विधिलिखित
. . . विजय आजच 10 दिवसाच्या ट्रेकवरून परत आला होता. हिमालय पर्वतराजी मध्ये दहा दिवस मनसोक्त भटकंती करून झाली होती. विजय ने माऊटेनिरिंग चा कोर्स ही केला होता. तो एक ट्रेण्ड ट्रेकर होता. ट्रेकिंग हा त्याने मनापासून जोपासलेला छंद होता.कंपनीच्या कामातून वेळ काढून तो नियमित ट्रेकिंग करायचाच.
आल्यावर जरा विश्रांती घेत होता. त्यावेळेस त्याची आई म्हणाली की अरे तुझ्यासाठी एक स्थळ आले आहे. तू म्हणत असशील तर ऊद्या भेटण्याचा कार्यक्रम ठेऊया. तसा तो गद्धेपंचवीशीतील उतावळा नवराच होता, पटकन हो म्हणाला. आई ने मुलीचा फोटो दाखवला, आणि माहीती दिली. सविता तीचे नाव ती ड्राॅईंग टिचर आहे. सविताचा थोडा सावळेपणाकडे झुकणारा रंग,नाकीडोळी निटस, आणि बडबड्या स्वभावाची, एक लाघवी मुलगी.
दुसर्या दिवशी सविता तीच्या आईवडीलांसह आली. विजयला ती बघताक्षणीच आवडली, तीला ही तो पसंत होता. दोघेही राजी होते, म्हणून प्राथमिक स्वरूपात चर्चाकरून तीचे आई वडील निघून गेले. विजयच्या आईच्या आग्रहाखातर सविता तिथेच थांबली. दुपारी जेवण झाल्यावर आईने तीला घरी नेऊन सोडण्यास सांगितले, आणि मिश्किलपणे एक चिमटा काढून म्हणाली की थेट घरीच सोड!!!
नंतर त्यांच्या भेटी गाठी सूरू झाल्या, अर्थात दोन्हीकडच्यांची त्याला परवानगी होती. तीचा स्वभाव, एकूण वागणे बोलणे त्याला खूपच आवडले.
थोड्याच दिवसात लग्नाचा मुहूर्त ठरला. तसेच साखरपुडा ही पार पडला.साखरपुडा झाल्यानंतर चे दिवस आनंदात जात होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. हनिमून चे प्लॅनिंग, खरेदी, सिनेमाला जाणे, असे सगळेच छान सूरू होते.
एके दिवशी सविता ने सांगितले की ते एका ट्रीपला जात आहेत. पूर्वेकडील राज्यांची. तिथले निसर्ग सौंदर्य खूप बघण्यासारखे आहे. तू ही आमच्यात सामिल हो. विजयला हि ती कल्पना आवडली. लगेच तो कंपनीत सूट्टी साठी बोलला. पण आधीच 10 दिवस ट्रेक ची, आणि पूढच्याच महिन्यात लग्नासाठी जवळपास महिनाभर सुट्टी होणार होती. तसेच काही महत्वाचे प्रोजेक्ट ही मार्गी लावायचे होते.त्याच्या मॅनेजर ने ही बाब त्याच्या लक्षात आणून दिली. थोड्या नाराजीनेच त्याने सुट्टीचे ॲप्लिकेशन मागे घेतले. सविता ही थोडी नाराजच झाली, तीने आपले जाणे कॅन्सल करण्याचे ठरवले. पण विजयने तसे करण्यापासून तिला रोखले. म्हणाला हरकत नाही तू जाऊन ये. नंतर आपण महिनाभर हनिमून ला जाणारच आहोत. आणि फोनवर सतत बोलत राहूच. आणि 10 दिवसाचाच प्रश्न आहे. मी दिल्ली पर्यंत तुमच्या सोबत येतो.
त्यानुसार त्यांची ट्रिप सूरू झाली. विजय दिल्लीवरून परत ही आला. आता 10 दिवसाचा विरह त्या दोघांना सहन करायचा होता.
सतत त्यांचे फोनवर बोलणे सूरू होते. कूठे आहे, कूठे जाणार आहे, काही अडचण आहे का, कोणता ड्रेस घातला आहे, फोटो पाठव एक ना दोन अनेक मेसेजस ,व्हाईस काॅल दिवसातून होत होते.
असे करता करता शेवटी ट्रिप संपली. उद्या सकाळीच ते परत निघणार होते. दिल्ली मार्गे मुंबई आणि तिथून कॅब, अर्थात हा उताविळ नवरा मुंबई ला जाणारच होता. त्या रात्री नेहमी प्रमाणेच चॅटिंग करून उशीरा तो झोपी गेला. उद्या दुपारीच मुंबई ला जायचे होते.
