१६-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
Written by-ज्योती रामटेके
आता नमुला दादाची काळजी वाटायला लागली.सर्व भावात समजदार आहे तो. बाकीचे भाऊ आहेत श्रीमंत.
पण पियूष दादा सर्वात मोठ्या मनाचा आहे. मी त्याची लहान बहीण, मुलीसारखी आहे .तो कधी रागावून बोलणार नाही. सारे काही प्रेमाने सांगतो. वहिनी पण तशीच मायाळू..लाघवी, कुणालाही आपलेसे किती लवकर करते ती.मला पण किती जीव लावते.आईसोबत होतात कधी वाद. आई वागते पण तशीच. फक्त मुलाचा विचार करते. सुनेला भाव.. भावना आहेत याचा विसर पडतो तिला. कधीतरी वहिनीला समजून घ्यायला हवे. वहिनी मात्र आपले कर्तव्य चोख बजावते.
आईचे हे आधंळे प्रेम वहिनीला आवडत नाही. स्वकर्तृत्वावर दादाने काहीतरी करुन दाखवावे असे तिला वाटते. आपला नवरा समोर गेलेला कुणाला आवडणार नाही. ती स्वतः किती मेहनत करते. पैसा जोडून ठेवते. दादाच्या वागण्याने दुःखी आहे बिचारी. होईल सर्व ठीक. समजदार आहे तो.
नमु सर्वात लहान बहीण.चंदनाची जवळची सखी. म्हणायला नणंद पण दोघी बहिणी सारख्या समजून घेतात एकमेकींना.
चंदनाचे रोजची कामे सुरू होती. मुलांचा अभ्यास.. तिचे काॅलेज, स्वयंपाकाच्या ऑर्डर वाढत होत्या.
सर्व ठीक होईल या आशेवर जगणे सुरू होते. दुकानाचा
विषय तुर्त तरी मागे पडला होता. तुला खायला, राहायला घर आहे नं,मग कशाला त्याला त्रास देते सासुबाई म्हणायच्या.
दिवस चालले होते. एखाद्या वेळी खेड्यावर पियूष थांबायचा. शेतीवाडी होती तिथे. कुठेतरी नवरा मेहनत करत आहे याचे चंदनाला समाधान वाटत होते. यंदा तरी पीक-पाणी पियूषच्या मनासारखे व्हायला हवे असे वाटायचे तिला. पियूषच्या वागण्याने घरातील वातावरण दुःखी झाले होते. बाबाला त्याचे वागणे आवडत नव्हते.
पण काय करणार? त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. सुमनताईला तर कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य कळत नव्हते.
किती दिवस अशा वातावरणात जगायचे?मुले कोमेजून गेली.आपल्यावर जिवापाड माया करणारे बाबा का असे बदलत आहेत त्यांना पण कळत नव्हते.आजकाल बाबा आईसोबत पूर्वीसारखे वागत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.आई आजकाल नाराज दिसत आहे हे त्यांनी मावशीच्या कामावर टाकले. अरे तिला बरे नसेल. कामाची दगदग होते तिला असे सांगून अपर्णाने समजूत घातली मुलांची.
मुलांचे दुःख चंदनाच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. मुलांना घेऊन शेतावर जायचे का? मजा वाटेल त्यांना. बराच काळ लोटला कुठे गेलो नाही. मलाही तेच,ते.. कंटाळा आला. आपले घर आहे राहायला थांबू दोन दिवस.किती सुंदर आयुष्य आहे खेड्यातील. लोक मनाने निरागस.
तिने पियूष कडे शेतावर जाण्याचा विषय काढला.
अग.. आता कुठे जमेल? दुकानाचे बघायचे आहे मला.
तुला जायचे असेल तर जा.
मी तुमच्या शिवाय कुठे जाते का ? ठीक आहे नंतर जाऊ.
चंदनाला सर्व कल्पनेच्या पलिकडले वाटत होते.
दिवस विचारात निघून गेला. रात्र झाली. नमु हसतच आली.
काय वहिनी.. गेला का दुरावा.. कुठे गेली होती जोडी.
बरे झाले बाई.. तुमचे भांडण मिटले. दादाच्या मित्रात तुमची जोडी आदर्श म्हणून प्रसिद्ध आहे. किती लोकांचे भांडं मिटवले तुम्ही.त्या सीमाचा संसार तुमच्या मुळे वाचला.किती नाव काढतात ते दोघे.
नमु मला तुमचे बोलणे काही कळत नाही आहे. मी तर घरीच आहे सकाळपासून. तुमचे भाऊ आज घरी नाही आले. फोन केला तर बंद येत होता. मला तर काळजी वाटत आहे.
काय वहिनी.. गम्मत करता तुम्ही.
नाही नमु, खरे बोलत आहे मी. घरी आल्यावर मी आधी फोन करते त्यांना,भाजी काय करायची हे तर रोज विचारते.
त्यांचा फोन बंद नसतो कधी. शेतावर गेले असतील का? सकाळी तसे काही बोलले नाही.
घाईतच होते. बहुतेक तिकडे गेले असतील. पण नमुला तर दिसले. कळत नाही काही.
वहिनी ठीक असेल तो.. शेतावर गेला असेल, त्यामुळे फोन नसेल लागत. माझीच गफलत झाली. दुसरेच कुणीतरी असतील ते. चला.. जेवण करु या.
नाही नमु.. तुम्ही करा जेवण. माझे मन व्याकूळ झाले आहे.
या आधी असे कधी झाले नाही. त्यांचा तो मित्र.. अनिल त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? त्यांना माहित असेल. वहिनी किती काळजी करता. होते असे एखाद्यावेळेस
आई मस्त जेवण करुन झोपली. बाबा संध्याकाळी केव्हाच बाहेर जात नाही. त्यांना मित्र पण नाहीत. आईला वाट बघणे काय असते माहित नाही. मुलांच्या बाबतीत तेच.
मुले कधी घरी येतात तिला माहित नसते. कोण कधी घरी येते ते मला पक्के ठाऊक असते. दरवाजा उघडण्याची जबाबदारी माझ्यावर असते, म्हणजे राहायची. आता काय त्यांच्या लग्नानंतर दार उघडण्याची जबाबदारी त्यांच्या बायकांनी घेतली.
आता आहेच कोण घरात? रीना वहिनी वेगळे राहतात. मोठा दादा, वहिनी कधीतरी येतात. चंदना प्रेमाने बांधून ठेवते नात्यांना. सर्व नाती किती प्रेमाने निभावते ती.
तिच्यामुळेच घराला घरपण आहे.ती घरात आली आणि घराचे कायापालट झाले.घराला घरपण आले. आई तर फक्त झोपायला येते. आम्हा बहिण-भावांना एकत्र घेऊन कधी आरामात बसली नाही. कधी कोणतीच गोष्ट समजावून सांगितली नाही.या उलट चंदना आहे.प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करते. देवा, तिला या संकटातून बाहेर काढ. सुखी, समाधानी आयुष्य लाभू दे वहिनीला. नमु रात्रभर जागीच होती. दादाच्या गाडीवर बसलेली स्री कोण असेल या विचाराने बैचेन झाली नमु. अंधार होता त्यामुळे चेहरा दिसला नाही.पण तो दादाच असेल का?
क्रमशः
पुढील भागाची लिंक
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.






Sundr katha