मुक्ता-marathi sad stoty
मुक्ता-marathi sad stoty

मुक्ता-marathi sad stoty

मुक्ताला आज वधूच्या रुपात बघून  देवला नववधूच्या वेषातील मुक्ता आठवली.

 अशीच अगदी अशीच तर दिसत होती मुक्ता लग्नात.

  तोच शालु,तीच मोत्यांची नथ,हिरवा चुडा,मोठ्ठी लाल टिकली, आणि  भांगामध्ये भरलेले लाल कुंकु. 

तीस वर्षांचा संसार टाकून देवला एकटे सोडून मुक्ता देवाकडे निघाली होती.

आज देव एकटाच झोपाळ्यावर बसलेला आठवतो आहे मुक्ताला. 

तिला पहिल्यांदा बघायला गेला तेव्हा लाजत लाजत पोह्यांची प्लेट त्याच्या हातात देणारी.

लग्न करुन देवसोबत आलेली ती अल्लड,बावरलेली.मुक्ताने कधी त्याच्यासकट घराचा ताबा घेतला कळलेच नाही.

मुक्ता नावासारखीच मुक्त. अवखळ,मुलांची काळजी घेता घेता स्वतःचेही मुलपण जपणारी.

मुक्ता आणि  देव दोघांच्याही स्वभावात अंतर,स्वप्नात अंतर.

देवची स्वप्ने मोठी. बंगला,फाटकात मोठी  गाडी, घरात चैनीच्या वस्तु.

मुक्ता छोटी छोटी स्वप्न जगणारी. घर,अंगण,अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा,दरवळणारा मोगरा, रात्रीच फुलणारी रातराणी, तिच्या वेणीसाठी जाई-जुई आणि  अबोली. हे तिचे नाजूकसे स्वप्न लग्न झाल्याझाल्या तिने साकारले. का कुणास ठावूक ती काटे असलेल्या गुलाबाच्या ताटव्यात कधी रमली नाही.  काटे असलेले गुलाब तिला रुक्ष वाटायचे.

 दोघांच्या स्वप्नातले अंतर संसारात   येऊ नाही दिले. 

देव आठवतोय झोपाळ्यावर बसून आज तिच्यासोबत घालवलेले एकेक क्षण

पहाटे पहाटे तिच्या  रांगोळीने प्रसन्न झालेले अंगण, तिची स्वयंपाकघरातील धावपळ, घड्याळाच्या काट्याबरोबर धावत सगळ्यांच्या वेळा पाळणारी मुक्ता

 नातलगांसोबत तिने जपलेली नाती, मुलासाठी केलेली जागरणे, त्याला आठवतेय तिचे गाण्याचे वेड. सुर आणि लयी पेक्षा गाण्याचे शब्द तिला वेड लावायचे.  गाणे ऐकतांना गाण्यातले शब्द  जगायचे कसे हे देवला मुक्तानेच शिकवले.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिचे गाणे पण बदलत गेले. 
लग्न झाल्यानंतर 
 दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
(आणि  हे ती झोपाळ्यात बसून गुणगुणायची बरं का)
गुणगुणणारी ती पहील्या बाळाची चाहूल लागल्यानंतर जीवन कि बगिया महेकेगी गायला लागली. आणि….आणि  आता  कालपरवा जाता जाता 
असेन मी नसेन मी तरी असेल मी गीत हे..
देवचे आतापर्यत गोठलेली आसवे झरझर वाहायला लागले.
मुक्ता गेली.देवला सोडून.
यापूढे घरात मुक्ता असणार नाही. तिच्या बांगड्यांची किणकिण ऐकू येणार नाही, 
अंगणात प्राजक्ताचा सडा सांडणार नाही,रांगोळी नसलेल्या अंगणाची प्रसन्नता कायमची लोपली आता, मोगऱ्याचा दरवळ, फुललेली रातराणी सगळे  कोमेजणार आता,तिचे गुणगुणने बंद होणार, गाते घर  अबोल होणार. त्यातले सुर,लय,शब्द हरवलेत. आठवणी 
आठवता आठवता देव मुक्ताजवळ  कधी गेला  कुणालाही कळले नाही. 
आता झोपाळाही थांबला कायमचा.
 
प्रिती
 

One comment

Comments are closed.

error: Content is protected !!