म्हातारी च्या म्हशी..
एका गावात एक म्हातारी राहत होती. म्हातारी एकटीच राहत होती. राहण्यासाठी तिने तिच्या शेतातच छान घर कौलारू बांधले होते. ती तिच्या शेतात राब-राब राबत होती. तिच्या गोठ्यात तीन म्हशी होत्या. ती तिच्या त्या तीन म्हशींना लेकरांप्रमाणे सांभाळत असे.
रोज सकाळी उठून म्हशींना न्हाऊ घालून, त्यांचा गोठा साफ करून, म्हशीचे दूध काढत असे आणि ते दूध घेऊन ती जवळच्या शहरात विकायला नेत असे. त्यातून मिळालेल्या पैशावर ती तिच्यासाठी भाजी-भाकरी बनवत असे आणि छान छान कपडे विकत आणत असे. अशा रीतीने ती तिचा उदरनिर्वाह करीत होती.
तिला म्हशी शिवाय तिच्या आपुलकीचे असे दुसरे कोणी नव्हते, म्हणून ती तिच्या म्हशींनाच बोलत असे. म्हशींनी तिला जीव लावला होता. म्हशींना ओळख म्हणून त्यांना छान छान नावे पण दिली होती. एका म्हशीचे नाव दिले कोदारी, दुसरीला कोभिंती, तर तिसरीला दिले कोपडिया. म्हशी पण त्यांची नावे घेतली की तिला लगेच हंबारून हुंकार देत असत.
म्हातारी शेतातून आली, म्हशीचे दूध काढत असे आणि ते विकत असे. नंतर घरातली सगळी कामे आटोपून संध्याकाळी बाज टाकून झोपत असे. झोपताना तिला नियमित आपल्या म्हशीला आवाज देण्याची सवय होती. म्हशीचा आवाज ऐकल्याशिवाय तिला रात्री झोप येत नसे.
रोज म्हशीचे दूध विकून तिच्याकडे खूप पैसा जमा झाला होता. ती तो सर्व पैसा एका थैलीत बांधून चोरी होऊ नये म्हणून आपल्या उशीखाली घेऊन झोपत होती. तिची उशी खाली पैसा घेऊन झोपण्याची सवय एका चोराला माहिती झाली होती. त्याने एक दिवस तिच्या घरी चोरी करायचे ठरवले आणि म्हातारी झोपल्यावर अंधाराची वेळ पाहून तिच्या घरात घुसला.
तिने झोपताना नेहमीप्रमाणे पहिल्या म्हशीला आवाज दिला, “कोदारी.” चोर घाबरला, त्याला वाटले म्हातारीने मला दारात पाहिले म्हणून तो धावत येऊन भिंतीपाशी लपला. तिने परत जरा वेळाने दुसऱ्या म्हशीला आवाज दिला, “कोभिंती.” म्हशीला “को भिंती” आवाज दिला ते ऐकून चोराला वाटले की म्हातारीने मला भिंतीपाशीही पाहिले. तो आवाज ऐकून तो घाबरला आणि भिंतीपासून पळत पळत तिच्या घरात गेला व म्हातारीच्या खोलीत गेला.
म्हातारीने नेहमीसारखी पैशाची थैली तिच्या उशीखाली ठेवली होती. चोराला हे आधीच माहित होते. त्याने तिच्या उशीखालील पैशाची थैली चोरली आणि ती जागी होण्याआधीच पळत सुटला. पळता पळता त्याचा पाय म्हशीच्या शेणावर पडला आणि तो तिथेच घसरला. त्याचा पाय मुरगळला.
म्हातारीने हळूच तिसऱ्या म्हशीला आवाज दिला, “कोपडिया.” चोराला वाटले म्हातारीने आपल्याला पडताना सुद्धा पाहिले. आता पळा, आता काही खरं नाही म्हणत पैशाची थैली तिथे सोडून धूम ठोकली.
सकाळी नेहमीप्रमाणे उठून म्हातारीची शेतात जाण्यासाठी लगबग सुरू झाली. ती घर आंगण झाडून घेतल्यावर गोठा साफ करू लागली. तर म्हशीचे शेण उचलताना तिच्या हाताला कसला तरी स्पर्श होतो म्हणून ती उचलून बघू लागली. तर ती तिने जमा केलेल्या पैशाची थैली असते. तेव्हा तिच्या लक्षात येते की रात्री चोर घरी आला होता आणि आपल्या म्हशीमुळेच आपल्या घरी चोरी झाली नाही, आपली पैशाची थैली सुरक्षित राहिली.
सौ. दर्शना भुरे हिंगोली…










मस्तच बालकथा.