निःशब्द आसवे-marathi story
शेजारीच राहणाऱ्या रोहितच्या घरुन येणारे आवाज ऐकूण डाॕक्टर असलेल्या रजतची झोप चाळवली.रात्री ऐनवेळी आलेल्या एका इमर्जन्सी केसमुळे रजत पहाटे पहाटे झोपला होता. रोहितच्या घरचे आवाज वाढले होते.एरवी शांत असणाऱ्या घरात कसली चुळबुळ चाललीय हे बघायला रजत डोळे चोळतच उठला.तसेही एकदा झोपमोड झाल्यावर त्याला झोप येत नसे.
अंगणात येऊन बघितले तर रोहितच्या घरासमोर अंगणात माणसांची गर्दी दिसली.तो घाईघाईने घाबरुन रोहितच्या अंगणात गेला. रोहित सुन्नपणे बसून होता. बाजूलाच त्याचा मुलगा ओम् बसून होता.रोहनने रजतकडे बघून हाॕलकडे बोट दाखवले.
रजत हाॕलमध्ये गेला.
खाली एका स्त्रीचा देह ठेवून होता. निष्प्राण.सजवलेला.
कोण ? कोण असेल?
रजत विचार करत होता.
गायत्री असेल का?
हो.गायत्रीच.
अश्राप गायत्री.
तिच्या निष्प्राण देहाजवळ तिची मुले निषाद आणि स्वरा बसून होते. दोघांचेही चेहरे मलूल होते. आधीच पोरकेपणामुळे पोक्त झालेले निषाद आणि स्वरा आज एकाकी दिसत होते.रजतने त्यांच्या पाठीवर हात ठेवला.दोघेही रजतला बिलगले. त्यांनी वर्षानुवर्षे थोपवलेला अश्रुंचा बांध आज फुटला होता.दोघेही हमसाहमशी रडायला लागले.
ती निष्प्राण स्त्री त्यांची आई होती. आईच्या फार काही आठवणी मुलांजवळ नव्हत्या. निषादला ती अंधूक आठवत होती. स्वराला मूळीच आठवत नव्हती असे असले तरी आज त्यांची आई कायमची सोडून गेल्याचे दुःख होतेच.
चला.झाली का तयारी?
कोणीतरी विचारले.
हो.हो.जास्तवेळ थांबण्यात अर्थ नाही.कुणाची वाटही बघायची नाही.
कोणीतरी बोलत होते,
रोहित आत आला. तिला दोघातिघांनी उचलले आणि अंगणातल्या तिरडीवर ठेवले.गायत्रीचा अनंताकडे प्रवास सुरु झाला.तिच्या आत्म्याला मृत्यूनंतर तरी शांतता मिळो अशी प्रार्थना करत रजत स्मशानभूमीतुन घरी परत आला.
एक नजर रोहितच्या अंगणाकडे बघितले.रोहित शुन्यवत् बघत होता.रजत जाऊन बसला जरावेळ त्याच्याजवळ. दोघेही निःशब्द बसले.
जी रोहितला कधी आवडलीच नाही तिच्या जाण्याने रोहितला दुःख कसे काय? कि अपराधाचे शल्य असेल?
रजतने रोहितच्या खांद्यावर हात ठेवले.
आतापर्यंत कोरडे असलेले रोहितचे डोळे वाहायला लागले.
रजत,गायत्री मला क्षमा करेल का रे?
त्याच्या या प्रश्नाने रजत हेलावला.आणि घरी परतला.
रजत रोहितचा बालमित्र.दोघेही एकमेकांच्या जीवनात घडणाऱ्या कडूगोड अनुभवांचे साक्षीदार.
रजत कालपासून झालेल्या धावपळीने दमला होता.
आराम करावा म्हणून डोळे बंद केले.
नजरेसमोर विशीतली नवरीच्या रुपातली गायत्री आली.
आजही तिला तसेच सजवले होते.
रजतची नजर अजून मागे गेली.रोहितच्या बालपणाकडे.
रोहित जन्मतःच ह्दयाचे दुखणे घेऊन आला होता. घरात आईवडील,रोहित,त्याची मोठी बहीण रोहिणी. श्रीमंतीत गणना होईल असे कुटुंब.रोहितच्या नाजूक तब्येतीमुळे सगळे त्याला खूप जपायचे. त्याला कुठलाही ताण नको म्हणून शिक्षणाकडेही लक्ष देण्यात आले नाही.
