७-आत्मचरीत्र-न लिहिलेले-सुगंधा आयुष्यातुन  गेली
७-आत्मचरीत्र-न लिहिलेले-सुगंधा आयुष्यातुन गेली

७-आत्मचरीत्र-न लिहिलेले-सुगंधा आयुष्यातुन गेली

सुगंधाचे एका श्रीमंत मुलासोबत लग्न झाले.स्वप्न भंगले.आयुष्य पुन्हा आधीसारखे राहले नाही. मी हिंमत करुन तेव्हाच लग्नाला हो म्हणायला हवे होते.आज सुगंधा माझ्या सोबत राहली असती….असे कित्येकदा वाटायचे.आजही वाटते. पुढेही वाटत राहील…
शरदच्या आयुष्यातून सुगंधा गेली.पण तिच्या सुगंधित आठवणी..त्या तशाच होत्या शरदला घट्ट पकडून….
आत्मचरीत्र….भाग- ७
सुगंधाचे लग्न झाले. सुगंधा आयुष्यातुन गेली.
नाही तशी ती कधीच गेली नाही.सुरुवातीला वाटले हळूहळू मी विसरेन तिला.
सर्व दुःखावर काळ हेच औषध आहे. पण
काही दुःख काळापेक्षाही मोठी असतात.तीव्रता काळानूसार कमी होते पण सल राहतेच.नंतर खूप वर्ष मी आजोळी गेलो नाही.सरु,आई जायच्या.
त्यांना माझे गुपित माहित नव्हते हा माझा भ्रम होता.सरुच्या लक्षात माझे सुगंधाचे नाते लक्षात आले होते.हे तिने खूप नंतर माला सांगितले.
कधीतरी त्या सांगायच्या सुगंधा भेटली होती.तुझ्याबद्दल विचारत होती.
ती सुखात आहे का??? प्रश्न विचारावासा वाटायचा.पण विचारण्यात अर्थ नव्हता.ती सुखात असेल तर मलाही सुखच आहे.आणि नसेला तर मी काय करु शकलो असतो?
मी बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला असतांना आजी गेली.आईचा आधार गेला.
माझे आता गावी जाणे कमी झाले होते.प्रभाकर,श्रीहरी शिक्षण सोडून शेतीकामाकडे वळले.मी गेलो की तिघेही दिवसभर सोबत राहायचो.
सरुचे मॕट्रीक झाले.तिलाही नागपूरला शिक्षणासाठी यायचे होते.पण मला नौकरी लागेपर्यंत ते शक्य वाटत नव्हते.
मी जेमतेम माझ्या शिक्षणापुरता कमवत होतो.सरुचा खर्च भागवण्याइतपत आवक नव्हती माझी.आईही आता जास्त मोलमजूरी करु शकत नव्हती.हे शेवटचे वर्ष पटकन निघून जावे असे वाटत होते.सरुने घरी राहण्यापेक्षा बाजूच्या गावी गाण्याचा क्लास लावला.तिला आईसारखी गाण्याची आवड होतीच.एक शिक्षिका फुकट गाणी शिकवायच्या.
तेव्हा मुलींनी गायन शिकण्याचा प्रघात नव्हता.त्या फुकट शिकवायच्या तरीही फार कमी मुली शिकायला जायच्या.
बी.ए.झालो.नौकरीसाठी अर्ज केले.उगाच भाड्याचा भूर्दंड नको म्हणून गावी गेलो.प्रभाकर,श्रीहरी सारखे काही दिवस शेतीकाम करण्याचा विचार केला पण मला काही येत नव्हते.नांगरणी,खूरपणी,नींदन…हे फक्त बघितले होते.आईने मला शेतीकाम करुच दिले नाही.अभ्यास कर आणि मोठा माणूस हो….एवढेच तिचे म्हणणे असायचे.
आमचा गाव आता बराचसा सुधरला होता.वीज आली.
त्यामुळे दळण दळायला आता दुसऱ्या गावी जाणे बंद झाले.माझ्या चुलत भावाने छोटेसे किराणा दुकान थाटले.
तो आठवडी बाजारातून बरेच सामान आणायचा आणि लोकांना आठवडाभर विकायचा.
बिलाच्या भीतीने आईने घरी एकच बल्ब बसवला.पडवी आणि स्वयंपाकखोलीच्या मध्ये तो लावला. दोन्ही खोल्यात थोडा थोडा उजेड यायचा.
गावातील काही सधन लोकांनी टेबलपंखे घेतले.

