माधवची स्मृती वापस यावी यासाठी घरातील सगळेच आपापल्या परीनं प्रयत्न करत होते.
स्वयंसिद्धा भाग ११
आठवणींचा हिंदोळा
आठवणींच्या उजळणींचा माधववर चांगलाच परिणाम झाला माधवची तब्येत अजून सुधारली . सुप्रियानी सासऱ्यांना औरंगाबादला काही दिवस राहण्याबद्दल विचारलं .
हवा पालट झाली तर अजून माधवला बरे वाटेल सुप्रिया पण आता नांदेडमध्ये कंटाळली होती .
थोडं निवांत जगण्याचं टॉनिक तिलाही हवं होतं .
सहा आठ महिन्यापासून तिकडे कोणी फिरकलेही नव्हते. माधवला ऍडमिट केलं त्यावेळेस शेजारच्या मैत्रिणींनी जेवढे सामान कपडे बॅगेत कोंबलं तेवढंच होतं
सुप्रियाला दोन दिवसासाठी औरंगाबादला जायचं होतं पण मुली तिच्याशिवाय राहत नव्हत्या आणि माधवला ती आता क्षणभरासाठी सुद्धा नजरेआड होऊ देणार नव्हती.
सात-आठ महिन्यानंतर सगळेच औरंगाबादला गेले. घर भाडे थकीत होते इतके दिवस घरात वावर नव्हता. घर सुप्रियाच्या संसारासारखा विस्कटलं होतं. किती तरी स्वप्न तिची अशी तिच्यापासून लांब गेली होती, मुलीच्या भविष्याची चिंताच नाही तर उद्याच्या पोटाचा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता, तसं घरचं सगळं छान होतं, सासरा पाठीशी बाप होऊन उभा होता, तरीही आपले स्वतःचे असे काहीच नाही याची खंत आणि सल तिला स्वस्थ बसू देत नव्हती, भविष्याचा प्रश्न ‘आ’ वासून तिच्यासमोर उभा होता. आता तिला या साऱ्या साठी पदर खोचून सज्ज व्हायचेच होते.
जिव्हाळ्याच्या शेजारणी लगेच आल्या, सुप्रियासाठी , माधव साठी. इथून जातानाचा आणि वापस आलेला माधवमध्ये त्यांना चांगलाच फरक जाणवला . सुप्रियानी त्यांची माधवला जुनीच पण नव्याने ओळख करून दिली.
सुप्रिया मैत्रिणींच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली.
अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही, भूतकाळ परत आणण्याची क्षमता त्यांच्यात नसते. रोज मैत्रिणी कामे आवरले की सुप्रियाकडे मदतीला आणि गप्पा मारायला येत . तिलाही थोडं हलकं वाटायचं बोलून.
सगळं घर जागच्याजागी यायला आठ दिवस लागले.
एक दिवस सुप्रिया माधवला घेऊन त्याच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेली. कारण दोन , माधवच्या आठवणींसाठी आणि कंपनीकडून काही मदत मिळेल ही अपेक्षा . पुन्हा तिची निराशा. कंपनीने राहिलेल्या दीड महिन्याच्या पगारा व्यतिरिक्त कुठलीही मदत केली नाही. उलट आमचा एक चांगला employ नसल्याने कंपनीला मोठा फटका बसल्याची खंत त्यांनीच व्यक्त करून मोकळे झाले बिचारे….!
औरंगाबादलाही माधवसाठी दवाखान्याच्या वाऱ्या, तेल मालिश चालूच होते सुप्रियानी चरितार्थ चालवण्यासाठी साडीचा घरगुती व्यवसाय सुरू केला. घर खर्चाचे पैसे त्यातून निघत होते.
माहेरची शेती असल्याने धान्य , दाळी तिची आई पाठवत होती. शाल्वी चौथीत तर सई बालवाडीत होती . बाबांची ही अवस्था पाहून मुली कावऱ्याबावऱ्या व्हायच्या. बाबांची हाक ऐकण्यासाठी त्यांचे कान नकळत आसुसलेले असायचे . पण सारे व्यर्थ….
एक वर्ष सुरळीत गेलं. माधवच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती . आता तो स्वतः स्वतःची कामे करू लागला, हिंडू फिरू लागला. पण सुप्रिया त्याला एकट्याला कुठेही जाऊ देत नव्हती. मोठी शाल्वी पण बाबांकडे लक्ष ठेवत होती. परिस्थितीशी समायोजन हा गुण शाल्वीनी आईकडून उचलला होता. वयाच्या मानाने ती जास्त समजूतदार झाली. याचं आईला खूप कौतुक वाटायचं. माधवला अजूनही सगळ्याच गोष्टी – घटना आठवत नव्हत्या. काही अंधुक अस्पष्ट धुसर.
अकाउंट , गणित त्याचा हातचा मळ होता आणि आता शाल्वी सोबत पुन्हा अंकगणित शिकायची वेळ आली होती. त्याचाच त्याला कधी कधी राग येत होता . ‘असं कसं विसरलो मी शब्द, अक्षर ,आकडे.
सुप्रिया सारखी त्याची पण जिद्द होती. तिच्या प्रयत्नांना तो बरोबरीने साथ देत होता पण शिक्षणाचं काहीही आठवायला तयार नव्हतं आणि काही व्यक्त व्हायला शब्द मुके झाले होते.
कधी तिचे आई-बाबा कधी सासू-सासरे अधून मधून भेटून सोबत राहून जात. असेच एकदा आई-बाबा भेटायला आले होते. सकाळी सुप्रिया आई बाबांचा संवाद ऐकत माधवचा योगा व्यायाम सुरू होता. दहा-पंधरा मिनिटानंतर काहीतरी पडल्याचा आवाज आला. सुप्रिया आई बाबा शाल्वी सगळे धावत बाहेरच्या खोलीत आले तर माधव व्यायाम करताना खाली पडला होता. बेशुद्ध अवस्थेत…! अगदीच अनपेक्षित ,पुन्हा एकदा तिच्या वाट्याला आलेलं दुःख तिची पाठ सोडतच नव्हतं जणू……
क्रमशः
सुप्रिया माधवच्या मागचा अडचणींचा ससेमिरा कधी सुटणार ?
वाचा पुढील भागात
……. मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
खरेच कधी सुटणार सुप्रिया-माधवच्या मागचा अडचणींचा ससेमिरा?अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही, भूतकाळ परत आणण्याची क्षमता त्यांच्यात नसते.
सुंदर वाक्य
👌🏻👌🏻