येस बॉस
स्थळ : दिल्ली , ऑफिस जवळच एका कॉलेजचे मैदान कंपनीच्या टीम बिल्डिंग साठी अधून मधून काही स्पोर्ट्स घेण्याचा रिवाजच म्हणावा लागेल त्याला. सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे अर्थातच क्रिकेट . दोन कंपन्या म्हणजेच employee आमने-सामने . जणू भारत पाकिस्तानचा जोश सगळ्यांमध्ये. सतत बैठे काम करून करून ढेऱ्या सुटलेले वरिष्ठ आणि त्यांच्या बघून आपल्याही ढेऱ्या सुटू नये असे वाटणारे तरुण इंजिनियर्स, शरीराच्या नकाशाचा आराखडा बिघडलेले इंजिनियर्स , कंपनीने दिलेले टी-शर्ट परिधान करून मैदानात उतरले .
समीर बॉसच्या थोड्याफार मर्जीतला असं सगळ्यांना वाटत होतं म्हणून टॉस चा कॉइन त्याच्याकडे आला. मानाची मोहर समजून त्यांनी उजव्या तळव्यावर घेतली . अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत पकडून जेवढी ताकद एकवटता येईल तेवढी गोळा करून उंच भिरकवली . सगळ्यांच्या माना एकाच वेळेस वर उंचावल्या आणि लगेच जमिनीकडे .
टॉस जिंकून बॉस ने आधी फलंदाजी करायचे ठरवलबॉस : हा जो बॉस नावाचा प्राणी अतिशय चिडका होता. माघारी सगळे त्याला हिटलर किंवा मेंटल म्हणत असे. अग्निसाक्षी सारख्या नाना पाटेकर सारखा. घरी बायकोला मारतो की काय ? हे पण कोणीतरी एकदा जाऊन बघून आले म्हणे. पण ऑफिसचा मुखवटा त्याचा वेगळा होता. आवाजही नानासारखा कडक . ऑफिस मधे सगळे त्याला टरकून असायचे. बोलायचा म्हणजे समोरच्याचा अपमान केल्यासारखा, फटकळ. म्हणून कोणीच त्याच्या जास्त वाटी जात नसे.
तर असा हा जहाल बॉस.
मैदानावर सर्वजण सारखेच असतात . कोणीही कोणाचा वरिष्ठ नसतो आणि कोणी कनिष्ठ . पण बॉसचा तोरा आहे तसाच. हिम्मत कोण करेल त्याला बोलायची , मांजराच्या गळ्यात घंटा बांधील कोण ?
खेळ सुरू झाला समीरच्या कंपनीची पहिली फलंदाजी झाली.
25 ओव्हर मध्ये 96 धावा आणि आठ विकेट असा अफलातून स्कोअर झाला . आता गोलंदाजी सुरू झाली. पहिला ओव्हर अर्थातच बॉसने टाकायचा. त्यांनीच ठरवलं .
कंपनी फुल्ल जोश मध्ये
पहिला ओव्हर, बॉसचा पहिला चेंडू यष्टी पासून सात फूट दूर म्हणजे वाइड पडला. बॉस कसं नुसं हसला . कोणी काहीच बोलले नाही, फक्त एकमेकांकडे नजरा नजर .
समीरने खुणेनेच बॉस ला इट्स ओके म्हणाला.
दुसरा चेंडू ……हे काय पुन्हा वाइड.
आता समीरच्या टीमचे एक एक जण बॉसच्या जवळ जाऊन बॉलरचा उत्साह वाढवू लागले , काही ट्रिक सांगू लागले, तर काही ‘ सर काही नाही होत, प्रॅक्टिस नसली की होते असेही कधी कधी ‘ अशी समजूत घालायला लागले . थोडक्यात
बॉसच्या मर्जीत राहायचा प्रयत्न.
तिसरा चेंडू टाकायच्या आधी बॉसने हाताने छातीवर क्रॉस केला. बॉस ख्रिश्चन होता .
तिसरा चेंडू टाकला पण पुन्हा तसाच वाइड .
