विश्वासघात
आत्या आज राजाची कथा विराजने हट्ट केला.
एक असतो राजा आणि एक असते राणी. राजाचे नावं असते अजय आणि राणीचे नावं असते जया.दोघेही शूरवीर आणि प्रजेचे लाडके असतात.तेही प्रजेची खूप काळजी घेतात. राज्यात आंनदी आंनद असतो.
त्यांना एक मुलगी असते
राजकुमारी शौर्या. शौर्या नावाप्रमाणेच शूर असते. राजा -राणीची आवडती शौर्या लवकरच घोडसवारी, तलवारबाजीं याच्यात निपुण होते.आता ती युद्धकलेचे शिक्षण सुरु करते. राज्यात सर्वत्र आंनदी आनंद असतो.
बाजूच्या राज्यात एक राजा असतो भुचाल नावाचा.नावाप्रमाणेच भयंकर.
प्रजेवर अन्याय करणारा. बळजबरीने आसपासची राज्ये तो कपटीपणाने बळकावत असतो.
एकदा अजय राजा भुचाल राज्यातील जनतेवर अन्याय होतो म्हणून हल्ला करतो. आणि समज देऊन भुचालला सोडून देतो.
पण रागावललेला भुचाल बदला घ्यायचे ठरवतो.संधीची वाट बघतो.
अजय राजासोबत मैत्रीचे नाटक करतो. युद्धनीतीचे सर्व नियम मोडून कटकारस्थान करून राजा अजयचा खून करतो. राज्य ताब्यात घेतो.राणी जया छोटया शौर्यला सोबत घेऊन लपत छपत घोडसवारी करत एका अरण्याचा आश्रय घेते.
भुचाल सैन्याला राणीचा शोध घ्यायला सगळीकडे पाठवतो. दोन दोन सैनिक सगळीकडे जातात.
राणी जया आणि राजकुमारी शौर्या थकून एका ठिकाणी थांबतात.
दोन सैनिक त्यांना जवळ जवळ येत असल्याचे दिसतात.
दोघीही घाबरतात.
सैनिक जवळ येऊन थांबतात.
घाबरू नका राणीसाहेब. आम्हाला राजा अजयने मदत केली आहे.
त्याची परतफेड करायची वेळ आली आहे.
आम्ही दोघेही तुम्हाला मदत करू.
चला आमच्यासोबत.
राणी जयाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही कळत नाही. पण दुसरा पर्यायही नसतो.
दोघी वेशांतर करून भुचालच्या राज्यात जातात.
त्यांच्या महालात आता भुचाल राहतो.
दोघीही एका छोट्याशा घरात राहतात.
तिथे गुप्तपणे शौर्याचे पुढील शिक्षण सुरु होते.
अरण्यात जाऊन ती सैनिकांसोबत युद्धाचा सराव करते.
तिला तिच्या वडिलांच्या खुनाचा बदला घ्यायचा येतो.
दोन्ही सैनिक गुप्तपणे त्यांना भुचालची माहिती देत असतात. प्रजे वर भुचालचा अन्याय वाढत जातो. राणी जया आणि शौर्याला प्रजेबद्दल खूप वाईट वाटते.
एक दिवस शौर्या भुचालला भेटायला जाते. स्वतः ची खोटी ओळख सांगते. राजा भुचाल आणि राणीची मर्जी सम्पादन करते.
राणीची विश्वासू दासी बनते. तिच्या कडून भुचालची माहिती घेत राहते.
एक दिवस भुचाल शिकारीला जाणार असल्याचे राणीकडून तिला समजते.
राणीसाहेब आपणही जाऊ राजासोबत शिकारीला.
राणी या पूर्वी शिकारीला कधीही गेली नसते. ती राजाकडे सोबत नेण्याचा हट्ट करते. राजबरोबर ती आणि शोर्या दोघीही जातात. एका घोड्यावर राजा-राणी आणि एकावर शौर्या अरण्याच्या दिशेने निघतात. शिकारीच्या ठिकाणी पोहचण्या आधीच शौर्या भुचालवर लपवून आणलेल्या तलवारीने सपासप वार करते. भुचाल घोड्यावरून खाली पडतो. राणी शौर्याला असे वागण्याचे कारण विचारते.
ती दुःखी होऊन सांगते. मी अजय राजाची मुलगी आहे. विश्वासघात करून माझ्या वडिलांचा खुन भुचालने केला असे म्हणत ती शेवटचा वार भुचालवर करते.
राणी जया आणि राजकुमारी शौर्या त्यांच्या राज्यात वापस येतात.
प्रजा त्यांचे उत्साहात स्वागत करते. दोन्ही राज्याची जबाबदारी आता शौर्या घेते.
विराज गोष्ट आवडली का… हो आत्या. शौर्या एकदम शूर आहे.
आत्या विचारते, भुचाल पण विश्वासघात करतो आणि शौर्या पण. मग तुला शौर्या का आवडली?
छोटासा विराज विचारात पडतो.
बालमित्रांनो तुम्हाला काय वाटते?
प्रिती








छान बाल कथा.