सौभाग्यपोथ
लहानपणापासून सोन्याचे दागिने घालायची मला खूप हौस होती…
कधी कधी मी आईचे दागिने सहजच घालून आरशात स्वतःला न्याहाळत बसायचे. त्या चमचमणाऱ्या दागिन्यांमध्ये मला एक वेगळंच आकर्षण वाटायचं.
लग्नानंतर तर माझ्या या हौसेने अक्षरशः जोर धरला. हातात थोडे पैसे साठले की मी सोनं खरेदी करायला लागले. उगाच सटरफटर वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा थोडं थोडं सोनं घेत राहावं, असं मला नेहमी वाटायचं. माझ्या मते सोनं म्हणजे फक्त दागिना नसतो… तो स्त्रीचा आत्मविश्वास असतो, बचत असते आणि अडीअडचणीच्या वेळी आधारही ठरतो.
माझ्या या आवडीची माझ्या नवऱ्यालाही पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच प्रत्येक सणाला, वाढदिवसाला किंवा एखाद्या खास दिवशी ते मला छोटासा का होईना, पण सोन्याचा एखादा अलंकार नक्की भेट देतात. कधी अंगठी, कधी कानातले, तर कधी एखादं नाजूक पेंडंट… आणि मीही ते लहान मुलासारखं आनंदाने जपून ठेवते.
अशातच एक दिवस माझ्या नवऱ्याला त्यांच्या मित्राकडून समजलं की काही सोन्याचे दागिने लिलावात विकले जाणार आहेत. ते दागिने गहाण ठेवलेले होते. समोरच्या लोकांना पैशांची खूप गरज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लिलाव ठेवण्यात आला होता.
त्या दिवशी तिथे खूप गर्दी होती. अनेक लोक दागिने पाहत होते, बोली लावत होते. सोन्याचे दागिनेही भरपूर होते — चैन, अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र, कानातले… सगळीकडे सोन्याची अक्षरशः रेलचेल होती.
पण आमचं बजेट फार मोठं नव्हतं.
म्हणून बराच विचार करून आम्ही एक चैन, एक अंगठी आणि एक सुंदर सौभाग्यपोथ घेतली.
त्या सौभाग्यपोथची डिझाईन इतकी सुंदर होती की माझी नजर त्यावरून हटतच नव्हती. काळे मणी, नाजूक सोन्याची नक्षी आणि त्याची उठून दिसणारी रचना… मला ती पहिल्याच क्षणी मनापासून आवडली.
घरी आल्यावर मी क्षणाचाही विलंब न करता ती गळ्यात घातली.
आरशासमोर उभी राहून मी स्वतःकडे पाहतच राहिले…
गळ्यात ती सौभाग्यपोथ इतकी खुलून दिसत होती की मला स्वतःचाच हेवा वाटत होता. त्या दिवशी मी अक्षरशः खूप आनंदी होते.
सुरुवातीचे दोन दिवस सगळं अगदी व्यवस्थित होतं.
पण तिसऱ्या दिवशी दुपारी अचानक काहीतरी विचित्र घडलं…
घरची सगळी कामं आटोपून मी जरा विश्रांती घ्यायला अंथरुणावर पडले होते. झोप काही येत नव्हती, म्हणून मी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळले… आणि अचानक माझ्या डोक्यात जोरात गरगरायला लागलं.
असं वाटत होतं जणू माझं संपूर्ण शरीर हवेत तरंगत आहे…
भिंती हलत होत्या… छत फिरत होतं…
माझ्या डोळ्यांसमोर सगळं धूसर होत चाललं होतं.
मी घाबरून मोठ्याने ओरडले.
माझी मुलं धावत आली. त्यांनी मला पाणी दिलं, डोकं दाबून दिलं. थोड्या वेळाने मला थोडा आराम पडला. मीही तो विषय तिथेच सोडून दिला.
पण काही दिवसांनी पुन्हा तसंच झालं.
यावेळी चक्कर आणखी भयानक होती. मला नीट उभंसुद्धा राहता येत नव्हतं. घरच्यांनी मला ताबडतोब दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी बीपी तपासलं, शुगर तपासली, डोळे तपासले… सगळे रिपोर्ट नॉर्मल आले.
“कमजोरी असेल…”
“ताण असेल…”
असं सांगून औषधं दिली गेली.
पण माझ्या चक्कर येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेलं.
कधी अचानक भिंती फिरल्यासारख्या वाटायच्या…
कधी अंथरुण हलत असल्यासारखं वाटायचं…
तर कधी रात्री झोपेतून दचकून जाग यायची.
मी हळूहळू घाबरट होत गेले. घरचेही खूप परेशान झाले. कामात लक्ष लागत नव्हतं. मी जास्तीत जास्त वेळ अंथरुणावर पडून राहू लागले.
एक दिवस आमच्या ओळखीच्या एका वृद्ध आजी मला भेटायला आल्या. त्यांनी माझी अवस्था पाहिली आणि शांतपणे विचारलं,
“तुझ्या आयुष्यात अलीकडे काही नवीन घडलं का?”
मी लगेच “नाही” म्हणाले…
पण काही क्षणांनी अचानक माझ्या डोक्यात चमकलं.
मी घाईघाईने म्हणाले,
“आजी… मी लिलावातून आणलेली नवीन सौभाग्यपोथ घातली आहे… आणि तेव्हापासूनच हे सगळं सुरू झालंय.”
आजी काही क्षण शांत राहिल्या.
मग हळू आवाजात म्हणाल्या,
“बाळा… दुसऱ्याचे दागिने असे लगेच अंगावर घालायचे नसतात. कोणाची वस्तू आहे… कोणत्या परिस्थितीत वापरली गेली आहे… त्यात कोणाच्या भावना, दुःख किंवा नकारात्मक ऊर्जा अडकली आहे, काही सांगता येत नाही…”
त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला.
त्या रात्रीच मी ती सौभाग्यपोथ गळ्यातून काढून कपाटात ठेवून दिली.
आणि आश्चर्य म्हणजे…
पुढच्या काही दिवसांत माझ्या चक्कर हळूहळू कमी होऊ लागल्या.
एक आठवडा गेला…
दोन आठवडे गेले…
आणि मी पुन्हा पूर्णपणे नॉर्मल झाले.
घरच्यांनी म्हटलं,
“कदाचित भीती मनात बसली होती…”
डॉक्टर म्हणाले,
“कधी कधी मानसिक ताणामुळेही असं होतं…”
पण आजही त्या सौभाग्यपोथचा विचार आला की माझ्या अंगावर शहारे येतात.
कारण एक गोष्ट अजूनही मला अस्वस्थ करते…
मी ती सौभाग्यपोथ ज्या डब्यात ठेवली आहे, तो डबा उघडला की आजही मला एक विचित्र बेचैनी जाणवते…
आणि म्हणूनच…
आजही मी सोनं विकत घेते, दागिने घालते…
पण दुसऱ्याच्या आयुष्याशी जोडलेला दागिना पुन्हा कधीही अंगावर घालत नाही…!
सौ.दर्शना ओ.भुरे..
तळटीप
कथा काल्पनिक आहे.
आम्ही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही….











काही गोष्टी कल्पनापलीकडे असतात….. छान मांडणी दर्शना
छान पण भयानक कथा.