नातलगाच्या लग्नासाठी हिंगोलीला गेलेला माधव रात्री झोपेत असतांनाच बेशुध्द पडला. लग्नघरी एकच धांदल झाली.
स्वयंसिद्धा भाग ९
दत्तप्रभुचा कौल
माधवला सकाळीच लुधियानासाठी निघायचे असल्याने लवकर उठायचं होतं. कोणाची झोप मोड नको म्हणून एकटाच एका खोलीत झोपला होता.
त्याला किती वाजता आणि काय त्रास झाला ? हे तोच सांगू शकत होता. पण तो केव्हा बेशुद्ध होऊन पडला हे कोणालाच माहिती नव्हतं. हालचाल बंद, डोळे बंद फक्त हृदयाची धुकधुक सुरू होती.
लग्न घरात आता वेगळीच घाई सर्वांची पळापळ चालू होती. ॲम्बुलन्स बोलवा जवळच्या डॉक्टरांना बोलवा.
त्याला तातडीने नांदेडला हलवलं. पोहोचायला दोन तास लागणार होते . जीवात जीव असेपर्यंत पोहोचतील की नाही याची चिंता होती . माधवचे आई-वडील सोबतच होते. म्हाताऱ्या जीवांना लेकराचा त्रास बघवत नव्हता.
इकडे सुप्रिया बेचैन होती. तिचा डावा डोळा सकाळपासून फडफडत होता. माधवला हलवे पर्यंत तिला कोणी कळवलेच नाही. ॲम्बुलन्स निघाल्यावर तिला फोन केला गेला, नांदेड साठी लवकर निघायला सांगितलं.
तिच्या मनात आधीच शंकेची पाल चुकचुकली होती. फक्त माधवची प्रकृती ठीक नाही एवढेच माहीत होते तिला, पण जाताना तर चांगला ठणठणीत होता. अचानक काय झाले असावे ? कितीतरी प्रश्नांनी तिला भंडावून सोडले होते.
फोनवरची बातमी तिच्या कानात डोक्यात घुमत होती. डोळ्याला धारा लागल्या, काही सुचत नव्हतं.
हताश होऊन ती मटकन खाली बसली. छोट्या सईला घेऊन रडू लागली. शाल्विनी धावत जाऊन शेजारच्या काकूंना बोलवून आणलं. सुप्रिया इतकी रडत होती की तिला बोलताही येत नव्हतं. मैत्रिणीने आलेल्या नंबर वर पुन्हा फोन केल्यावर माधव सिरीयस आहे कळलं. मैत्रिणींनी सुप्रियाला धीर दिला, सावरलं . लगेच तिच्या नवऱ्याला बोलवून सुप्रियाची नांदेडला जाण्यासाठी ट्रेनचे तिकीट बुक केले.
सुप्रियाच रडणं बघून शाल्वी घाबरून गेली होती.
मैत्रिणीने मुलींना घरी नेऊन जेऊ घातलं. सुप्रियाच्या घशाखाली घास उतरण कठीण होतं. मैत्रिणीने तिच्यासोबत पोळी भाजीचा डबा दिला.
निघता निघता सुप्रियाने माधवच्या मित्राला फोन करून कंपनीत कळवायला सांगितलं. किती दिवस परत यायला लागतील हे आत्ताच सांगू शकत नव्हती. सुप्रियाच मन खूप वेगात पुढे जात होतं तर ट्रेनचा वेग खूप मंदावला असं तिला वाटत होतं. एव्हाना ॲम्बुलन्स दवाखान्यात पोहचून माधववर उपचार सुरू झाले होते.
सुप्रिया मुलींना घेऊन तडक हॉस्पिटलमध्येच गेली.
माधवची हालत बघून तोंडातून शब्दही निघत नव्हता तिच्या. सासूबाई माधवच्या उशाशी बसल्या होत्या . डॉक्टर सासऱ्यांना पुढच्या ट्रीटमेंट बद्दल आणि लागणाऱ्या खर्चासंबंधी सांगत होते. माधव अजून शुद्धीत आला नव्हता.
डॉक्टरांच्या निदानानुसार माधवला झोपेतच पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि बेशुद्ध झाला. सगळ्यांच्या लक्षात येण्यात बराच वेळ निघून गेला होता. ट्रीटमेंटही उशिरा मिळाली म्हणून डॉक्टरनी सध्याच काही शाश्वती दिली नाही.
सुप्रियाला सगळे देव आठवले. परिस्थितीच तशी होती.
डॉक्टर सुद्धा म्हणालेच, ‘ मी सगळे प्रयत्न करतो शेवटी वरच्याची मर्जी ‘.
सुप्रिया दत्तप्रभूचे अखंड नामस्मरण करत होती.
माधवचे धूकधुक करत असलेले शरीर वेगवेगळ्या नळ्या मास्क सलाईनच्या विळख्यात पडले होते. त्याच्या मेंदूत काय चाललंय हे बाहेरच्यांना कळत नव्हते आणि बाहेर काय चाललंय हे त्याच्या गावीही नव्हते.
डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते तर इकडे सुप्रियाचा देवाला
धावा.
सुप्रियाचे आई-वडील जावयाला भेटायला आले . सुप्रियाने इतके दिवस सांभाळलेला बांध आईला बघताच फुटला.
तीन-चार दिवसांनी माधव शुद्धीवर आला पण हातापायांची हालचाल करता येत नव्हती . डोळे उघडून बघत होता पण नजरेत परकेपणा दिसत होता. आई-वडील आणि सुप्रियाकडे अनोळखी असल्यासारखा बघायचा.
जोपर्यंत तो बोलायचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काहीही कळत नव्हतं.
हालचाल करण्यासाठी त्याच्यात तेवढं त्राणच नव्हतं. म्हणून औषधी तेलाने हाता पायाला मालिश करण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्याचा चांगलाच फरक जाणवायला लागला.
तब्बल एक महिना दवाखान्यात ठेवावे लागले . हळूहळू सुधारणा होत होती , तो हातापायांची हालचाल करू लागला पण नजरेत अजूनही तोच भाव.
सुप्रियाच्या हाकेला दत्तप्रभूंनी कौल दिला पण……..
क्रमशः
इतक्या कमी वयात माधवला अर्धांगवायुचा झटका ? माधव यातून बाहेर येईल की नाही ? सुप्रियाचे प्रयत्न कारणी लागतील की नाही ? वाचा पुढील भागात .
………. मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.









छान कथामालिका.
स्वयंसिद्धा सुप्रियाच्या आयुष्यात पुढे काय घडले असेल……उत्सुकता