सकाळी स्वारी अगदी खूशीत उठली, त्याच्या आई ला त्याची ही धांदल बघून खूप हसू येत होते. ते दोघे चहा घेत हाॅल मधे बसले होते. विजयने सवयी प्रमाणे बातम्या ऐकण्यासाठी TV सूरू केला. एक ब्रेकिंग न्यूज चालू होती, ती बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, त्याला धड उभे ही रहाता येत नव्हते, अतिशय कासावीस झाला होता.आई ला ही कळेना काय झाले ते. तिने त्याला शांत केले, पाणी दिले, मग त्याने जे सांगितले ते खूप भयानक होते. जी ब्रेकिंग न्यूज चालू होती ती एका विमान अपघाताची होती. ते विमान ईंफाळ जवळच्या जंगलात कोसळले होते. हे तेच विमान होते ज्याने सविता आणी तीचे कुटुंब परत येत होते. आता तर आई चे ही धाबे दणाणले. एवढ्यात तीच्या नातेवाईकांचा म्हणजे काकांचा फोन आला. घरात सगळेच सुन्न झाले होते. काका तिकडे जाण्यास निघाले. विजय ही त्यांच्या बरोबर निघाला. जी बातमी हाती येत होती ती अतिशय वाईट होती. हेल्पलाईन एक तर लवकर अपडेट देत नव्हती. आणि जी माहीती मिळाली त्यानुसार सविताच्या आई वडिलांच्या डेड बाॅडीची ओळख पटली होती. पण सवीताची काहीच खबरबात नव्हती. इतके दिवस आनंदाच्या शिखरावर असलेल्या घरावर शोककळा पसरली होती.
विजय आणि त्याचे काका दुसर्याच दिवशी संध्याकाळी तिथे पोहचले. विजय ने आपल्या एका ट्रेकर मित्राला ही बरोबर घेतले होते. ते क्षणाचीही उसंत न घेता जी वाॅर रूम तयार केली होती तिथे पोहचले. तिथून त्यांना शहरातील सरकारी हाॅस्पिटल मधे जाण्यास सांगण्यात आले. तिथे गेल्यावर त्यानी केलेल्या वर्णनावरून आणि ईतर माहीती वरून काही बाॅडी त्यांना दाखवल्या आणि ज्याची भिती होती तेच झाले त्या बाॅडीज सविताच्या आई वडीलांच्या होत्या. विजय ची नजर सैरभैर झाली, तो सविताला शोधत होता. तीची ही माहीती त्याने सांगितली त्याच्याशी मिळत्या जूळत्या अशा एक दोन बाॅडीज होत्या अगदी धडधडत्या अतःकरणाने विजयने त्या पाहिल्या. पण त्या पैकी सविता नव्हती. मग तो जखमींवर जिथे उपचार चालू होते तिथे गेला, सगळा वाॅर्ड त्याने एकदा नाही तर अनेकदा पालथा घातला, पण सविता कोठेच दिसत नव्हती. त्याची काळजी आणखी वाढली.तो अगदी हतबल झाला होता, एक मन सविता ठिक असेल असे सांगत होते तर दुसर्याच क्षणी मनात अगदी उलटेच विचार येत होते. तिचे काका पार्थिव घेऊन जाण्यासाठीच्या औपचारिकता पूर्ण करत होते. त्या कामात विजय चा मित्र अनिल त्यांना खूपच मदत करत होता. खरे तर सगळी धावपळ तोच करत होता, फक्त काही सह्या,ओळख देणे वगैरे काका करत होते. होता होता तो ही दिवस उलटला. जखमींना घेऊन येणारी प्रत्येक गाडी विजय अगदी डोळ्यात प्राण आणून तपासत होता, पण सविता काही दिसत नव्हती. डेडबाॅडीज ची ही तो चौकशी करत होता. पण कोठेच काही हाती लागत नव्हते.
इकडे सगळ्या औपचारिक ता पूर्ण होऊन काका निघायला तयार झाले होते. पण सविताचे काय हा प्रश्न त्यांनाही भेडसावत होता. मोठ्या कठीण प्रसंगात ते सापडले होते. इथून निघून जावे आणि सविता सापडली तर….आणि न जावे तर हे पार्थिव किती दिवस ठेवणार.
शेवटी अनिल ने सूत्रे हातात घेतली.एक त्रयस्थ म्हणून तोच एक लाॅजिकली विचार करण्याच्या मनस्थितीत होता.
