३-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या – By-ज्योती रामटेके
आई.. बाबांची द्विधा मनस्थिती झाली होती. या स्थळाचा विचार करावा असे त्यांना वाटत होते. चंदना डोळ्यासमोर राहील हे खास कारण होते.तसेही त्यांना तेच हवे होते.
येणे जाणे होईल.लक्ष पण ठेवता येईल. चंदनाला आपला आधार वाटेल,असा सर्व विचार ते करत होते. अपर्णाला मात्र मुंबईचा मुलगा योग्य वाटत होता.
आई.. मुंबई किती छान आहे ग,रोज समुद्रावर फिरायला जायचे मस्त.
आई- काय वेडी मुलगी आहे अपर्णा, अग बाई.. आम्ही कोणत्या विचारात आहोत कळत का तुला?
अपर्णा-अग पण आई.. तिथे ताईला खूप काही करता येईल. तिला स्वयंपाकाची किती आवड आहे तुला माहित आहेच. पुढे हाॅटेल सुरू करायचे आहे तिला. मुंबईत जोरदार चालेल तिचे हाॅटेल.आपले गाव तालुक्याचे ठिकाण. तसे बघितले तर इकडे लोकांची मानसिकता बाईला कमी लेखण्याची आहे. बाई आणि हाॅटेल ही संकल्पना लोकांना पटणार नाही, तसेही आपल्याकडे नाव ठेवण्यात लोक पटाईत आहेत. माझे तर कुणी ऐकून घेणार नाही.
हो.. कळते आम्हाला. अग पण आता काळ बदलत आहे.
तिला हे सर्व करायला वेळ आहे अजून.. तो पर्यंत लोकांच्या मानसिकतेत होईल बदल. आणि तिच्या हाताची चव चाखायला बघ कशी गर्दी होईल… आई बोलत होती.
तसे ते लोक श्रीमंत आहेत. चंदना हौसेखातर करेल थोडेफार.बघू काय होते तर.
आजकाल लोक ओळखले जात नाही. बोलतात एक.. करतात एक. सुमनताईने तर तिच्या शिक्षणाची सखोल चौकशी केली. तिच्या मार्कशीटस् बघितल्या..
अग आई.. त्या अती हुशार आहेत. त्यांनी प्रत्यक्ष काहीच मागितले नाही. बरोबर हुशारी करून सर्व विचारले.. बघितले, म्हणजे समोर तुम्ही शिक्षणाचे प्रत्यक्ष विचारु नका असाच अर्थ झाला. आई, कदाचित मुलगा असेलही चांगला पण लग्नानंतर ताईला जरा रोखठोक राहावे लागेल.
अशी सासू भेटल्यावर तिचे काही खरे नाही.ताई स्वभावाने साधी सरळ आहे. कधी कुणाला दुखवत नाही. नेहमी दुसऱ्यांचा विचार करणार,नंतर आपला. अशा घरात मी पाहिजे. सासूला दोन दिवसांत सरळ करते.. अपर्णा बोलत होती.
अग अपर्णा.. हा त्यांच्या स्वभावाचा अंदाज तू करत आहे.
कदाचित तो चुक पण असू शकतो. तुझ्या पेक्षा मी खूप लोक बघितले आहेत. मला तर त्या साध्या वाटतात. तसेही लग्न झाल्यानंतर तडजोड करावीच लागते. हळूहळू सर्व ठीक होते. सुरवातीला होतो त्रास मग तेच लोक आपले होऊन जातात. सर्वात महत्वाचा आहे मुलगा.तो सभ्य असेल तर विचार करायला हरकत नाही.
चंदना आपल्या स्वभावानुसार लवकरच सर्वांना आपलेसे करेल. अग प्रेमाने जग जिंकता येतं.प्रेमात प्रचंड ताकद असते.या प्रेमाच्या बंधनात राहूनच नाती जपावी लागतात.
बाबा ऑफिस मधुन घरी आले.
चंदना कुठे आहे?
घरी आल्यावर प्रथम विचारला जाणारा प्रश्न.
काय बाबा .. कधीतरी मला पण विचारा. दादाला विचारा.
आम्ही घरातच असतो बाबा अपर्णा हसायला लागली.
हो ..ग.. तुझे खरे आहे. पण काय करणार सवय जात नाही. चंदना आमचे पहिले बाळ. ती झाली आणि घरात दिवसभर चंदनाचा जप चालायचा. शहाणपण घेऊन जन्माला आली ती. काही त्रास नाही.रडणे तर माहीतच नाही तिला. तिच्या कौतुकाने.. लाडाने दिवस.. रात्र कधी सरायचे कळत नव्हते.तिचे बोबडे बोल, घरात आंनदी फुलवत होते.
नंतर तुझा जन्म झाला. आम्हाला दुसरी मुलगी झाली,याचा आनंदच झाला. माझी आई झाली नाराज. तिला नातू हवा होता.तू जन्मापासून बंड प्रवृत्तीची.नंतर अपूर्व झाला. माझी आई खूप आंनदी झाली, मला म्हणाली वंशाचा दिवा आला.मला हसायला आले. काय म्हणावे आईच्या विचारांना. त्यांना मुलींपेक्षा मुलगा का श्रेष्ठ वाटतो कळत नाही. घरात तुम्ही तिघे.. पण माझ्या तोंडून प्रथम चंदनाच नाव येतं.
तुम्ही तिघेही मोठे झाले.काळ कसा सरला कळले नाही.
आता हळूहळू जबाबदारी कमी करायची. सध्या तरी चंदनाच्या लग्नाचे बघू या.
क्रमशः
याआधीचा भाग वाचण्यासाठी लिंक
https://marathi.shabdaparna.in/२-सुन्या
कथामालिका आवडत असल्यास नक्की like,share करा.







सरस कथा