विनायक च्या अचानक जाण्याने सुमतीवर आभाळ कोसळलं होतं. पदरात दोन लहान मुलं डोक्यावर घराचं कर्ज आणि विनायकने अर्धवट सोडलेली कामे . सुमतीने कंबर कसली आणि एका खाजगी कोचिंग क्लास मधे नोकरी सुरू केली. पै अन् पै साठवून ती कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होती पण संकटांची मालिका काही संपत नव्हती.
एका दुपारी सुमतीला बँकेच्या मॅनेजरचा फोन आला,’ मॅडम, मी सिटी बँकेतून बोलतोय. तुमच्या पतीचे एक लॉकर आमच्याकडे आहे. आम्ही वारंवार पत्र पाठवूनही भाडे न भरल्यामुळे नियमानुसार आम्ही ते लॉकर ब्रेक केले आहे. त्यात बरंच सामान आहे. तुम्ही येऊन घेऊन जा’. सुमतीला धक्काच बसला. विनायकने कधीच लॉकर बद्दल तिला सांगितलं नव्हतं. एकामागे एक विनायक साठी प्रश्न तिच्या मनामध्ये येऊ लागले. तिला वाटलं कदाचित मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी काही लपवून ठेवले असेल. सुमती बँकेत पोहोचली मॅनेजरने तिला एका खोलीत नेले तिथे टेबलवर सोन्याचे हार, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या पाटल्या, हिऱ्यांच्या अंगठ्या, काही दुर्मिळ रत्ने आणि रोख रक्कम ठेवली होती.
सुमती सुन्न झाली विनायककडे एवढी संपत्ती कुठून आली? की त्यांनी कोणाकडून हे उसने घेतले? की गुप्तधन ? तिच्या अंगावर सर्रकन काटा आला.
मॅनेजर म्हणाले , मॅडम हे सर्व घेण्यासाठी तुम्हाला थकीत भाडं आणि दंड म्हणून साठ हजार रुपये भरावे लागतील. सुमतीने पदरमोड करून उसने पासने करून ते पैसे भरले आणि सोपस्कार पूर्ण केले. तिला वाटलं आता मात्र सर्व दुःख संपलं. घरावर असलेले कर्ज फेडून घर सोडवावे. दुःखातही सुखाची एक झुळूक येऊन गेली.
दोन दिवसानंतर सुमती ते दागिने सुरक्षित ठेवण्याचे नियोजन करत असताना पुन्हा मॅनेजरचा फोन आला. यावेळी त्याचा आवाज थरथरत होता. मॅडम खूप मोठी चूक झाली आहे. आमच्या नव्या क्लार्कने विनायक देशपांडे यांच्या ऐवजी चुकून विनायकदास ओसवाल यांचे लॉकर फोडले. तुमचे पती आणि त्यांचे नाव सारखे असल्यामुळे हा घोळ झाला. शेठजी बँकेत येऊन आरडाओरडा करत आहेत. तुम्ही प्लीज ते दागिने घेऊन लगेच बँकेत या. सुमतीच्या पायाखालची जमीनच सरकली तिने स्वतःचे पैसे खर्च करून दुसऱ्याचे दागिने सोडवले होते. सुमती धावतच बँकेत गेली. तिथे लालबुंद झालेले ओसवाल शेठ बसले होते. सुमतीने प्रामाणिकपणे ते दागिने त्यांच्यासमोर ठेवले. शेठजीनी आपले दागिने तपासून पाहिल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. मॅनेजर घाबरत म्हणाला, मॅडम , तुमच्या पतीचे खरे लॉकर आम्ही शोधले, हे घ्या . त्यांनी एक छोटा डबा सुमती समोर ठेवला त्यात फक्त एक जुनी डायरी एक पेन आणि एक चांदीचे नाणं होतं. सुमतीला हसावं की रडावं कळेना. ती मॅनेजर वर ओरडली, माझे साठ हजार रुपये कोण देणार?
शेठजी हसले आणि म्हणाले बाई तुम्ही प्रामाणिक आहात तुमचे साठ हजार आणि वरून बक्षीस पण देतो. पण खरी मजा पुढेच होती.
सुमतीने तो छोटा डबा, ती डायरी आणि चांदीचं नाणं हातात घेतलं. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. ओसवाल शेठजींनी तिची प्रामाणिकता बघून तिचे ६० हजार रुपये परत केले आणि कृतज्ञता म्हणून वर काही रक्कम देऊ केली, पण सुमतीचं मन तिथे नव्हतं. ती सुन्न अवस्थेत घरी आली.
तिला वाटलं होतं की विनायकने तिच्यासाठी काहीतरी मोठी संपत्ती मागे ठेवली असेल, पण हातात होती फक्त एक जुनी फाटकी डायरी. तिने रागाच्या भरात ती डायरी कचऱ्यात टाकून देण्याचे ठरवले, पण अचानक तिची नजर डायरीच्या पहिल्या पानावर गेली. तिथे विनायकच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं— “सुमती, ही डायरी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.”
कुतूहलाने सुमतीने डायरीची पाने उलटायला सुरुवात केली. त्या डायरीत विनायकने कोणतीही संपत्ती किंवा जमिनीचे हिशोब लिहिले नव्हते. त्याऐवजी, त्यात अशा अनेक लोकांची नावे, पत्ते आणि मोबाईल नंबर होते, ज्यांना विनायकने गेल्या दहा वर्षांत मदत केली होती. कुणाच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं, तर कुणाच्या मुलाच्या शिक्षणाची फी भरली होती. कुणाला आजारपणात दवाखान्याचा खर्च दिला होता.
डायरीच्या शेवटच्या पानावर एक चिठ्ठी होती:
“सुमती, मी तुला दागिने किंवा बँक बॅलेन्स देऊ शकलो नाही, पण मी माणसं कमवली आहेत. कधी अडलीस तर या लोकांना फक्त एक फोन कर, हे माझं कुटुंब तुझ्या पाठीशी उभं राहील.”
सुमतीने साशंकतेने डायरीतील पहिल्या नंबरवर फोन लावला. तो एका मोठ्या हॉस्पिटलच्या ट्रस्टीचा होता. सुमतीने स्वतःची ओळख करून देताच पलीकडून आवाज आला, “वहिनी, विनायक दादांमुळे आज मी या पदावर आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची आणि तुमच्या घराच्या कर्जाची जबाबदारी आजपासून माझी आणि आमच्या संस्थेची असेल. दादांनी आमच्यासाठी जे केलं, त्यापुढे हे काहीच नाही.”
एकामागून एक फोन येऊ लागले. कुणी सुमतीला नोकरी देऊ केली, तर कुणी मुलांच्या करिअरची जबाबदारी घेतली. विनायकने पेरलेलं ‘माणुसकीचं धन’ आज सुमतीच्या मदतीला धावून आलं होतं.
सुमतीला समजलं की, कोट्यावधींच्या जमिनीपेक्षाही विनायकने कमावलेली ही ‘माणसं’ आणि त्यांनी दिलेलं ‘प्रेम’ हीच तिची खरी श्रीमंती होती. तिने तो चांदीचा शिक्का कपाळाला लावला आणि पुन्हा एकदा उभं राहण्याची जिद्द तिच्या मनात निर्माण झाली.
….. मोहिनी राजे पाटनुरकर









साधीशी पण माणुसकीचे मूल्य जपणारी कथा
खूप छान लिहिले… मोहिनी
खूप सुंदर लिहिले,खरं आहे पैशापेक्षा माणसे जपणे हिच खरी श्रीमंती
Chan