक पावले होते .
नवऱ्याची नोकरी अपुरा पगार मुलांचे शिक्षण, सासू-सासर्‍यांचे औषध पाणी ….किती तरी जबाबदारी ती पेलायची.
जणु लग्नानंतर स्त्रीचे एकच काम असते. समर्पणाचे. आई-वडिलांना सोडून यायचे मग नवऱ्यासोबत आपलं नवीन जग तयार होतं . शेवटी मुलांसाठी समर्पण .
” तू नको त्रास करून घेत जाऊस. त्रासाने वेदनेची जास्ती झळ पोहोचते . पण नेहमी तिचं एकच उत्तर असायचं .
माझ्या आई-वडिलांनी माझा आयुष्य नरक केलं . ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो परक्या जातीचा, बे अब्रू होईल म्हणून नाकारलं . पुढे कितीतरी चांगली स्थळे नाकारली आणि मला याच्या गळ्यात बांधली.
साऱ्या आयुष्याचं वाटोळ. काय ग करू? सहनशक्तीच्या पलीकडे आहे.
मी उत्तरले, ” नको ग असं म्हणू, दोन गोंडस मुलं आहे पदरात सोन्यासारखी उद्या मोठी झाली म्हणजे सारी स्वप्न पूर्ण करतील तुझी “.
पण तिच्या यातना तिलाच माहीत.
खरंतर ही कसरत प्रत्येक घरात प्रत्येक राधिकेला करावी लागते. पण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी. व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि प्रत्येक राधिका आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणारी असेलच असेही नाही
रोजच्या भेटीत मैत्री वाढत गेली पण मी विचार केला आपण राधिकेचे सारं ऐकून घेतलं बघितलं आता तिला सरळ प्रात्यक्षिकच दाखवावे या हेतूने तिला म्हणाले, ” राधिका उद्या माझ्याकडे संक्रांतीचे हळदीकुंकू आहे. तु ऑफिसमधून घरी जाताना येशील. जास्त वेळ बसवून घेत नाही. लवकरच जाता येईल तुला घरी. तुझ्या घरच्या अडचणी मला माहित आहे ग , घराघरात असतात त्या. तर बाई घरात नसली की काय होतं ? हे आपण चांगलं जाणून आहोत की.
मी मिश्किल हसले तिने मान डोलावली. सांगून ठेवते घरी म्हणाली .
ठरल्याप्रमाणे राधिका ऑफिस सुटताच माझ्यासोबतच घरी आली. मलाही सुट्टी न मिळाल्यामुळे सारी तयारी धावपळीतच करावी लागली होती. मोजक्याच बायका बोलावल्या होत्या. राधिका पहिल्यांदाच घरी येते म्हणून तिने माझ्या मुलांसाठी काही फळं चॉकलेट्स आठवणीने आणली होती. मुलं खुश.
राधिका आली तशी मी तिला सर्वांची ओळख करून देऊ लागली एका पलंगावर 85 वर्ष ओलांडलेले अंथरुणाला खीळलेले सासरे होते , ‘हे माझे सासरे, या माझ्या 75 च्या सासुबाई . मनाने प्रेमळ आहेत पण आता वयोमानानुसार स्मृति कमी झाली आहे. दररोजच्या खूप गोष्टी त्या विसरून जातात आणि दिल्याच नाही म्हणून रागही करतात , अबोला धरतात . लहान मुलांसारखा. दृष्टीही अधू झाली त्यांची. वेणी घालून द्यावी लागते, कपडे हातात द्यावे लागतात, कधी कधी कपडेही बदलून द्यावे लागतात, सासऱ्यांचे ओले अंथरून वेळोवेळी बदलावे लागते. सकाळी तर खूपच तारांबळ उडते ग माझी ! मुलींचे डबे, शाळा यांची देवपूजा, माझी ऑफिसची वेळ , कधी घास पोटात घालावे म्हटलं की सासूबाई आवाज देतात.
पण एक सांगू मी या घरात आल्यापासून या सर्वांनी मला इतकं प्रेम दिलं म्हणून मलाही यांच्या बद्दल प्रेम आदर आहे आणि प्रेम दिल्याने घेतल्यानेच वाढते हे मात्र खरे. कितीही कामाचा ताण असला तरी मला कधी थकवा जाणवत नाही ऑफिस सुटले की घराची ओढ लागते . का ? …..तर मी प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते . रागवलं तरी आपलंच आणि चिडले तरी आपलेच कर्तव्य .
भोग नशिबाचे असतात ग, म्हणून प्रत्येक वेळी त्याला दोष देऊन कसं चालणार ? आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार ना ! तुझ्या आई-वडिलांचे काहीच चूक नाही, तू त्यांना नकोच दोष देऊ. त्यांनी मुलीचे सुखच पाहिले आणि दिवस काय सारे सारखेच थोडी असतात , वेडी कुठली.
तिचे डोळे नकळत पाणवले होते . मी किचनमध्ये वळले तशी तिने मागून येऊन घट्ट मिठी मारली . म्हणाली , “खरच ग ! आज तुझ्याकडून संक्रांतीचे वाण नव्हे तर सकारात्मकतेचे वाण घेऊन जात आहे. खरंच तुझी कमाल आहे पण बोलली नाहीस कधी. हसतमुख असतेस नेहमी.
मी उत्तरले , ” अग वेडे ! स्वतः चंदनासम झिजून इतरांना सुख देण्यात जो आनंद मिळतो ना तो इतर कशातच शोधूनही सापडत नाही “.
राधिका सकारात्मकता आणि चेहऱ्यावरचा आनंद घेऊन गेली आणि मी भरून पावले.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com

 

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!