तर्पण
“हॅलो, गिरीश काका,
मी मुक्ताची आई बोलते, आज आमच्या सासऱ्यांची पक्ष तिथी आहे,तुम्ही दुपारी ब्राम्हण म्हणून या हो,….”
दरवर्षी प्रमाणे मी सकाळीच गिरीश काकांना फोन केला.पण यावेळी त्यांचे अपेक्षित उत्तर मिळाले नाही.
“ताई,मी आता नव्याने duty join केली आहे, रात्री घरी यायला सात वाजतात, आता नऊ वाजता निघणार आहे.सात वाजता खूप उशीर होईल.कसं करायचं?”
अगोदरच यांची तब्येत ठीक नव्हती. मी विचार केला, यांना आता सात वाजेपर्यंत जेवता येणार नाही.तरीही ब्राम्हणांच्या पूजेच समाधान म्हणून “हो, ठीक आहे, या म्हटलं, आम्ही वाट पाहू.”
मानवी मनाच्या या चलबिचल अवस्थेची मला मोठी गंमत वाटते नेहमी. आपण जिवंत पणी माणसांची सेवा केली, हवी तशी हे एक समाधान गाठीशी होत, म्हणून या श्राद्ध-पक्षाचं मी फारसं अवडंबर करत नव्हते. मेल्यावर कावळ्याला खाऊ घातल्यापेक्षा जिवंतपणी हवं ते करून घालावं ,असं वाचलं होतं,पण तरीही परंपरेप्रमाणे करण्यास कधीच नाकारले नाही. यथायोग्य ते करायलाच हवं….!
दुपारचे बारा वाजले.पुन्हा मनाची चलबिचल सुरू झाली. यांची गोळ्या घेण्याची वेळ झाली. त्यांनी गोळ्यांचा डबा उघडला, एकदा बाबांच्या फोटो कडे पाहिले, पुन्हा बंद केला.त्यांची अस्वस्थता मला जाणवत होती. शेवटी त्यांना दुधाची दशमी आणि कोरडी भाजी एक ब्राम्हणांची परवानगी घेऊन खाण्यास आग्रह केला, आणि गोळ्यांचा डोस वेळेवर दिला. तरीही मनाची अस्वस्थता कायम होती.
एवढ्यात माझा फोन वाजला.,
“हॅलो,…..” मी
“जय योगेश्वर……” समोरून.
“जय योगेश्वर, जोशी काका🙏” मी बोलले.
“कसे आहात काका? तब्येत काय म्हणते?”
“मी बरा आहे, अहो,$$ आज आजोबांची पक्ष तिथी आहे ना? मग मला नाही बोलावलंत? मी आलो असतो ना….एव्हाना…!
गिरीश राव चा फोन आला होता, म्हणाले, देशपांडे ताईकडे जा,आधी. मला उशीर होईल, त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात. ते जेवणार नाहीत,
मी येतो आता लगेच…..!”
“काका तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला त्रास द्यावा असं वाटलं नाही म्हणून …..”
माझं बोलणं संपायच्या आत जणू फोन ठेऊन ते निघालेही असणार,असा अविर्भवात फोन ठेवला होता त्यांनी.
आता कुठे आमच्या मनाची चलबिचल आणि अस्वस्थता
थांबली होती. जे होत ते चांगल्यासाठीच, म्हणत मी पूजेच्या तयारीला लागले. आणि जोशी काकांची यथोचित पूजा झाली. गिरीश काकांनी त्यांना फोन करावा आणि जोशी काकांनी वेळ साधून नेण्याची बुद्धी जणू परमेश्वरानेच त्यांना द्यावी आणि पित्र संतुष्ट व्हावेत याच विचाराने मी मनोमन सुखावले.
सौ. प्रिया देशपांडे…..✍️
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
आपल्या प्रामाणिक इच्छा देव जाणतो.
खूप छान कथा