मराठी प्रेमकथा – पुन्हा गजरा
आज खूप दिवसांनी आम्ही मैत्रिणी भेटलो. बेला अबोलीचा सुंदर गजरा लावून आली. तशी ती नेहमीच गजरा लावून येते. कधी मोगरा… कधी जाई…तर कधी चमेली तर कधी कुंदा प्रथम जेव्हा बेला आली तेव्हा रोजच केसांना गजरा माळलेला तेव्हा सर्वांना नवल वाटायचे .
.हिला बरा टाईम मिळतो बाई रोज गजरा करायला. आम्हाला तर आंनदाच्या क्षणीच गजरा मिळतो. सर्वजणी मनात बोलायच्या …यालाही नशीब लागते हो…
नवरा करून देतो गजरा असे जेव्हा तिने सांगितले होते तेव्हा आम्ही तर आ वासून बघत होतो. लता तर खो..खो ..हसत होती.
काहीतरीच सांगते बेला कसे शक्य आहे एखादा पुरूष रोज कसा बायकोला गजरा बनवून देईल.
:मी तर नाही बाई अजून असे ऐकले?”.
माझा नवरा तर गजरा विकत पण नाही घेत. त्याचा पहिला प्रश्न असतो, “कशाला पाहिजे?”. थोड्या वेळात तर सुकूनही जाईल…”मग कशाला लावायचा?”.
“अगदीच नीरस आहे तो अग त्याला साधे कुंदाचे फुल कळत नाही”.
सर्व हसायला लागल्या.
अग लता माझ्या घरी पण असेच…काहीच ओळख नाही फुलांची…”कुंदाची फुले आणा म्हटले तर पांढऱ्या सदाफूलीचे फुले घेऊन येतात”.
इतके कसे अरसीक असतात पुरूष कळत नाही. बेला मंद हसली.
तिचा मदन असा नव्हता..त्याला तर फुलांची किती आवड. बेला भुतकाळात रमुन गेली.
लग्नानंतर दारात मोगरा होता. सुंदर फुले…सुंगधी वातावरण…मनही सुंगधात न्हावून निघायचे. मला फुले तोडून गजरा करायला वेळ नसायचा.
एकदा सकाळीच मदनने गजरा बनविला आणि हळूच केसात माळला.. सासूबाई बघत होत्या व हसत होत्या…
मी तर बाई खूप लाजून गेली.
त्या दिवशी कोणता तरी बहाणा करुन तो आसपास राहायचा…संपूर्ण घर मृदगंधाने व्यापून गेले होते. त्याला तर कारणच मिळाले जवळ जवळ घुटमळायला.
बेला… बाया केसात गजरा का माळतात याचे उत्तर आज मला मिळाले बघ. आधी वाटायचे फक्त सौंदर्यच खूलत असेल गजरा लावून. पण..नटून थटून…भरजरी साडी.. घालून त्याला शोभून दिसणारे दागिने… गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र कपाळाला छान मोठे कुंकू तेव्हा तिचे रूप किती लोभस दिसते. आपण सहजच बोलून जातो…किती खानदानी सौंदर्य आहे. खरेच ही आहे,
“भारतीय संस्कृती..खरे म्हणजे स्त्री साडीतच खुलून दिसते आणि सोबत बांधलेला जुडा त्याला सुंदर गजरा तिच्या सौंदर्यात भर घालतो ….आयुष्य सुंगधी करून टाकतो”. आयुष्यात अजून काय हवे.
बेला..”अग तो भ्रमर बघ कसा रात्रभर फुलात स्वतःला कैद करतो. त्याच्या गुंजरवाने सर्वांगी ती फुलतात”. नशीबवान आहे तो…दोघेही किती खळखळून हसले रात्र सरली… सकाळीच मदनने तिच्या केसात गजरा माळला. आता तर तो रोजच गजरा करायचा.. त्याला सवयच लागून गेली आणि तिला पण…तो नेहमी म्हणायचा बेला ..”जगावे तर फुलाप्रमाणे”. “निर्मळ ..निष्पाप ..निरपेक्ष..फुलांना कितीही कुस्करले तरी तोच सुंगध..आपले कुस्करणारे हात सुध्दा ते सुंगधीत करून जातात”.
“किती निर्मोही आयुष्य ..त्याग म्हणावा तर याला”.
