सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
Written by-ज्योती रामटेके
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-कथा
पियूष रोज जेवायला दुपारी घरी येत होता. तो राधा कडे का जेवत नाही हा प्रश्न नमुला पडायचा. राधाला त्याची जबाबदारी नको असेल. तिला फक्त त्याचा पैसा हवा. दादाला कंगाल करुनच सोडेल राधा.दादाला कसे समजत नाही आहे हेच कळत नाही.दुपार झाली. पियूष घरी आला. आज सर्व प्रश्नांची उत्तरे विचारायची असे चंदनाने ठरवले होते. रोज मुले घरी असतात. त्यांच्या समोर भांडण नको म्हणून शांत राहायची. आज मुले घरी नव्हती. पियूषचे जेवण झाल्यावर तो निघाला.
थांब पियूष
चंदनाचे आवाज दिला. बोल लवकर ..पियूषला जाण्याची घाई होती.
माझे काय चुकले पियूष मी कोणता गुन्हा केला? तुझे वागणे रोज छळत आहे मला. या वेदना सहन नाही होत आहे. आपले गोजिरवाणे घर पार उध्वस्त केले तू. मुले बिचारी सावरत आहे स्वतःला. बाप असूनही पोरके झाले ते.सतत अंगावर खेळणारी गार्गी किती कोमेजून गेली.बाबा असे का वागत आहेत हे त्या बालमनाला कळत नाही. काय संस्कार द्यायचे मुलांना. मी आतापर्यंत मुलांच्या भविष्याचा विचार करून शांत होती. मी ठरवले असते तर आपली रोज भांडणे झाली असती पण मला माझ्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल करायचे आहे. समोर पण मी भांडणार नाही. माझा आधीपासूनच प्रेमावर विश्वास. प्रेमाने जग जिंकता येते असे म्हणतात. मला तर साधे तुला जिंकता आले नाही.
तू मात्र बरा. प्रेम, जिव्हाळा आपुलकी हे शब्द आयुष्यातून बाद केले.तुला माझ्या हातचे जेवण छान वाटते मग मी का नाही आवडत आहे.बाबा आजारी आहेत.त्यांना काही माहित नाही.त्यांना तुझे वागणे कळले असते तर ते केव्हाचेच गेले असते.जाईपर्यंत पश्चातापेच्या आगीत होरपळत राहिले असते.
बघ, मुलांना तू हवा आहेस .घरी वापस ये कायमचा.
पियूषला काही फरक नाही पडला.तो शांत होता. काय बोलणार. बोलायला काहीच नव्हते त्याच्याजवळ. पियूष बोल नं काहीतरी. मी कुठे चुकली हे तरी सांग. माझ्या मध्ये काय कमी आहे हे तरी कळू दे मला.लग्नानंतरचे ते सोनेरी दिवस आठव. आपण पुन्हा तसे दिवस वापस आणायला काय हरकत आहे. मी मागचा भुतकाळ विसरून जाईल.काही घडलेच नाही असे समजून नव्याने पुन्हा संसार मांडायचा.राधाला विसरून जा.
न बोलता पियूष घरातून निघून गेला. त्याने मागे वळून नाही बघितले.चदंना आक्रोश करत होती.
आणि हो, उद्यापासून तू राधा कडे जेवायचे. मला वेळ नाही आणि इच्छा नाही माझी. तू घरी आला नाही तरी चालेल. राधाकडे राहत जा. मला गरज नाही तुझी. राधाला जास्त गरज आहे तुझी. एक घाव दोन तुकडे करायचे असेल तर मी स्वागत करेल. नाहीतर या घराचे दरवाजे कायमचे बंद कर. साचलेला राग ती ओकत होती. रडत होती.
मुले घरी आली. रडून.. रडून चंदना बेशुद्ध झाली. दवाखान्यात भरती करावे लागले.. आई होती तिच्याजवळ. रीना लगेच आली. सुमनताईला फारसा फरक पडला नाही.डाॕक्टर नेहमीप्रमाणे रागावले. त्यांना सर्व माहित होते. चंदनाला सुट्टी झाली. निघतांना डाॕक्टर आले. चंदनाला समजून सांगितले. आता समोर तू फक्त आई म्हणून जग. बायकोची भुमिका संपली तुझी. चंदना काय कमी आहे तुझ्यात.सत्य स्विकारण्याची हिंमत कर आणि जा समोर.
आयुष्यभर रडत, कुढत बसून काही मिळणार नाही तुला. पियूषला कसे घरी वापस आणायचे हा विचार सोडून दे. येणारा काळच त्याला शिक्षा देईल. नव्याने सुरुवात करायला वयाचे बंधन नसते फक्त इच्छाशक्ती हवी.चंदना, तू एक नवी चंदना निर्माण कर.ऊठ.. पुढे जा… नव्या जोमाने.
चंदना घरी आली.आता तिला फक्त आई बनून जगायचे होते. आईची मदत होती. सासरे होते सोबत. तिने नव्याने पुन्हा पोळ्या, भाजी करुन देणे सुरू केले. काही दिवसात त्याचे रूपांतर छोट्या हाॅटेलमध्ये झाले. चंदनाचे नाव सर्वत्र प्रसिद्ध होत होते.आता तिला क्षितिजापलीकडे जायचे होते.
अपर्णा तिला प्रोत्साहन देत होती. कुठेही प्रतियोगिता असेल तर चंदना जायची. भाग घ्यायची बरेच वेळा जिंकायची. तिच्या हाताची चव सर्वांना आवडायला लागली.
तिचा भिडस्त स्वभाव आता खुलायला लागला. बोलण्यात ठामपणा दिसून येत होता.आईमध्ये झालेला बदल बघून मुले आंनदी होती. सासरे.. रीना खूष दिसायचे. चंदनाच्या नविन जन्म त्यांना आवडला होता. बाबा शेवटचे दिवस मोजत होते. आई चंदनाची प्रगती बघून भारावून गेली होती.
आपल्या चंदनाचे भविष्य उज्ज्वल आहे हे तिला कळले होते.
चंदना आता दुसऱ्या शहरात हाॅटेल काढण्याचा विचार करु लागली. अपर्णा आणि तिच्या नवऱ्याने प्रयत्न करुन जागा मिळवून दिली. चंदना समोर जात होती. तिला मागे वळून बघायला वेळ नव्हता.आता परदेशात हाॅटेल काढण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. भुतकाळ मागे सरला होता. त्याची पुसटशी छाया आपल्या भविष्यावर पडू नये असे तिला वाटायचे.
पियूष गार्गी सोबत फोनवर बोलायचा. एक दिवस तो घरी आला. तो दिसल्यावर चंदना बाहेर निघून गेली. तो आवाज देत होता. चंदनाचे मागे वळून नाही बघितले.तो रडत होता.
गार्गीने त्याला पाणी दिले. मला जेवण करायचे आहे. मला जेवण दे गार्गी, खूप दिवसापासून चंदनाच्या हातचे जेवण नाही केले.
बाबा काय अवतार केला तुम्ही,मळके कपडे, हातापायांच्या काड्या झाल्या. आजारी आहात का?
हो.. माझ्या पैशाची राधाने धुळधाण केली. मला हाकलून दिले घरातून. मी कसा वाहत गेलो कळत नाही.
क्रमशः
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा








छान
ब्रावो चंदना , धाडसी चंदना.
छान
कथा आवडली.