नाना नानी पार्कचा रस्ता नेहमीच वर्दळीचा . सकाळी तर मॉर्निंग वॉक वाल्या लोकांची गर्दी असते.
वॉकिंग ट्रॅक वेगळाच , काहीजण त्यावर फिरतात ,काही लॉनवर . काही आजोबा-आजी बाकड्यावर गप्पा मारत बसलेले असतात.
एका कॉर्नरला हास्य क्लबचे हा हा हा ही ही ही. (ठरवून हसण्याचा हा पण एक मजेदार प्रकार)
दुसऱ्या कॉर्नरला योगा वाल्यांचा ग्रुप.
अशी ही रोजची सकाळ.
पण आज हे काय……?
खांडेकर आजोबा आजी नेहमी प्रमाणे गेले . पार्क जवळ ही भल्ली मोठी गर्दी . थोडे जवळ जाताच वातावरणातील भयंकर सडका कुजका दर्प त्यांच्या नाकात शिरला…… आजी तर एकदम घाबरुन गेल्या . नक्कीच काहीतरी अघटीत असणार .
पार्क जवळ एक जुनाट पोतं पडलं होतं . त्यातुन एक हडकुळा पाय बाहेर आला होता. बघ्यांची गर्दी होती , पण लांबूनच. कोणाची जवळ जाऊन पहायची हिंमत होत नव्हतीच.
कोणाचा तरी खून……? बापरे खून ??
सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती आश्चर्य मिश्रीत भाव.
कोणाचा झाला असेल खून ?
लोकं आपापसात चर्चा करत होते.
लगेच कोणीतरी बोलले घाणेरडा वास येतोय.आधीच झालेला दिसतो खून.त्याने असे बोलायचाच अवकाश सगळ्या लोकांनी मास्क वरून सुद्धा रुमाल नाका समोर धरला .
पोत्यावर रक्ताचे मोठाले डाग पडले होते , भोवती माशा घोंगावत होत्या. वासाने दोन-चार कुत्री ही जमा झाली.
पोलीस स्टेशनला फोन……
पोलीस इन्स्पेक्टर निमकर अर्धवट पेंगेतून खडबडून जागे झाले.
“काय ??? खुन ?? डेड बॉडी “??
त्यांनी फोन करणाऱ्याचे नाव, घटनेचा पत्ता विचारून घेतले.
निमकर मनातल्या मनात खूष झाले. खूप दिवसांनी खुनाची केस आली होती. ती खूषी त्यांनी आतल्याआत दाबली.
एकतर खुप दिवस झालेत, गावात काही पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासारख्या घटना घडलेल्या नव्हत्या.त्यामुळे पोलीस खातेही थोडे सुस्तावले होते.
‘ त्या ‘ फोनमुळे खात्याला मर्डर मिस्ट्री solve करायचे नवचैतन्य प्राप्त झालेलं होतं.
निमकरनी आळस झटकला. एकदम त्यांना जेम्स बाँड च्या आत्म्याने आपल्या शरीरात प्रवेश केल्याचा भास झाला.
असा छडा लावतो की प्रमोशन पक्केच.
” शिंदे ssss ! जागे व्हा , चला! खुनाची केस आहे .
Pad कागद घ्या. नेहमीप्रमाणे विसरू नका . पंचनामा करावा लागेल. लोकांच्या जबान्या लिहून घ्याव्या लागतील”.
निमकर दोन हवालदारांसोबत घटनास्थळी पोहोचले. गर्दीची कुजबूज वाढली. पोलिसांची चौकशी नको म्हणून काही लोक पांगले. काही लांबून बघू लागले.
खांडेकर आजोबा समोर आले . त्यांनीच फोन केला होता. पोलिसांची चौकशी, विचारपूस सुरु झाली.
सगळ्यात पहिले कोणाच्या लक्षात आले?
कोणी पोते टाकताना कोणाला पाहिले का? वगैरे वगैरे. आसपासच्या घरातील लोकांकडे जाऊन पण चौकशी झाली.
कोणी बेपत्ता आहे का?
विचारपूस झाली.
दिवस बराच वर आला होता.
खून कोणाचा हे कळल्याशिवाय लोक हटणारे नव्हते. आता डेड बॉडी कोणाची ? बघायची ची वेळ आली.
गर्दी मागे हटली .
माणुस की बाई ? तरुण की म्हातारी ?
सगळ्यांना चिकित्सा .
लोकांची नेहमी जागरुक असणारी चौकसबुद्धी जास्त जागृत झाली.
एक आजी त्यांच्या नवरोजीला ,
काय जमाना आला बघा तरी.आता काय बागेत फिरणेही सुरक्षित राहिले नाही.
ते काही नाही .उद्यापासून तुमचे बागेत एकटे फिरणे बंद.
उभा संसार आजोबावर संशय घेण्यात घालवला होता आजीने.ही संधी त्यांना आयतीच भेटली.
दुसरीकडे आयाही काळजीत पडल्या.
काय ताई मुलांना बागेत एकटे सोडायची हिंमत नाही होत बघा.
हो ना. काय मेले लोकं सुखाने जगूच देत नाहीत.
निमकरांनी आजुबाजुच्या जागेची पाहणी करण्यात मग्न.
काही शस्त्र चाकू सुरा मिळतो का पाहिलं ?
हवालदार शिंदे आणि कदम ने hand gloves चढवले आणि पोत्याच्या दिशेने निघाले .
सगळे पापणी न हलवता बघत होते. दोघांनी मिळून पोत्याला हात लावला , त्या आधी एकदा निमकर वर नजर टाकली.
त्यांनी नजरेनेच ‘आगे बढो ‘ चा इशारा केला.
पोते जमिनीवर उबडले , तसे लोक झटदिशी मागे सरकले. हवालदाराचे डोळे विस्फारले .
लोकांना हसावे कि रडावे कळेना.
निमकर यांनी डोक्यावर हात मारला मर्डर मिस्ट्री ची केस solve करायचे हातचे गेले होते.
जनतेने निःश्वास सोडला पण चर्चेचा एक विषय त्यांच्या हातचा गेला होता.एका रंगत चाललेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
एका शाळकरी कार्ट्याने थर्मोकोलचा बनवलेला प्रोजेक्ट होता तो. त्याने बनवलेल्या human body सोबत त्या मुलाने घरी पार्टीत वाचलेले पुष्कळसे नॉनव्हेज आणि नॉनव्हेज पिझ्झाही पोत्यात टाकला होता. त्याचाच हा उग्र दर्प होता. आणि रक्ताचे डाग पिझ्झासोबत आत गेलेल्या साॕसचे……
थर्माकोलच्या body चा सॉसचे रक्त लागलेला पाय पोत्यातुन बाहेर डोकावत होता.
निमकर आणि फौज हिरमुसल्या चेहऱ्याने मागे फिरले.
इतक्या वेळ ताटकळत थांबलेले कुत्रे मात्र पिझ्झावर तुटून पडले.
त्यांची पण खुप दिवसांनी सकाळी सकाळीच मस्त पार्टी झाली होती.
मोहिनी राजे पाटनुरकर











मस्त
छान… मजेदार…
अप्रतिम 👌
😁🤣😂😅 khup gmtidaar
कथा आवडली.कथेच्या शेवटी सरप्राईज एलिमेंट मजेदार होता.