आता विरुद्ध टीमने चिडवायला सुरुवात केली. प्रेक्षकांमध्ये हशा उडायला लागला. समीरच्या टीमचाही संयम सुटत चालला होता. त्रस्त झाले सगळे . एकमेकांजवळ येऊन काहीतरी धुसफूस करायला लागले. बॉस केविलवाणे तोंड करत समीर जवळ आला आणि म्हणाला मी बॉलिंग सोडतो . हा म्हणे ठीक आहे .
तसेही त्याच्या विरुद्ध जाण्याची ताकद नव्हती. पण नियमानुसार विरुद्ध टीमने ऐकले नाही. मग काय बॉसचा आणि समीरचाही नाईलाज झाला . उर्वरित चेंडू टाकल्याशिवाय पर्याय नव्हता.
बॉस फक्त कंपनी पुरता होता हे त्याच्या लक्षात आलं एव्हाना. समीर त्याच्या जवळच असल्याने त्याचा चडफडलेला चेहरा त्याने पाहिला. बॉसला अपमानित वाटत होते .
चौथा चेंडू त्याने सगळ्यांचे देव आठवून टाकला आणि पुन्हा वाइड पडला. Commentator ला अगेन वाइड म्हणायची सवय झाली असेल.
आता मात्र बॉसवर हल्ला चढवला सगळ्यांनी. सगळे भांडायच्या आवेशात होते . विरुद्ध टीम एका जागी होऊन मजा घेत होती . खिल्ली उडवत होती .
टीम मधील खेळाडू कोणाचेही ऐकायला तयार नव्हते . खूप वादावादी सुरू झाली . काहीतरी अघटीत घडणार की काय अशी शंका समीरला आली . सगळ्यांना बॉस वर चिडून धावून जाऊन बोलायची आयती संधी मिळाली होती. समीर प्रसंग पाहून चूप बसला आणि लांब उभा राहिला.
आता हे आपसातील वादाचे प्रकरण फारच चिघळू लागले. बॉस झाडीत शिंग अडकलेल्या हरणासारखा वाटत होता . समीर मागे असण्याचे काही जणांच्या लक्षात आले. सर्वांनी मोर्चा त्याच्या दिशेने वळवला. जणू तो पंच होता.
समीर: समीर म्हणजे कंपनीतला हवा का झोंका. शांत, संयमी , सोज्वळ . कोणाच्याच वाकड्याला जायचा त्याचा स्वभावच नाही. मग बॉस तर सोडाच . कंपनी नियम शिस्तीत पाळणारा एकमेव प्रामाणिक एम्पलोयी . बॉस कडून अपमानित होऊन येणाऱ्याचा तो सामंजस्याने निवाडा करायचा , कोणालाही नाराज न करता. सगळे बॉसच्या तक्रारी त्याच्याकडेच आणायचे त्यामुळे बॉसची पण त्याच्यावर विशेष मर्जी . बॉसपेक्षा तो फक्त पाच सहा वर्षांनी लहान पण बॉसच्या चुका हसत खेळत त्याच्या गळी उतरवण्याची कला त्याच्यात होती .
तर असा हा मवाळ समीर .
तर ओव्हर टू मॅच
चिडलेल्या कंपनीच्या लोकांचा मोर्चा समीर कडे वळला त्याला मात्र जाम टेन्शन काय बोलावे सुचेना. टीमची बाजू घ्यावी की बॉसची . दोन्ही पक्षांची त्याच्याकडून अपेक्षा होती , पण इतक्या गर्दीतही बॉसला त्याच्याकडून त्याची बाजू सांभाळावी हे चेहऱ्यावर दिसत होतं . समीर पार कोंडित अडकला. असं तर कधी कंपनीत पण झालं नव्हतं. हे प्रकरण समीरने हाताळावे व निपटावे, असेच बॉसने खुणेनी त्याला सांगितले . समीरच्या हे पक्क लक्षात आलं की आता जर बॉसची बाजू मांडली नाही तर तो भडकणार आणि त्याचे पडसाद कंपनीत उमटणार. होतास तो तसा चिडका . सगळे मित्र सांगत होते चूक बॉसचीच आहे. इकडे टीम मित्रांची पण अपेक्षा त्यांची बाजू घेण्याची. द्विधा मनस्थितीत गोंधळून अचानक चुकून समीरच्या तोंडून निघाले की “बॉसची यात काहीही चूक नाही “. चुकून का होईना त्याच्या तोंडून हे वाक्य ठासून निघाले , त्यालाही आश्चर्य वाटलं .
