झालर सुखाची-मराठी लघुकथा
झालर सुखाची-मराठी लघुकथा

झालर सुखाची-मराठी लघुकथा

मंगलकार्यालय फुलांनी सजले होते. सनईचे मंगल सूर आणि फुलांचा दरवळ वातावरणातील प्रसन्नता वाढवत होते.
आर्या आणि आद्याची लगबग चालली होती.
हो.सर्व कार्य व्यवस्थित पार पडायला  हवे.
आज त्यांच्या लाडक्या बाबाचे लग्न होते.
आर्या आणि आद्याने जमवलेले लग्न थाटात पार पडायलाच हवे बाबा.
आर्याने बाबाला दम दिला होता.
बाबा-मोहित आणि मुक्ताचा सगळ्यांचा विरोध पत्करुन केलेला प्रेमविवाह. लग्नानंतर दोघांना एकमेकांशिवाय कोणी नव्हते.राजाराणीचा संसार सुरु झाला. प्रेम,संसार बहरत गेले.संसारात दोन जुळ्या राजकन्यांचे आगमन झाले.संसार परिपूर्ण  झाला.
श्रीमंतीत वाढलेल्या  मुक्ताला आणि  मुलींना काहीही कमी पडू नये म्हणून मोहित खूप  परिश्रम करत होता.
त्याने स्वतःची कंपनी काढली.
कंपनी नवीन असल्यामुळे जम बसविण्यासाठी त्याचा जास्तवेळ आता बाहेरच जायला लागला.
मुक्ताला दिवसभर एकटेपणा जाणवत राहायचा.
जोडीदाराची सोबत कि समृद्धी असा पेच निर्माण झाला.
सहवासापेक्षा पैसा महत्वाचा ठरत गेला.
अशातच तिच्या आयुष्यात  मोहितचा मित्र रंजन आला.
कलासक्त आणि जीवनाचा पुरेपुर उपभोग घेणाऱ्या रंजनमध्ये मुक्ता गुंतत गेली.
त्याच्या सहवासात तिचा एकटेपणा कमी होत गेला.
भेटीगाठी वाढल्या.दोघे नको तितके जवळ आले.
मुक्ता मोहित आणि सात वर्षाच्या आर्या-आद्याला सोडून रंजनबरोबर निघून गेली.
मुक्ता मोहितचे भरलेले घर रिते करुन गेली.जातांना घरातले सुख,समाधान सोबत घेऊन गेली.
ऐन तिशीत मोहितला मुक्ता सोडून गेली होती.
मोहितसाठी हा धक्का होता.
जिच्यासाठी कमवायचे तीच निघून गेली होती.
दोन मुलींची त्याच्यावर जबाबदारी टाकून. सात वर्षाची आर्या आणि  आद्याची पाळणाघराच्या मदतीने मोहित जबाबदारी पार पाडत होता.
सगळ्यांनी त्याला त्याच्यासाठी,मुलींसाठी दुसरे लग्न कर असा सल्ला दिला.पण मोहित त्याला सोडून गेलेल्या मुक्ताची जागा कुणालाही देऊ शकत नव्हता.
शिवाय दुसरी आई मुलींवर अन्याय करेल याची जणू त्याने खात्रीच बाळगली होती. त्यासाठी त्याने स्वतःवर एकटेपणा लादला. तेरा वर्ष त्याने मुलींना सांभाळले. वेळप्रसंगी मुलांची आई झाला.आर्या आणि आद्या आता विशीत होत्या.
वडिलांचा एकटेपणा त्यांना जाणवत होता.
बाबांनी आपला सांभाळ नीट व्हावा म्हणून एकटेपणा स्वीकारला याची जाणीव झाली कि वाईट वाटायचे त्यांना.
एकदिवस आर्या आद्याला म्हणाली,
आद्या बाबांच्या आयुष्यात कोणी असावी जी बाबांचे एकटेपण दूर करेल असे नाही वाटत तुला?
 
तू बाबांच्या  लग्नाबद्दल बोलतेस आर्या??
 
हो ग.आता आपण मोठे  झालो.आपल्याला आपली मित्रमंडळी आहे.काही दिवसांनी जोडीदारही मिळतील.
पण बाबा ते तर एकटेच राहतील.
 
पण बाबा तयार होतील?
मी विचारते आज.आद्या तुला अनुश्री मावशी आठवते का?
हो.मला आवडायची ती. ती बाबांसाठी ह्या घरात आली तर….
दोघेही तयार होतील का?
आपण करु तयार.
मोहित घरी आला.
बाबा मला तुमच्याशी बोलायचे.
 
बोल नं.
 
आम्हाला कुणालातरी घरात आणायचे आहे.
 
मी समजलो नाही. boyfriend  मिळाले कि काय माझ्या छबकड्यांना.
 
नाही हो बाबा.मी तुमच्याबद्दल बोलतेय.
तुमच्यासाठी कुणीतरी असावी घरात.
 
तुम्ही दोघी आहात की.
 
नाही.आम्ही कायम सोबत नाही राहणार तुमच्या.
 
अरे बापरे! कुठे जाणार तुम्ही?
 
बाबा तुम्ही लग्न करा.
 
काही का आर्या?
आता?या वयात?
 
हो.मी बघून ठेवली तुमची जोडीदार.
 
काय? मी याबाबतीत ऐकणार नाही तुझे.
 
ऐकावे लागेल बाबा.
मी आणि  आद्याने दोघींनी ठरवले. आपले घर majority  वर चालतयं .विसरले का तुम्ही?
 
मोहित विचारात पडला. Majority चा नियम त्यानेच बनवला होता.
बरं कोण आहे ती?
अनुश्री मावशी.
तिचे नाव घेताच मोहितला आठवली ती.
अनुश्री मुक्ताची मैत्रीण. घरी नेहमी यायची.घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अविवाहित  असलेली अनुश्री आर्या-आद्याचे खूप  लाड करायची.
घर सोडून जाऊ नये म्हणून तिने मुक्ताची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.
बाबा.
आर्याच्या आवाजाने मोहित भानावर आला.
आर्या तुम्हाला कुठे भेटली ती?
 
तिची भाची आमच्याच काॕलेजमध्ये आहे.
आर्याने अनुश्री मावशीला घरी बोलवले.
मोहित भेटला तिला.
त्याला लग्नासाठी तयार करायला वेळ लागला पण दोघी  बहिणींनी त्याला तयार केले.
आणि आजचा दिवस उगवला.
आर्या कुठे हरवली?
आद्याच्या आवाजाने आर्या भानावर आली.
कुठे नाही ग.बाबांचे समर्पण आठवत होती.
पूर्ण तारुण्य त्यांनी आपल्यासाठी समर्पित केले.
लग्न लागले.अनुश्री माप ओलांडून घरात आली.
मुक्ताने सोबत नेलेले सुखसमाधान अनुश्री सोबत घेऊन आली.
मोहितच्या समर्पणाला सुखाची झालर लागली……

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!