त्यामुळे तो अभ्यासात मागे असायचा.नववीत असतांना त्याच्या ह्दयाच्या volve चे आॕपरेशन झाले.
रोहित दहावी,बारावी जेमतेम पास झाला. पुढे बिकाॕम केले.
रजत बारावीनंतर मेडिकलला गेला.पण दोघांमधली मैत्री कायम होती.
रोहिणीचे लग्न सुखवस्तु घरात झाले. रोहनचे बीकाॕम झाले.नौकरी मिळणे कठीण होते . वडिलांनी त्याला बांधकामक्षेत्रात विशेष आवड होती म्हणून सीमेंटची डिलरशीप घेऊन दिली. आता रोहितसाठी मुली बघणे सुरु झाले.
त्याच्या आॕपरेशनमुळे मुलगी द्यायला कोणी तयार होत नव्हते. बऱ्याच साजेशा मुली शोधल्या पण सगळीकडून नकार आला.
रजतने त्याच्या मित्राच्या नात्यातील मुलगी सुचवली. बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी दिसायला ठीक पण घरची परिस्थिती रोहितच्या परिस्थितीशी कुठेही ताळमेळ नसणारी. मुलीचे शिक्षणही नववीपर्यंतच झालेले. ती शेतात रोजंदारीने कामावर जायची.
घरच्या गरिबीमुळे दोन वेळ पोट भरणार कि शिक्षण घेणार?
या द्वंद्वात फसलेल्या माणसाचा कौल शिक्षण सोडण्याकडेच असतो.
दिसायला बरी असली तरी रोहितला गायत्री अनुरुप वाटली नाहीच.
पण आईवडिलांनी त्याची समजून घालून लग्नाला तयार केले.
गायत्री,तीन बहिणींमध्ये मोठी होती.
गायत्रीकडून लग्नाला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.
गरिबी माणसाचा नकार देण्याचा हक्क हिरावून घेते.
रोहित-गायत्रीचे लग्न झाले. माप ओलांडून गरीब गायत्री
श्रीमंत घरात आली.
गरीबीत वाढलेली गायत्री रोहितच्या घरचे वातावरण बघून भारावून गेली. आपण या घरात सामावू शकणार का?
असा प्रश्न तिला पडायचा. तिला इथे मोकळे वाटत नव्हते.
आयुष्यातील मोकळेपणा दूर तिच्या गावीच राहला.ह्या घरात वावरतांना काही चुकणार तर नाही याचे सतत दडपण वाटत राहायचे.
शिवाय रोहितचे तिच्याशी वागणे उपकार केल्यासारखे असायचे.
खेड्यातील,कमी शिकलेली असली तरी विचारक्षमता होती तिच्याजवळ.त्याला ती आवडत नाही याचे तिला खूप वाईट वाटायचे.तिचा श्वास कोंडल्यासारखा वाटायचा.
घरातल्यांशी बोलतांना खेडवळ शब्द तर येणार नाही या दडपणात ती कमी बोलायची.
रजत रोहितचा बालमित्र नौकरीनिमित्य बाहेरगावी होता.पंधरा दिवसातून एकदा यायचा.आला कि रोहितला भेटायला जायचा तेव्हा गायत्रीही भेटायची.
ती खूप आनंदी आहे असे कधीही रजतला जाणवले नाही.कधीतरी ती रोहितला समजवण्याविषयी बोलायची.
रजतने तसा प्रयत्नही केला पण रोहितचे ठरलेले उत्तर यायचे.
नाही वाटत मनापासून प्रेम.काय करणार मी?
मनावर जबरदस्ती नाही करता येत यार.
तने जुळली पण मनाचे काय?
शरीराची भाषा समजली तरी रोहित आणि तिचा मनाचा मनाशी संवाद होतच नव्हता.
रोहितचे आईवडील समजदार होते. पण आपल्या मुलाचे ह्दयाचे आॕपरेशन झाले नसते तर त्याला चांगली मुलगी मिळाली असती ही सल होतीच मनात.
संसार सुरु झाला. गायत्री तिच्या जबाबदाऱ्या बरोबर पाळत होती. कुठल्याही कर्तव्याला चुकत नव्हती.