आता मात्र सगळे मित्र त्याच्याकडे अवाक् होउन बघू लागले. मोर्चा पुन्हा त्वेषाने त्याच्याकडे वळला. सगळे समीरशी वाद घालू लागले . बॉस थोड्या वेळा करता बाजूला पडला. त्याच्या अशा बोलल्याने बॉसची आशा पल्लवीत झाली . तो समोर येऊन म्हणाला , सगळ्यांनी समीरचं बोलणं ऐकून तर घ्या, हाच पहिल्या चेंडूपासून माझ्या बाजूला होता .
बुडत्या बॉसला समीर नावाच्या काठीचा थोडासा आधार मिळाला .
बोल बोल समीर तुला काय सांगायचे अगदी बिनधास्तपणे सांग.
कंपनीतील वाद , कुरबुरी हाताळण्याचा असाही परिणाम झाला होता तर.
आता त्याने ठरवून म्हटले बॉसची यात काहीही चूक नाही,
ही खेळपट्टीच वाकडी आहे
बॉस एकदम खूष झाला. तो समोर आला समीरला वाटलं आता हा आपल्याला उचलून घेतो की काय ?
पण तिथेही वाइड पडला .
बॉस वर चिडलेली टीम आता समीरवर भडकली.
समीरच्या टीमची फजिती बघून विरोधी टीमला हसू आवरेना
“काहीही काय बोलतो समीर यार , याआधी या खेळपट्टीवर एक मॅच झाली, एका कंपनी टीमची “.
पण आता बॉस कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता . समीरला नव्हे तर त्याचे वाक्य त्यांनी खूपच उचलून धरले. आता तर सर्वांना अजून हसु आवरत नव्हते. टीम आणि विरोधी टीम बॉस च्या फजितीने हसून मजाक उडवू लागले. कारण त्याची गत ‘नाचता येईना अंगण वाकडे ‘ अशी झाली होती. या सर्व प्रसंगाने आगीत तेल ओतण्याचे काम केले . अपमानातून बॉसचा अहं पुन्हा जागृत झाला होता . झालेला अपमान त्याला खूपच सलत होता. या एका कारणाने रागात येऊन त्याने पुढील खेळच बंद पाडला. समीर थोडक्यात बचावला होता आणि या झाल्या प्रसंगाने बॉस त्याच्यावर फिदा झाला होता. त्याला कुठे ठेवू अन् कुठे नाही असं झालं होतं . जहाल वर ..समीरने मृदू आणि चलाख स्वभावामुळे कठोर बॉसचे मन जिंकले समीरने खेळाचा खंडोबा होण्यातून मार्ग काढून नेहमीप्रमाणे जबाबदारी लीलया पेलली, हे विशेष.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात. बॉसची खोड मैदानावर चांगलीच उतरली होती. खेळ एक दिवसाचा , पण बॉस रोजचाच.
आता उद्या कंपनी ऑफिसमध्ये बॉस काय गोंधळ घालणार? या विचारात टीम होती तर उद्या ऑफिसमधे employee पुढे आपण तोरा कसा मिरवणाऱ या विचारात बॉस.
मुळ कथा : समीर
शब्दांकन : मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
मोहिनी सुंदर आणि छान शब्दात मांडणी केली तू. 👏 👏 👏 👏
सुंदर विनोदी कथा. अतिशय सुंदर शब्दांची मांडणी. खेळाचा अप्रतिम वर्णन अणि चित्रांकन. नैसर्गिक विनोद 😀😀😄
मुळकथा आणि शब्दांकन दोन्हीही सुंदर
छान
झ का स…. गोष्ट…..एक च नंबर