१०-आत्मचरीत्र-न लिहिलेले-शब्दपर्ण
दोन रात्रीत पूर्ण आयुष्य
आई गेली.सरुला आता माहेर म्हणून माझेच घर होते.दर दिवाळीत मी तिला घ्यायला जायचो.
लग्नानंतर शब्दाला जागत सरुला घरच्यांनी शिकवले.ती एका शाळेत संगीत शिक्षिका म्हणून लागली,दोन गोड मुली झाल्या. सरु मुळातच शांत होती.माझ्यासारखीच तिही कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही.आयुष्य जसे समोर आले तसे आम्ही स्विकारत गेलो.
काही आठवणी दुःखद असल्यातरी काही आठवणी सुखदही आहेत.
कावेरी आणि मला सुगंध आणि नंतर जुई झाली.दोघेही सरळ वाटेने चालणारे.
व्यवस्थित शिकले,नौकरीवर लागले.आपापल्या संसारात रमले.
आॕफिसमध्ये प्रमोशन होत मी चांगल्या पोस्टवर गेलो.राहणीमान सुधारले.आधीच्या गरीबीतील दिवसांचा मागमुसही राहला नाही.पण आई लवकर गेल्याची खंत मात्र कायम राहली.
दिवस बदलत गेले.अगदी वेगात बदलले.लहानपणी बाजूच्या गावात उन्हाळ्यात टुरींग टाॕकीज यायची. दिवसा बंद असायची.रात्री एकच शो असायचा. तिथे आम्ही मित्र,आणखी बरेच जण सिनेमा बघायला जात असू.सोबत बसण्यासाठी छोटी गोधडी नेत होतो.
Picture clarity,Sound system….या गोष्टींशी आमचा काहीएक संबंध नव्हता.पडाद्यावर जे दिसेल ते डोळे फाडून बघत होतो.
तेव्हा सिनेमात बघितलेला टेलिफोन घरी आला. काही वर्षातच त्याची जागा मोबाईलने घेतली.बैलगाडीत फिरलेलो मी सायकल,मोटरसायकल आणि आता कारपर्यंत पोहचलो.
दिव्याखाली अभ्यास करायचो. आता घरात वेगवेगळ्या प्रसंगी लावायचे वेगवेगळी लाईटस् आहेत.
मामानी दिलेला रेडिओ गावभर फिरवणारा मी आधी ब्लॕक अँण्ड व्हाईट टी.व्ही,नंतर कलर टी.व्ही,केबल…यांच्या जाळ्यात अडकत गेलो.वस्तू मिळत गेल्या तसे त्यांचे अप्रुपही कमी होत गेले.
आयुष्यात जुने बंध आता फार कमी उरले.प्रभाकर,श्रीहरी भेटायचे.एकमेकांच्या मुलांच्या लग्नात आवर्जून गेलो आम्ही.खेड्यात राहून,आयुष्यभर शेतात राबून दोघेही लवकर थकले.प्रभाकर मागच्या वर्षी गेला.आता श्रीहरी, आणि सरु हे दोनच जुने बंध आहेत.
सरु निवृत्त झाली.आता दोघांनी आरामात जगायचे असे ठरवले तर तिचे यजमान हार्टअटॕकनी गेले. एक मुलगी आता कुटुंबासह तिच्याच जवळ राहते.
एकत्र बालपण घालवलेले आम्ही आता सहा सहा महिने भेटतही नाही.वयानुसार सगळ्या नात्यात अंतर पडत गेले.शाळेत केवळ माझाच आधार वाटणारी सरु नंतर समंजस झाल्यावर स्वतःला सांभाळायला लागली.
पण आधीचे तिचे माझ्या आधारावर राहणे जास्त छान वाटायचे.माझी छोटीशी सरु …..
मधल्या काळात बालपणापासून दूर गेलेला माणूस वय वाढले कि पुन्हा बालपणातच रमतो.
शरदरावांनी डोळे पुसले.बाजूला झोपलेल्या कावेरीकडे बघितले.
सगळे सगळे स्वच्छ आठवत आहे. वय झाल्यामुळे वर्तमानात डोळ्यांनी काही गोष्टी धूसर दिसतात पण भूतकाळातील आठवणी मात्र लख्ख आहेत.
लिहावे का आत्मचरीत्र?
पण माझ्यापुरत्या असलेल्या माझ्या आठवणींचा सुगंध सर्वाना जाणवेल?
नाही.कावेरी माझ्या मनातल्या सुगंधाला क्षमा करु शकेल?
तिला वाईट वाटेल.मी तिची प्रतारणा केली असेच वाटेल तिला.
माझी मुले,नातु माझ्या आठवणीतील दिवसांपर्यंत पोहचू शकतील? नाही.
आठवणी ज्याच्या त्याच्या स्वतःपुरत्या असतात.त्यातील सुख,दुःख स्वतःच अनुभवायचे.
बहूतेक आठवणींना दुःखाची किनार का असते?
बापाशिवाय गेलेले बालपण, आई,शाळा,सवंगडी, कौलारु घर,नदी,सुगंधा….
नको. नको त्या आठवणी.
त्यांना इथेच थांबवायला हवे.
माझ्या जोडीदारालाही मी माझ्या आठवणीत सामील करु शकत नाही.
दोन रात्रीत पूर्ण आयुष्य पुन्हा एकदा जगलो.सगळ्यांना भेटलो.
पण त्याला कागदावर उतरवणे? नको.
त्या आठवणींना इथेच थांबवायला हवे.
माझे आत्मचरीत्र….न लिहिलेले
शरदरावांनी डायरी आणि पेन खाली ठेवले.
समाप्त
(प्रिय वाचक,कथामालिका आवडल्यास अवश्य कळवा. तुम्हीही तुमचे लिखाण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
संपर्क
मेल-shabdaparnamarathi@gmail.com








कथामलिका आवडली.