तीनचा टोल..
बाळाच्या रडण्याने सिमा दचकून जागी झाली.
तिने हात पुढे केला… पण शेजारी बाळ नव्हतं.
क्षणभर तिचा श्वासच अडला.
तिने घड्याळाकडे पाहिलं—
तीनचा टोल.
रात्र गडद, भयानक शांत.
“पंकज…” ती कुजबुजली, आवाज थरथरत,
“उठ… आपलं बाळ दिसत नाहीये…”
पंकजने कूस बदलली.
“हूं…” एवढंच.
सीमाच्या छातीत धडधड वाढू लागली.
ती उठली. अंधारातच हात चाचपडत स्वयंपाकघराकडे धावली—
कदाचित बाळ तिकडे गेलं असेल…
पण तिथे…
काहीच नव्हतं.
घरात फक्त दोन खोल्या.
आणि दोघांशिवाय तिसरं कोणीच नाही.
आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं.
“पंकज!” ती किंचाळली.
पंकज दचकून उठला.
“काय झालं?”
“आपलं बाळ… कुठेच नाहीये!”
क्षणात त्याची झोप उडाली.
दोघंही वेड्यासारखे शोधू लागले—
पलंगाखाली…
कपाटामागे…
प्रत्येक कोपऱ्यात…
पण बाळ… कुठेच नव्हतं.
इतक्यात—
खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक आत आली.
पडदा हळूहळू हलू लागला…
आणि भिंतीवर एक सावली सरकली.
सीमाचा श्वास अडकला.
“पंकज…” ती कुजबुजली,
“घरात… कुणीतरी आहे…”
पंकजने धाडस करून खिडकीतून बाहेर पाहिलं—
पूर्ण अंधार.
कोणीच नाही.
अचानक—
टक… टक… टक…
आवाज.
दोघंही गोठले.
तो आवाज… दाराजवळून येत होता.
दार अर्धवट उघडं होतं…
आणि दाराजवळ एक पांघरूण पडलं होतं…
ते… हलत होतं.
टक… टक… टक…
सीमा पंकजचा हात घट्ट पकडत म्हणाली—
“तिथे… काहीतरी आहे…”
पंकजचा घसा कोरडा पडला.
तो हळूहळू पुढे गेला—
एक पाऊल…
दुसरं पाऊल…
आवाज आता अगदी जवळ—
टक… टक… टक…
तो खाली वाकला…
क्षणभर थांबला…
आणि झटकन पांघरूण उचललं—
क्षणभर सगळं स्तब्ध.
मग…
पंकजच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं.
“अगं सिमा… इकडे ये…”
सीमा धावत आली—
आणि पाहते तर काय…
त्यांचं बाळ अगदी गोड झोपलेलं.
त्याच्या इवल्याशा हातात खेळणं घट्ट पकडलेलं…
तो झोपेतच हात हलवत होता…
आणि ते खेळणं जमिनीवर आपटत होतं—
टक… टक… टक…
सीमा बसलीच—
सुटकेचा दीर्घ श्वास.
“देवा… मला तर वाटलं… काहीतरी भयंकर आहे…”
पंकज हसत म्हणाला—
“भयंकर काही नाही गं…
आपलंच बाळ टक टक करून आपल्याला घाबरवत हो”
सीमा हलकेच हसली…
डोळ्यांत अजूनही पाणी.
“पण… इथे आलं कसं?”
पंकज खट्याळपणे म्हणाला—
“अगं, तूच ना दाराजवळ अंथरूण टाकलं होतंस?
महाराज रडत रडत इकडे आले… आणि इथेच झोपले!”
सीमा कपाळावर हात मारत हसली—
“म्हणजे भूत नाही… माझंच डोकं फिरलं होतं!”
इतक्यात—
दार पुन्हा हलकंसं कर्कश्श आवाज करत हललं…
दोघं एकमेकांकडे पाहिले.
क्षणभर शांतता…
आणि मग—
दोघेही मोठ्याने हसायला लागले.
आणि त्या सगळ्या गोंधळात…
बाळ मात्र निर्धास्त झोपलेलं होतं.
सौ.दर्शना ओ.भुरे..






कथेत शेवटपर्यंत उत्सुकता आहे.
उत्सुकता वाढवणारी , हृदय स्पर्शी कथा.