९ सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-By-ज्योती रामटेके
तू आली आणि घरात आंनद पसरला. घराला घरपण आले
माहेरी जात जात जा दोन दिवस. आईबाबांना भेटायला जात जा. आमचे घर तुझ्या येण्याने भरले.पण त्यांचे घर रिकामे झाले.
भाग-९
घरामध्ये सुमनताई प्रत्येक वेळी आपण कसे वरचढ राहू याचा प्रयत्न करायच्या. चंदनाची जाऊ रिना परखडपणे बोलायची, आपले मत स्पष्टपणे सांगायची. या उलट चंदना सोशिक, मन मारुन राहायची. रिना तिला समजून घेत होती.आपली खरी बाजू कसी पटवून द्यायची हे सांगायची.
सुमनताई या उलट आपल्या खोचक शब्दांचा मारा करायच्या. चंदना बोल काहीतरी, ऐकून घेशील तर आयुष्यभर ऐकावे लागेल रिना सांगायची. पियूष मात्र संयमाने दोन्ही बाजू सांभाळायचा.
लग्नानंतर प्रथमच चंदना माहेरी राहायला गेली. आई, बाबा वाट बघत होते. घरी आल्यावर चंदनाच्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या. दारात जाईची वेल जणू वाट बघत होती. फुलांच्या सुगंधाने घर प्रसन्न वाटत होते. आईने गजरा बनवून ठेवला होता. गजरा माळण्याची चंदनाला आवड होती. प्रत्येक वस्तूंना तिने प्रेमाने स्पर्श केला.
तिची खोली, कपाट,अशा कितीतरी निर्जीव वस्तू. निर्जीव कसल्या माझ्यासाठी तर सर्व सजीव मला हव्याहव्याशा.
माझी बाहुली, बाबानी एका वाढदिवसाला आणलेली. अपर्णाच जास्त खेळली तिच्यासोबत. प्रत्येक घराचा कोपरा आठवणीत साठवून ठेवलेला.
परसबागेतील अबोली किती फुललेली दिसत आहे.
अपर्णा धावत आली, अग ताई, मला एक गोष्ट सांग,अबोलीच्या पाकळ्या पुर्ण उमलत का नाही?
अग वेडा बाई म्हणून तर त्याला अबोली म्हणतात,
गंमत ग अपर्णा, पण खरेच का अबोली म्हणत असतील कळत नाही. तिचे अस्तित्व ठामपणे जगाला दिसत नाही म्हणून असेल कदाचित, किंवा ती तिच्याच कोषात राहते म्हणून.
ती अबोल, म्हणूनच ती अबोली.
म्हणजे तुझ्यासारखी, चंदना बघत राहिली, किती सार्थ गोष्ट अपर्णा बोलून गेली.
बाबा घरी आले. नेहमीप्रमाणे चंदना पाणी घेऊन गेली.
काय आणले बाबा बाजारातून?
माझ्या आवडीची मिठाई आणली का? काय ताई, तुला आता पण मिठाई आवडते का?
छान पिझ्झा, बर्गर, चायनीज सोडून मिठाई खाते तू अपर्णा बोलली. तो कचरा तुलाच आवडतो आई रागावली.
आपल्या जुन्या पदार्थांची चव घेत जा एखाद्यावेळी. ती मजा नाही या नवीन पदार्थांना. चंदना पुरणपोळी किती सुंदर बनवते. मला, बाबाला, अपूर्वला तिच्या पोळ्या किती आवडतात. तू शिकून घे.
किती मेहनत आहे त्या पुरणपोळीची, मला नाही जमत ते.
त्यापेक्षा माझ्या नुडल्स मस्त आहेत. पाण्याला उकळी आली कि बस, सोपे आणि झटपट. काय म्हणावे या पोरीला, कसे होईल देव जाणे..
आईची नेहमीची कुरकुर. तिच्या नवऱ्याचे चांगलेच हाल करेल हि अपर्णा, सगळे हसायला लागले.
चंदना थांब आता आठ दिवस. तू आल्यापासून घर कसे फुलून गेले, सर्वकाही आधी सारखे वाटत आहे. तसा मी येत राहतोच, पण रोज येणे बरे नाही दिसत. चार,पाच , दिवसांनी तू डोळ्यासमोर दिसते तेच खूप आहे.
बाबा भाऊजीनां बोलवायचे का राहायला आपल्याकडे
किती मजा येईल अपर्णा बोलली.
बाबा, दोन दिवस थांबते मी, यांची शेतीचे कामे सुरू आहेत.
मजूराकडे लक्ष द्यावे लागते.
येतांना लवकर ये, म्हणून सांगितले सासुबाईने.
बरं बाई तुझ्या इच्छेनुसार,आई बोलली.
चंदना पियूषरावांच्या नौकरीचे काय ठरले? तू पण बी, एड साठी प्रयत्न कर. आजकाल कठीण झाले आहे सर्व.
प्रत्येक वेळी पैसा हवा, तसे शेतीचे चांगले उत्पन्न मिळत असेलच.नौकरी लागली कि अजून चांगले दिवस येतील.
बाबा, तुम्ही किती काळजी करता? होईल सर्व चांगले.
पियूष मेहनती आहे.असे लोक समोर जातातच,वेळ लागेल थोडा. मी आहे त्याच्या सोबतीला.दोघे मिळून करु बरेच काही. तुम्ही आहात प्रोत्साहन द्यायला.
घरात भाऊजी, ताई समंजस आहेत. तुम्ही माझी काळजी करायची सोडून द्या. मी मजेत, आंनदी आहे.
आता अपर्णाच्या अभ्यासाकडे लक्ष देत जा. अपूर्व हुशार आहे . त्याची काळजी नाही.काहीतरी चांगलेच करेल तो.
क्रमशः
आधीच्या भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/८-सुन्
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.








खूप सुंदर.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
उत्तम कथा, साधी सोपी सरळ भाषा