पण मन रमत नव्हती.मी रोहितला आवडत नाही हा विचार तिचे अंतःकरण पिळवटून टाकत होता.
दिवस जात होते.
गायत्रीला दिवस गेले.सासूसासरे आनंदले.
बाळंतपणाला तिला गरीब माहेरी पाठवण्यापेक्षा इथेच बाळंतपण करण्याचे ठरले.
रोहित गायत्रीला मुलगा झाला.
घर आनंदाने दणदणले. रोहितने बाबा बनण्याचा आनंद वस्तीभर मिठाई वाटून साजरा केला.
गायत्री आई झाली. मुलाचे नाव तिने निषाद ठेवले.
गायत्री कमी शिकलेली होती पण तिला गोड गळा लाभला होता. स्वरांची जाण तिला उपजतच होती.
ती मुलाच्या संगोपनात रमू लागली. पण मनाचा एक कोपरा झुरत होता रोहितसाठी.निषाद झाल्यानंतरही दोघांच्या मनात असलेले अंतर कमी झाले नाही.
इथे सिमेंटच्या डिलरशिपमध्ये रोहितचा जम बसत नव्हता.
त्याला कोणीतरी सांगितले आंध्रप्रदेशात बांधकाम क्षेत्रात खूप वाव आहे. रोहितने तिथे जायचे ठरवले.आईवडिलांना तसे सांगितले.गायत्रीला विचारण्याचा प्रश्नच नव्हता.
रोहित गेला.मध्ये मध्ये फोन करुन निषाद आणि आईवडिलांची विचारपूस करायचा.महिन्यातून एकदा घरी यायचा.गायत्रीसोबत कामापुरते बोलणे व्हायचे.
गायत्रीला दुसऱ्यांदा दिवस गेले.
रोहितचा कामात जम बसू लागला.अशातच कामानिमीत्त्य भेटलेली रेवा त्याच्या आयुष्यात आली.दिसायला सुंदर आणि बोलायला चटपटीत असलेल्या रेवाकडे घरापासून दुरावलेला रोहित आकर्षित झाला.
आता त्याचे घरी येणे आपसूकच कमी झाले.
रेवा मला हवी होती तशी आहे,देखणी,मला समजून घेणारी असे रोहितला वाटू लागले.
रेवाला रोहित विवाहित आहे हे माहित नव्हते.तीही रोहितमध्ये जोडीदाराचे स्वप्न बघू लागली. तिच्या आईवडिलांनाही श्रीमंत,निर्व्यसनी रोहित आवडला.
गायत्रीला मुलगी झाली.स्वरा- गाण्याची चाहती असणाऱ्या गायत्रीने मुलीचे नाव स्वरा ठेवले.
रोहित मुलीला बघायला आला. पण त्याला आता रेवाशिवाय इथे थांबणे जड जात होते.लगेच वापस गेला.
आता त्याने इथे येणे बरेच कमी केले.निषादसोबत फोनवर बोलायचा.
गायत्रीची लग्नापासून झालेली भावनिक कोंडी वाढतच चालली होती.
क्वचित रजतजवळ ती मन मोकळं करायची. पण तो सतत बिझी असायचा.
मन मोकळं करायला तिला कोणीही नव्हते. गरीब माहेर दुरावले होते. माहेरची माणसे गरीबीमुळे गायत्रीच्या श्रीमंत सासरी येण्याचे टाळत होते.
गायत्री कमी शिकली होती पण भावना तर सगळ्यांना असतातच.
कोणालातरी आपण आवडावे,कोणी आपल्यावर आससून प्रेम करावे ह्या भावनिक गरजा आतल्या आत कोंडल्या गेल्या.
आपल्या भावनाही पाण्याची वाफ बनते तशी वाफ बनून हवेत विरत गेल्या असत्या तर किती बरे झाले असते.असे वाटत राहायचे तिला.
भावनेची वाफ मनातच कोंडल्या जात होती.
ती वाफ आत साठून साठून तिचे मनःस्वास्थ्य बिघडवू लागली. आता अजून अबोल झाली. मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले.स्वरा रडत असली तरी तिचे लक्ष नसायचे.स्वतःच्याच तंद्रीत राहायची.