कधी गजरा बनून एखाद्या सौदंर्यवतीच्या केसात गुंफला जातो तर कधी…रूसलेल्या प्रेमिकेला त्याच्या मोहक सुंगधाने वेडा करून टाकतो. तिचा अबोला क्षणात विरून जातो. देवाची आराधना करताना आपसूकच चार फुले वाहली जातात. तो फुलाचा भूकेला नसतोच मुळी तो तर भावनांचा भूकेला.. फुलाशिवाय पुजा अपुरी नववधुच्या स्वागतासाठी दूर कुठेतरी …..
बहारो..फुल बरसाओ.. मेरा मेहबुब आया है ….गात असतो. “कुणाचे स्वागत करतो तर कूणाच्या शेवटच्या प्रवासात सोबत करतो”.
धुंद करणारा गंध आता रोमा..रोमात भिनला होता…ते सुंगधी दिवस हळूहळू समोर चालले त्या सोबत आपणही…तसेही सुखाचे दिवस कळतच नाहीत.
प्रत्येक मोसमात मिळणारा गजरा वेगळा…पावसाळ्यात जाई…जुईचा बहर… तर हिवाळ्यात कुंदा चमेली… उन्हाळा तर धुंद करणारा …तप्त उन्हात सारे काही होरपळत राहते पण मोगरा मात्र बेधुंद त्याच्या मस्तीत फुलत असतो. उन्हाची झळ त्याला बरी सोसवते….
लग्नात तर नववधूला खास मोगऱ्याच्या गजऱ्याने सजविले जाते. पांढरी शुभ्र फुले…पावित्र्याचे महत्त्व सांगत राहतात. त्यांना एकच कळते, “आपण फक्त …आणि फक्त फुलायचे…आंनदी होऊन रंग उधळायचे….त्यांना फक्त एक वाऱ्याची मंद झुळूक मिळाली कि झाले त्यावर डोलत राहतात ती”.
सुखी संसार .. फुलाप्रमाणे बहरत होता. मुले मोठी झाली..मदन रोज गजरा बनवायचा..नंतर ऑफिस.
मुले पण हसायची त्याला..अहो पप्पा काय तुम्ही ..रोज गजरा बनवायचा कंटाळा नाही येत का तुम्हाला?.
तो फक्त हसायचा. शेजारच्या तिच्या मैत्रिणी तर न चूकता बघायच्या, “आज कोणती फुले?”.
सुखी संसाराला दृष्ट लागली.
“मदनला कँसर झाला”.
हळूहळू त्याने शरीरावर ताबा केला. तरीसुद्धा तो फुले तोडून गजरा बनवायचा.
थोडाच काळ आपण आहोत ही जाणिव होती त्याला.
बेला आता उदास राहायची.
तिला ती फुले…त्याचा सुंगध जिवघेणा वाटायचा. केसात माळायला नको वाटायचे तिला.
आता कुणासाठी गजरा लावू?.
नको आता हे गजरे मदन जबरदस्तीने लावून द्यायचा. लावल्यानंतर तो आंनदी वाटायचा.
बेला,” बस इथे त्याने आवाज दिला”.
हे बघ बेला,”मी फक्त तुझ्या आयुष्यातून निघून जाईल
ह्दयाच्या कप्प्यातून नाही..मी सदैव दरवळत राहिल तुझ्यासोबत”. आठवणींचा मोहोळ नेहमीच उठणार. तु फक्त तुझे जगणे सोडून देऊ नको. स्वतःला सावर. मला तू अशीच हवी. नटून केसात गजरा माळलेली माझी बेला मला कायम बघायची. “करशील ना एवढे ?”.
मदन निघून गेला कायमचा. बेलाच्या अंनत इच्छा विरून गेल्या.
केवळ मदनसाठी आता पुन्हा पूर्वीप्रमाणे गजरा माळायचा होता. त्याच्या आठवणीत आयुष्यातील समोरचा प्रवास एकाकी… एकटा..
दूर उभा मदन माझे हे रूप बघून आंनदी होईल.
“बेला पुन्हा गजरा माळायला लागली…!”.
“फक्त आणि फक्त मदनसाठी”.
ज्योती रामटेके
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा








Wow super post …अगदि मनाला चटका लावणारी गंधाची निष्पाप फुलांची अबोल भासणारी पण मनाला चटका लावुन वेडाविणारी बेलाची लघुकथा …
धन्यवाद
सुंदर
Wah 🌹🌹🌹
Kittichhan
Kittikittichhan
खूपच सुंदर 👌