त्याने काकांना आई वडीलांचे पार्थिव घेऊन जाण्यास सांगितले.आणि विजय व तो तिथेच थांबून आणखी एक दोन दिवस वाट पहाणार होते.
त्याप्रमाणे काका रवाना झाले. आणि हे दोघे पुढचा विचार करू लागले. एव्हाना NDRF ने पुढील 24 तासात तपासकार्य थांबवणार असल्याचे जाहीर केले. पण जर कोणाला काही सुगावा लागला तर मदतीसाठी ते तत्पर होते.
आता मात्र विजय खूपच दडपणा खाली आला. तीच्या आठवणींनी तो व्याकूळ झाला.
तो आणि अनिल एके ठिकाणी चहा घेत बसले होते. विजयच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. तो अनिल ला म्हणाला…. चल…सरकार पातळीवर प्रयत्न सुरूच आहेत….आपण ही जंगलात घुसू…आणि शोधायला सुरूवात करू…आपले ट्रेकिंग चे प्रशिक्षण कधी कामाला येणार…..आणि मी पूर्ण प्रयत्न केले याचे मला समाधान राहिल…..फक्त जे काही आवश्यक सामान, साहित्य लागेल ते विकत घ्यावे लागेल इतकेच…..
आता अनिल ला ही ही कल्पना अगदीच निरर्थक वाटली नाही, प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो.
लगेच दोघे निघाले. वाॅररूम मधे जाऊन आपली ओळख दिली सर्टिफिकेट दाखवले आणि जंगलात उतरण्याची परवानगी मिळवली. जंगल अधिकाऱ्यांनी अती धोकादायक अशी काही ठिकाणे सांगितली आणि तिकडे न जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच दुर्गम भागात मोबाईल चालू शकणार नाही, हे माहीत असल्याने, हॅम रेडीओ ही दिला. जेणे करून कोठूनही ते NDRF शी संपर्क साधू शकतात.
आवश्यक साहित्य घेऊन ह्यांनी जंगल तुडवायला सुरवात केली. जिथे अपघात झाला होता त्याच्या आसपास शोधण्यात अर्थ नव्हता. कारण NDRF ने त्या परीसरात शोध घेतलाच होता. ते ती मर्यादा सोडून त्याच्या पूढे जाऊन बघू लागले. त्यांनी ठरवले की विमान ज्या दिशेने आले त्या दिशेला काही किलोमीटर आणि जिथे पडले त्याला काटकोनात काही किलोमीटर असे शोधायचे. पण तिकडे अधिकाऱ्यांनी सांगितलेले अतीधोकादायक असे ठिकाण होते. तरीही सगळे धैर्य एकवटून ते निघाले. मधे एक ओढा वहात होता. पाण्याचा जोर ही खूप होता. अनिल म्हणाला की कोणत्याही जखमी व्यक्तीला असा ओढा आलांडून पूढे जाता येणार नाही. आपण मागे फिरून दुसर्या दिशेने शोधायला सुरूवात करू. विजयच्या मनात वेगळाच विचार आला. एक शक्यता अशी ही आहे की विमानाचे जसे तूकडे इतस्ततः उडाले तशीच आतली माणसे ही फेकली गेली असतील. आणि सविताही ह्या ओढ्यात येऊन पडली असेल आणि पाण्याबरोबर वहात गेली असेल. अनिल ती शक्यता नाकारू शकत नव्हता. ते दोघेही पाण्याच्या दिशेने पूढे जाऊ लागले. बरेच अंतर चालल्यावर एके ठिकाणी ते थोडे विसावले थोडे सावरल्यावर आजूबाजूला नजर टाकून अंदाज घेतला. आकाशात थोड्या दूर अंतरावर गिधाडे घिरट्या घालत होती. दोघांच्याही ते लक्षात आले. ह्याचा अर्थ काय हे त्या दोन प्रशिक्षित ट्रेकरला सांगण्याची गरज नव्हती. विजय ओरडलाच अनिल चल लवकर…..ते दोघे त्या दिशेने धावत सुटले. एके ठिकाणी एक कपडा फडफडत होता. हे आणखीन वेगात धावू लागले. अखेर त्या ठिकाणी पोहचले. तर तिथे सविता एका झूडपाला अडकली होती.पाय पाण्यात आणि डोके जमिनीवर अशा अवस्थेत ती पडली होती. विजय वेड्यासारखा धावत सूटला, आणि तिथे पोहोचला. आधी त्याने ती जिवंत आहे का हे नाकाला बोट लाऊन पाहिले. श्वास चालू होता. तो आनंदाने ओरडू लागला. त्यानी तीला नीट बाहेर काढले. ती खूपच जखमी अवस्थेत होती. ताबडतोब त्यांनी प्रथमेपचाराला सुरूवात केले. त्याच बरोबर NDRF च्या पथकाशी संपर्क साधला ,सविता प्रथमोपचाराला प्रतीसाद देऊ लागली होती. तीला थोडी शुद्ध आली. तीने विजय ला पाहीले….आणि ईतकेच म्हणाली …मला खात्रीच होती की तू येणार……एवढे बोलून तीची शुद्ध परत हरपली.