एकदा रजत रोहितच्या घरी गेल्यावर त्याच्या लक्षात तिचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे लक्षात आले.त्याने रोहितला फोन करुन तिला एखाद्या मानसोपचारतज्ञाकडे न्यायला सांगितले.
रोहितला तो गायत्रीशी नीट वागत नाही ही सल होतीच.
तिच्यावर अन्याय करतोय हेही त्याला समजायचे.पण त्याला ती कधी आवडलीच नव्हती.
रजत त्याला म्हणायचा
आवडली नव्हती तर तेव्हाच नाही म्हणायचे होते यार.
लग्न करुन तिचे आयुष्य नासवले तू.
चुकलो मी.माझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार नव्हते.आईवडिलांचाही दबाव होता.गायत्रीवर अन्याय झाला ही गोष्ट खरी पण मी माझ्या मनावर अन्याय कसा करु?
जबरदस्तीने प्रेम नाही होत रजत.
रोहित आला.गायत्रीला रजतच्याच ओळखीच्या मानसोपचारतज्ञाकडे नेले.गायत्री त्याच्याशीही फार काही बोलू शकली नाही.
मला कोणी नाही एवढेच तिने सांगितले.
रोहितची त्याने समजूत घातली.
गायत्रीला त्याची किती गरज आहे हे समजवून सांगितले.काही दिवस तरी त्याने गायत्रीसोबत राहावे.मग ती नक्की ठीक होईल असे आश्वासन दिले.
सोबत रजतही होता.
तिघेही घरी वापस आले.
एकदोन दिवस रोहित थांबला.पण आता दोघांमध्ये संवाद होईल असे त्याला वाटत नव्हते.
गायत्री अगतिक नजरेने त्याच्याकडे बघायची.तो नजरेला नजरही भिडवू शकत नव्हता तिथे तिच्याशी बोलणार काय?
रोहित निघून गेला.
रेवा आणि तिचे आईवडील रोहितला रेवाशी लग्न करण्याची गळ घालू लागले.रोहितही एकटे राहून कंटाळला होता.त्याने गुपचूप रेवाशी लग्न केले.
रेवाशी त्याचा संसार सुरु झाला.
गायत्रीशी जबरदस्तीचा संसार होता.त्याच्या संसारातील अपूर्ण राहलेल्या इच्छा तो रेवासोबत पूर्ण करु लागला.
मध्ये त्याचे वडील आजारी झाले म्हणून तो बघायला आला.रेवाला सोबत आणायची त्याची हिंमत झाली नाही.
वडील गेले.
रजतने त्याला आता गायत्रीला सोबत घेऊन जा असे सुचवले.रोहितच्या आईचीही तीच इच्छा होती.सूनेची तडफड तिला समजत होती.
रोहितने रजतला रेवाबद्दल सांगितले.
रजतला आश्चर्य वाटले.गायत्री असतांना रोहितचे रेवाशी लग्न…कुणालाही न पटणारे होते.
रोहित निघून गेला. पण सोबत ताण घेऊन गेला.
गायत्रीत नसला तरी मुलांमध्ये त्याचा जीव होता. माझ्यामुळे मुलांचे संगोपन नीट होत नाही आहे ही अपराधभावना छळत होती त्याला.
गायत्रीची मानसिक हालत दिवसेंदिवस बिघडत चालली होती.इतकी कि ती दोन मुलांची आई आहे हेही ती विसरत चालली होती.
मुलांना तिची सासुच सांभाळत होती.
रोहित कधीतरी यायचा मुलांना भेटायला. पैसे नियमित पाठवायचा.त्याला आणि रेवाला मुलगा झाला.
रेवाला दुसरीकडून रोहितचे आधीच लग्न झाल्याचे समजले.
तिच्या जीवाची नुसती लाही लाही झाली.
रोहितने फसवल्याचे दुःख झाले.
पण आता एक मुल झाल्यानंतर रोहितशी तडजोड करण्याशिवाय ती काहीही करु शकत नव्हती.
रोहितने तिला गायत्री,मुलांबद्दल,तिच्या तब्येतीबद्दल सगळे सांगितले.
आता गायत्री घरात वेड्यागत् वागू लागली.तिला कशाचेच भान राहिले नाही. गायत्रीला डाॕक्टरने मेंटल हाॕस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
रोहित आला आणि तिला मेंटल हाॕस्पिटलला ॲडमीट केले.
