थंडी आणि मी..
थंडीची सकाळ होती. नेहमीप्रमाणे भल्या पहाटे जाग आली; पण गरमगरम रजईतून बाहेर पडावं असं मुळीच वाटत नव्हतं. रजई मला सोडायला तयार नव्हती, आणि मी रजईला—म्हणून अजूनच स्वतःला तिच्यात गुंडाळून घेतलं.
डोळ्यांसमोर मात्र सकाळपासूनच्या कामांचा डोंगर उभा राहिला होता.
ओट्यावरची भांडीसुद्धा कुडकुडत मला आवाज देत होती…
मन म्हणत होतं, “अजून थोडी झोप घे… बाहेर खूप थंडी आहे.”
पण कान सतर्क होते—कधी नवऱ्याचा आवाज येतोय का, “उशीर झाला” म्हणून.
तेच मन पुन्हा स्वतःलाच समजावत होतं—नेहमीचंच आहे ते. ओरडणं, कामं, जबाबदाऱ्या… तू अजून थोडा वेळ झोप.
तो थोडा वेळ कधी जास्त झाला, कळलंच नाही.
उठले तेव्हा खरंच उशीर झालेला होता. घाईतच रजई सोडली. थंडी लागली, पण आता थांबायची उसंत नव्हती. स्वयंपाकघरात पाय टाकताच लक्षात आलं—वेळ हातातून निसटली आहे. मग सगळी कामं पटापट उरकायला सुरुवात केली.
पटापट डाळ-तांदूळ धुवून वरण-भाताचा कुकर गॅसवर चढवला. दुसरीकडे चहा उकळायला ठेवला. आणि फ्रिजमधून भाजी काढायला गेले, तोपर्यंत फस्स… फस्स… असा आवाज करत चहाने गॅसला आंघोळ घातली!
आधीच थंडीमुळे जीव हैराण, त्यात हे जास्तीचं काम—बसा आता गॅस भोवती पुसत…
घाईमुळे एक काम नीट होत नव्हतं. जे काम आधी शांतपणे झालं असतं, तेच आता वेळेवर व्हायचं नव्हतं. त्यातूनच चिडचिड वाढली, फजिती झाली, आणि स्वतःवरच राग आला.
सकाळ कसाबशी संपली. घर शांत झाल्यावर मनात एकच विचार आला—सकाळी लवकर उठायला हवं होतं.
संध्याकाळी झोपताना ठरवलं,
“उद्या नक्की लवकर उठायचं. उद्यापासून सगळं नीट करायचं.”
हा निश्चय मनाला थोडा दिलासा देऊन गेला.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच थंडी…
तीच रजई…
आणि तोच मनाचा आवाज—अजून थोडा वेळ.
आणि घटनाक्रम परत सुरू झाला.
स्वानुभवावर आधारित
लेखिका : दर्शना ओमकुमार भुरे, हिंगोली
अनेक स्त्रियांच्या मनातला आवाज आहे…











बहुतेक स्त्रियांनी अनुभवलेली थंडीतील पहाट विनोदची जोड देऊन झकास रंगवली