ते दोघे आता NDRF च्या पथकाची वाट पहात होते. तेवढ्यात जोरदार पाऊस सूरू झाला. तीला उचलून एक मोठ्या खडका आड आणले. ते जिथे होते ते ठिकाण अतिशय दुर्गम भागात होते. म्हणून NDRF ने हेलीकॉप्टर ची मदत घेतली. आणि त्या तिघांना शहरात आणून हाॅस्पिटल मधे पोहचवले. सवितावर आता व्यवस्थित उपचार सूरू झाले. तपासणीत तीचा एक पाय फॅक्चर असून मणक्यालाही इजा झाली असल्याचे समजले. ती अजून बेशुद्ध च होती. पण उपचारांना प्रतिसाद देत होती. विजय ने सगळी परिस्थिती घरी कळवली. ते लगेच ईकडे यायला निघाले. आता प्रश्न होता की….तीला आईवडीलांच्या निधनाची बातमी कशी द्यायची?
तीला एक दिवस उलटून गेल्यावर शुद्ध आली. जरा सावरली ही होती.
विजय तिच्यापाशी बसून होता. ती आईवडीलांबाबत विचारत होती. पण विजय काही तरी सांगून वेळ मारून नेत होता. तीचे काका इतर नातलगांना घेऊन आले. तीचे पुढचे उपचार तिथे न करता, ईकडे पुण्यात करण्याचे ठरले. काका काकूंनी अगदी हळूवारपणे तीला आईवडिलांच्या निधनाची बातमी दिली. ती ओक्साबाक्शी रडू लागली. तिला शांत होण्यासाठी खूप वेळ लागला.
पुण्यात आल्यावर तिच्यावर उपचार सूरू झाले. मणक्याचे छोटेसे ऑपरेशन करावे लागले. त्यामुळे ती एक दोन महीने अंथरुणावर पडून रहाणार होती.
Discharge च्या दिवशी, काका काकू तीला घेऊन जायला आले पण विजयच्या आई ने ठाम भूमिका घेतली की आता आमच्या घरची झाली आहे. तीचे पुढचे सगळे आम्हीच करू. आम्ही तिला आमच्या म्हणजे तिच्याच हक्काच्या घरी घेऊन जातो.
थोडावेळ हे तिच्या नातेवाईकांना पटले नाही. पण आई ने आपली भूमिका सोडली नाही.
विजय ही मागे लागला. त्यामुळे तिला तिकडे नेण्याचे ठरले.
ते सगळेच विजयच्या घरी आले.
काही दिवस गेले, तसा विजयने लग्नाच्या मुहूर्ताचा विषय काढला. आता कसे करायचे.
सगळ्या नातेवाईकांची चर्चा सूरू झाली. पडल्यापडल्या सविताही त्यात सहभागी झाली होती. ती म्हणाली की लग्न आता फक्त एक समाजासाठीची औपचारिकताच आहे. ज्यावेळेस विजय मला शोधत तिथे आला…..तेच माझ्या दृष्टीकोनातून खरे लग्न, आणि आईंनी हाॅस्पिटल मधून मला थेट ईथे आणले तोच माझा गृहप्रवेश.
मग ठरलेल्या मुहूर्तावर फक्त रजिस्टर लग्न करण्याचे ठरले.
यथावकाश ते पार ही पडले. सविताही आता हिंडूफिरू लागली होती. विजय आणि त्याची आई तिची खूप काळजी घेत होते..एके दिवशी तीने हनिमून चा विषय…जरा चाचरतच दोघांपाशी काढला….त्यांना खूपच आनंद झाला…..कारण सगळ्या अतीशय दूखःदायक प्रसंगातून ती सावरली असल्याचे ते प्रतिक होते…….आई ने आनंदाने विचारले….कूठे जायला आवडेल ते सांग….लगेच व्यवस्था करतो……ती म्हणाली जिथून तू मला मरणाच्या दारातून ओढून आणले तिथेच मला जायला आवडेल…..
वैशाली जोशी खोडवे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
खूप छान कथा
खूप छान कथा . विषय साधाच तरी पार्श्वभूमी, विषयाची मांडणी चांगली केली आहे