भाग २३ हरवून गेल्या जाणिवा..
सौ.दर्शना भुरे…
आईने सांगितल्याप्रमाणे
ओसरीत बसून ती घाईघाईने कंदीलाच्या काचा साफ करू लागली.
तिचे सर्व लक्ष बाहेर होते ती शेवंता, आशा च्या बोलावण्याचीच वाट बघत होती . आणि एका आवाजाने
तिने हातातील काम तसेच टाकून धूम ठोकली..
पुढे…
बाहेर अंधार पडला होता कडाक्याच्या थंडीत शेक घेण्यासाठी पेटविलेल्या शेकोटी भोवती सर्व जण जेवणखाणे आटोपून
जमा झाली होती. म्हातारी माणसे चिलीम, बिड्या ओढत, तंबाखू मळू लागली. तरणी पोर गप्पात रंगून गेली .
बाजूलाच पोर टोर खेळत होती.
तेवढ्यात दूरवरून कोणी तरी येताना रघुनाना ला दिसले. ती व्यक्ती हळूहळू चालत त्यांच्या दिशेने येवू लागली. तसे त्याच्या वर नजर रोखित हातातील तंबाखू मळत म्हणाले, म्हणाले अरे सखा तिकडे बघ..
कोण असल रे तो पाव्हणा नवाच दिसतो गड्या या आधी कवा पाहिले नाही त्याला..
आता सखाभाऊही त्या दिशेने पाहू लागला.
तो अनोळखी माणूस चालत चालत त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला.
तो चेहऱ्यावरून जरा अस्वस्थ वाटत होता.
कोण रे तू नवा दिसतो गड्या..
रघुनाना ने त्याला विचारताच तो गडबडून म्हणाला,
मी वाशिम वरून आलो आहे..मला वसंतरावने पाठवले आहे.
वैकुंठाच्या सासरची बातमी देण्यासाठी आलो आहे्.
मला मधुकरराव चा पत्ता पायजे होता.
तुम्ही ओळखता का त्यांना
हो हो या अंगाने अगदी सरळ जा तिकडे घर आहे मधुकराचं
त्याला हाताच्या इशारा ने मधुकरराव च्या घराकडे पाठवत रघुनाना म्हणाले,
म्हणजे तो मधुचा पाव्हणा आहे तर जरा गडबडीत च दिसतो.काही वाईट वंगाळ तर घडले नसेल न नाना ..
मधुकरराव च्या घराकडे जाणाऱ्या माणसाला पाहून सखा म्हणाला,
मला ही तीच शंका येते गड्या.. दोघं आपसात कुजबुजू लागली.
मधुकरराव नुकतेच जेवणखाण आटोपून अंगणात शतपावली करण्यासाठी नुकतेच बाहेर पडले होते.विमल तिन्हीसांजेला तुळशी जवळ दिवा लावत होती पण सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा वारंवार विझत होता.आज का होत आहे असे देवा काही अमंगळ तर घडणार नाही ना.. विमल च्या मनात शंकेची पाल चुकचुकली इतक्यात… काय ?काय बोलता तुम्ही हे असं.. नवऱ्याचे उंच आवाजातील बोलणे ऐकून ती धावत च बाहेर आली.तर तिला कोणीतरी अनोळखी माणूस मधुकरराव च्या पुढ्यात उभा दिसला.मधुकरराव घाबरल्यासारखे दिसत होते. ते पाहून विमल त्यांना म्हणाली,
अहो काय झाले तुम्हाला आणि हे कोण आहेत …
अग विमल ऐक ना हा माणूस काय म्हणतो आहे..
तसा तो माणूस विमल कडे वळून म्हणाला हो बाईसाहेब मी म्हणतो ते खरे आहे मी वाशिम वरून आलो आहे वसंतराव भोसले यांच्या घरून निरोप घेऊन.. निरोप असा आहे की त्यांचा मुलगा विनायक हा मरण पावला आहे..
विनायक मरण पावला वैकु चा नवरा आपला जावई असे कसे शक्य आहे.बातमी ऐकून विमलला एकदम भोवळ आली.ती गपकन जमिनीवर बसली..
माझी वैकु..