दिवस चालले होते.मला गावी येऊन सहा महिने झाले . शेवटी ज्याची वाट बघत होतो ती नौकरीची आॕर्डर आली.
आमच्या घराने पहिल्यांदाच एवढा आनंद अनुभवला.एका आॕफिसमध्ये मला क्लार्कची नौकरी मिळाली. आठ दिवसांनी रुजू व्हायचे होते.
आईला आनंदाने भरते आले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच तिने,सरुने आजोळी जायची तयारी केली.मलाही सोबत जाणे भाग होते.आता आजोळी आजी नव्हती.आजोबा,मामा-मामी होते.त्यांना ही आनंदाची बातमी द्यायला मी जाणेही ओघाने आलेच.मला जावेच लागले.
आजोबा माझ्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले
माझ्या लेकीच्या कष्टाचे चीज केले बाळा तू….
भरुन आले मला.आईचे सगळे कष्ट डोळ्यासमोरुन सरकले.
मामा-मामीही आनंदात होते.
आजोबा सुगंधा आहे का इथे? सरुने विचारले
हो.श्रावण गेला आठ दिवसापूर्वी.म्हणून दोघेही आले.
मामाने माझ्या कडे बघितले.
दादा,चल ना.आपण भेटून येऊ.
मी जाऊ कि नको या संभ्रमात होतो
सुगंधाला एक नजर बघावे असे खूप वाटत होते.पण माझी हिंमत होत नव्हती.सरुने चल रे दादा म्हणत माझा हात पकडला आणि मला घेऊन गेली.
सुगंधा अंगणातच बसून होती.घरी ती आणि तिची आई दोघीच होत्या.मी दिसल्याबरोबर ती मला बिलगून रडायला लागली.मी तिचा बालमित्र म्हणून ती मला बिलगून रडली असेच सगळ्यांना वाटले.सरुने तिला थोपटून शांत केले.
मी नजर भरुन तिच्याकडे बघितले.कपाळावर ठसठसीत कुंकू आणि गळ्यात जाडे मंगळसुत्र होते.
आमची नजरानजर झाली.तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आधीसारखेच प्रेम दिसले.पण आधीची माझी सुगंधा आणि आता दुसऱ्याची सुगंधा हे अंतर न संपणारे होते.सरु आणि सुगंधाची आई बोलत बोलत आत गेल्या.अंगणात मी आणि सुगंधा दोघेच होतो.
अंगणात मी लावलेला लाल चाफा फुलला होता.त्याचा सुगंध दरवळत होता.
चाफा मस्त फुलला सुगंधा.

शरद तू मला विसरुन जा.लग्न कर.माझ्यापेक्षा चांगली मुलगी तुला भेटेल.
मला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी नको होती.तू हवी होती सुगंधा.
ते होणे नव्हते आपल्या नशिबात.पुढचा जन्म असेल तर….
मी थांबेन तोपर्यंत.
नाही शरद.तू लग्न कर.
तू सुखी आहेस सुगंधा?
तुला काय वाटते?
मला काय वाटणार? सुखी दिसत आहेस.पण मला विसरली नाहीस.नाहीतर मला बिलगली नसती.
लौकीकार्थाने सुखी आहे.श्रीमंत सासर आहे.चांगला नवरा आहे.पण मला जे हवे होते ते मिळाले नाही. आता मिळणारही नाही.मी तिचे दोन्ही हात पकडले.त्यांचे चुंबन घेतले.माझ्या आसवांनी तिचे हात ओले झाले.
सरु चल निघूया दादा म्हणत बाहेर आली.तिचे हात आपसूक माझ्या हातातून सुटले.
नंतर दोन दिवसात सरु रोज जायची सुगंधाला भेटायला.मला धीर झाला नाही.सुगंधाला आता भेटलो नसतो तर बरे झाले असते इतका बेचैन मी तिला भेटून झालो.
क्रमशः

सुगंधा आयुष्यातुन निघून गेली.शरदला नौकरी मिळाली.नवे पर्व सुरु झाले.पुढे वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/८भाग आत्मचरीत्र-न लिहिलेले

प्रिय वाचक, तुम्हाला ही कथामालिका आवडत असेल अशी आशा आहे.तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचनांचे स्वागत आहे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!