रोहितची आई म्हातारी झाली होती.
घरी मुलांचाही प्रश्न होता. सहा वर्षाचा निषाद आणि चार वर्षाची स्वरा आईविना पोरकी झाली.
दोघांनाही आईवडिलांचे प्रेम मिळाले नाही.आजीचाच त्यांना
आधार वाटत होता.
रोहितने आंध्रप्रदेशामधला जम बसलेला व्यवसाय बंद केला.रेवा आणि मुलाला घेऊन वापस आला.
इथे नव्याने व्यवसाय सुरु केला.
रजतची इथेच बदली झाली. रोहितला गायत्रीबद्दल प्रेम कधी नव्हतेच पण तिचे अस्तित्व घरात जाणवत राहायचे.आताही ती घरात असल्याचा भास त्याला होत राहायचा. तिची अगतिक नजर नजरेसमोरुन हलायची नाही.निषाद,स्वराला बघून अपराधीपणा वाटत राहायचा.
उगाच ह्या घरात वापस आलो असेही वाटत राहायचे.
रजतजवळ बोलायचा तो तसे.
निषाद,स्वरा मोठे होत होते. निषादला आई थोडी तरी आठवायची.स्वराला मात्र काहीही आठवत नव्हते.
तिच्यासाठी रेवाच तिची आई होती.
रेवा ओमबरोबर निषाद,स्वराला नीट सांभाळायची.
पण आपली आई दुसरी आहे हे दोघांनाही माहित होते.
त्यामुळे त्यांच्या वागण्यात मोकळेपणा नव्हता.
रोहितची आई- निषाद,स्वराची आजी तापाचे निमित्त होऊन गेले.आता मुले खूप एकटी झाली.
निषाद कधीकधी वडिलांना विचारायचा आईबद्दल.पण तो काहीही सांगायचा नाही.आई कुठेतरी आहे ही जाणीव त्यांना जरातरी उभारी द्यायची.
रजतला वाईट वाटायचे त्यांच्याकडे बघून.
वयापेक्षा मोठी झाली होती दोघेही.
समंजस पण एकलकोंडी बनली.
गायत्रीला मेंटल हाॕस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर रोहित एकदाही तिला भेटायला गेला नाही. माहेरचे अधूनमधून जायचे.
आज सकाळी हाॕस्पिटलमधून ती गेल्याचा फोन आला.
तिची व्यथा कोणीही समजून घेऊ शकले नाही.
आज गायत्रीची तेरवी झाली. सगळा औपचारिकपणा.
रजत गेला होता.जेवायला बोलवलेले पाहूणे निघून गेल्यावर गायत्रीसोबत हाॕस्पिटलने पाठवलेली बॕग रजतने उघडली.रोहितची हिंमत झाली नाही.
त्यात एक गायत्रीने रोहितच्या नावाने लिहिलेले छोटेसे पत्र होते.
रजतने ते रोहितला दिले.त्याने थरथरत्या हाताने ते वाचायला घेतले.
प्रिय,
तुम्ही मी लिहिलेले पत्रही वाचणार कि नाही मला शंका आहे. मी तुमच्या लेखी वेडी,कुरुप,मन नसणारी स्त्री आहे,मी ओळखते तुमच्या मनाला. तुम्हाला फक्त माझ्या शरीराची ओळख झाली.मला तुम्ही मनासह हवे होतात.पण नाही झाले ते.
तुम्हाला वाटते तेवढी मी अडाणी नव्हते कधीच.
मन,भावना,विचार सगळेच तर होते माझ्याजवळ.
तरीही तुम्ही मला कुठून कुठे नेले?
लग्न झाल्यापासून सतत तडफडत राहिलेले माझे मन तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही.कधीही नाही. माझी निःशब्द आसवे सतत तुमचा पाठलाग करतील.
चिठ्ठीसहीत खाली पडणाऱ्या रोहितला रजतने सावरले…..
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
हृदयस्पर्शी शब्द अप्रतिम लेख
Adhuri tichi jivan kahani… manala chataka lavun geli.
भावूक कथा लेखन.अप्रतिम
धन्यवाद
खूप खूप हळवं
खूप सुंदर लिखाण
धन्यवाद
मला चटका लावणारी कहाणी…. खुपच छान लिहिलं आहे 👌👍