हो ग काल्पी या डियर जिंदगीत आल्यापासून खरेच जिंदगी डियर वाटायला लागली बघ.
वल्लभ कधी येत आहे ग?
येईलच एवढ्यात.
त्याला जाऊन तीन महिने झाले नाही पण तुमचा वाढदिवस आहे म्हणून येत आहे.
हो ना.
तुमची कंपनी तीन महिने त्याने आणि तीन महिने तू सांभाळायची असे ठरलेय तुमचे.
हो ताई. डियर जिंदगीसाठी वेळ देता यावा म्हणून वल्लभने ठरवले असे.
वल्लभ आला,वल्लभ आला
कोणीतरी सांगत आले.
काल्पीच्या चेहऱ्यावर चमक आली.
ताई,वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
असे म्हणून वल्लभने पद्मजाताईच्या पायांना स्पर्श केला.
कितीही थांबवले तरी डोळ्यात आसवांनी दाटी केलीच.
आल्याबरोबर वल्लभचे सर्वांना सुचना देणे सुरू झाले.
डेकोरेशनचा ताबा स्वतःकडे घेतला.सोबत आणलेल्या फुग्यात हवा भरून सगळीकडे लावले.
बाहेर सगळी मंडळी जमा झाली होती.
काल्पी सजवलेल्या पद्मजाताईंना घेऊन आली.
सगळ्यांचे वाढदिवस डियर जिंदगीत ह्याच पद्धतीने होत होते.
पद्मजाताईने थरथरत्या हाताने केक कापला.
केकचा पहिला तुकडा वल्लभला भरवला.
खूप वर्षांनी त्यांचा असा वाढदिवस साजरा होत होता.
सगळ्यांनी आजच्या स्पेशल जेवणावर ताव मारला.नाच,गाणी,खेळ आटोपले आणि थकलेले सगळे झोपायला गेले. वल्लभही वापस गेला.
बाहेर फक्त पद्मजाताई आणि काल्पी होते.
रात्र बरीच झाली होती.
आभाळी चंद्र, चांदणं चमकत होते.
पण मन अस्वस्थ असले की त्या मंद प्रकाशाला उदासी व्यापून टाकते.
काल्पी तुला एक विचारु?
पद्मजाताईंनी विचारले.
विचाराना ताई.
वल्लभच्या वयात मुले एवढी मॕच्युअर्ड नसतात.
या वयात त्यांचे आयुष्य फुलपाखरासारखे असते.
मुक्त,आनंदी,हसरे.
पण वल्लभ फार वेगळा वाटतो मला.
ताई मुळातच तो फार संवेदनशील आहे. या त्याच्या वागण्याला त्याच्या गतकाळातील घटनांचे कंगोरे आहेत.
त्याच्या आईवडिलांनी केलेल्या चुकीचे प्रायश्चित घेतोय तो.
असे काय केले त्याच्या आईवडिलांनी?
वल्लभचे आजीआजोबा श्रीमंत.वल्लभच्या वडिलांना त्यांनी अमेरिकेत शिक्षण घ्यायला पाठवले.ते तिथेच सेटल झाले.आजीने साजेशी मुलगी बघून त्याचे लग्न लावून दिले.
आईबाबा दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले.
पण त्यांचा डोळा इथल्या संपत्तीवर होता.आजीआजोबांना फसवून त्यांनी संपत्ती विकली आणि अमेरिकेत पोबारा केला. सगळ्या नातेवाईकांशी संबंध तोडले.त्या धक्क्यात आजोबा गेले.
आजी असहाय्य होऊन जगत होती.
एकेकाळी श्रीमंतीत जगणारी आजी कोण्यातरी नातेवाईकांच्या आश्रयाखाली राहू लागली.
वल्लभ त्याच्या काही कामासाठी भारतात आल्यावर त्याच्या योगायोगाने भेटलेल्या नातेवाईकाकडून त्याला हे सगळे समजले.
तेव्हापासून तो आजीचा शोध घेतोय.आजी ज्यांच्याघरी राहायची तिथेही तो गेला.
पण आजी त्यांच्याकडून निघून गेली होती.
डियर जिंदगी त्याने अशाच असहाय्य लोकांसाठी बनवले.
आजीचा शोधही घेत आहे तो. पण आजी नातेवाईकांकडून कधीची गेली.
आता नातेवाईकांकडे आजीचा फोटो मिळतो का ते बघत आहे तो.आजीचा शोध घेणे सोपे पडेल मग.
काय नाव होते आजीचे?
सुलभा
पद्मजाताईची शंका खरी ठरली.
त्यांना स्वप्नात आहोत कि सत्यात कळत नव्हते.
डोळ्यातून आसवे वाहायला लागली.
इतका आनंद पेलणे कठीण जात होते.
काल्पीचा आधार घेत त्या तिथेच असलेल्या एका बेंचवर बसल्या.
काल्पी वल्लभला फोन लाव जरा.
अहो आजी आताच तर भेटून गेला.
अग अर्जंट आहे.
काल्पीने फोन लावून आजीला दिला.
वल्लभ मी आजी बोलतेय….
कशी वाटली पद्मजाआजीची आणि वल्लभची कथा?
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
सुंदर लिहिले …
खूपच मस्त कथा