विमल सावर स्वतःला आणि वैकु कुठे आहे तिला बोलावून आण आपल्याला ताबडतोब वाशिम ला निघावे लागेल..नवऱ्याचे बोलणे ऐकून तिने बाजूलाच उभ्या असलेल्या कांताला वैकुंठाला बोलावून आणण्यासाठी बाहेर पाठवले.. वैकुंठा बाहेर तिच्या मैत्रिणी सोबत खेळण्यात गुंतली होती तिला तसंच जाऊन कांता काकूंनी घरी आणले .. मला खेळताना असे घरी का आणले म्हणत ती एकदम रडायला लागली . त्या एवढ्याशा जीवाला तरी काय माहित होते आपल्यावर काय संकट येऊन पडले.. ती बाहेरच खेळायला जायचं हट्ट असा करू लागली .. विमलने तिला पोटाशी कवटाळून एकदम रडायला सुरुवात केली. आई असं एकदम का रडत आहे. बाकी लोक का शांत आहे ते आणि हा नवीन माणूस कोण आहे.यातले तिला काही ही कळत नव्हते. विनायक गेला आणि वैकुचा संसार फुलण्याआधीच करपून गेला. अवघ्या दहा वर्षाची पोर काही कळण्याआधीच आधीच विधवा झाली होती. विनायक चे अंत्यसंस्कार आटोपले.तसे वैकुंठाची सासूबाई वैकुंठाला काही बाही बोलू लागली तेव्हा वसंतरावने वैकुची बाजू सांभाळून घेतली.
हळूहळू काळ पुढे सरकत गेला.वैकु वयात आली तिच्या सर्व मैत्रीण आशा, वंदना, शेवंता लग्न होऊन सासरी नांदायला गेल्या. आपापल्या संसारात रममाण झाल्या..
जानकी चे लग्न ठरले.. वैकुच्या सासरपासून थोड्या वेळाच्या अंतरावर जानकी चे सासर अकोला चे.. वैकुची तिची भेट अधूनमधून होत असे पण जानकी चा भरलपुरला संसार लेकरबाळ त्यामुळे ती पूर्वीसारखी इच्छा असूनही बहिणीला हवा तसा वेळ देऊ शकत नव्हती.
वैकु आता एकटी पडली होती.वैकुवर जिवापाड प्रेम करणाऱ्या भावांना तर तिची साधी विचारपूस करण्यासाठीही वेळ नव्हता. .
भावजयांच्या नजरेत ती आधीपासूनच खुपत होती. त्या तिच्या शी नीट वागत नव्हत्या.
लग्न होताच भावंडांना एवढे बदलेले पाहून विमल खचली ..
लांबसडक सरळ केसांची
दाटसर पडणारी वेणी जाऊन ती जागा आता अंबाड्याने घेतली होती.रंगीत वस्त्रांची जागा पांढऱ्या शुभ्र कपड्यांनी घेतली होती. डोक्यावर पदर आला होता.टवटवीत कांती लाभलेल्या
आपल्या निरागस पोरीतील झालेला एवढा बदल पाहून विमल तीळ तीळ तुटत होती. पण ती आई असूनही काही करू शकत नव्हती..
लेकीची परीस्थिती तिला पाहवत नव्हती. तिच्या भविष्याची काळजी वाटत होती. आपल्या नंतर आपल्या लेकीला कोण आहे तिची काळजी कोण घेईल या चिंतेने सतत ग्रासले ले पाहून,
आपल्या वैकुसोबत आपण आहोत आपली वैकु एकटी नाही असे मधुकरराव तिला सतत हिंमत देत ..
पण विमल एक वैकुंठाला सोडून कायमची दूर निघून गेली.आई वारली आता वैकुंठाला माया लावणाऱ्या
तिच्या आबा शिवाय या दुनियेत दुसरे कोणी उरलं नव्हते.
आबा दिवसेंदिवस थकत चालले होते .
आबांच्या सावलीत वैकुचे दिवस कटत होते.भावांनी तर तिची साथ कधीच सोडली होती. आबा तरी किती दिवस वैकुंठाला साथ देणार होते.
वैकुची सासू तर आधीच तिला अपयशी दाड पायाची समजत होती.ती वैकुंठाला ठेवून घ्यायला तयार नव्हती.
विनायक राव गेले यात वैकुंठाचा काय दोष होता पण व
सासू सर्व दोष वैकुलाच देत होती.त्यांचा पोटचा मुलगा गेल्याचे दुःख त्यांना झाले
मान्य आहे. पण माझ्या वैकुचे काय तिला खेळण्या बागडण्याच्या वयात वैधव्य आले.संसार काय असते लग्न काय असते हे समजण्याआधीच देवाने तिला एवढी मोठी शिक्षा का द्यावी..
एकंदर परिस्थिती पाहता मग आबाने मध्यस्थी करून बोलून तिला सासरी नेवून सोडण्याचे ठरवले. वसंतराव वारल्यानंतर वैकुची सासू एकटीच राहत होती त्यामुळे वैकुच्या सासूने तिला नाईलाजाने घरात घेतले होते.पण
वैकुसोबतचे नाते तिने केव्हाच तोडले होते.
विनायकराव च्या आईला एक ना एक दिवस वैकुची दया येईल आणि त्यांना आपली चूक समजेल अशी मधुकरराव मनाची समजूत काढीत होते.
क्रमशः
पुढील भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
अरेरे! लहानग्या वैकुच्या आयुष्यात खूपच दुःखद प्रसंग आला.
Mast
मन हेलावणारी कथा वैकुंठा ची