आठवणीतील गाव-मराठी कथा
तिन्ही सांजेची वेळ , धुरळा उडवत आणि आवाज करत एस.टी स्टॅन्डवर येऊन उभी राहिली. तो बस मधुन उतरला एक नजर आजुबाजुला फिरवली. काही ओळखीचे चेहरे समोर आले. त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करून घराच्या वाटे कडे निघाला. गावच्या वेशी जवळ आल्यावर वेशीच्या उजव्या बाजूला दोन मंदिर होते . एक मारुतीचं आणि दुसरं संत मंदिर त्यासमोर मोठा सभागृह . जिथे गावातील भागवत सप्ताह संपन्न होतात. तर उन्हाळ्यात लग्न. रोज संध्याकाळी सांज आरती असते .
आता पण आरती चालली होती .
“युगे अठ्ठावीस विटेवरी उभा|”नकळतच त्याचे पाऊले मंदिराकडे वळाले . दर्शन घेतले आणि तो गावच्या ओबडधोबड रस्त्यावरून चालू लागला. मध्येच एखादी आज्जी ओट्यावर बसलेली दिसत होती. तिन्ही सांज म्हणुन झाडावर पाखरांची किलबिल ऐकु येत होती. शेतातुन घरी परतणारी माणसे. कोणाच्या डोक्यावर गवताचे भारे तर कोणाच्या हातात शेळी नाही तर बैल . अन बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज. हे सगळे बघत तो कधी घरा समोर आला हे त्याला पण समजले नाही.
घराला कुलूप होते. म्हणजे आई अजून आली नव्हती. तो तिथेच ओट्यावर बसला .त्याला स्वताचे बालपण आठवले. शाळेतून घरी आला की तो अशीच आईची वाट बघत बसायचा . घरासमोर बोरीचे झाड होते. त्याचे बोर पाडायचा किंवा चिंचोके खात बसायचा . आई कधी येईल. भूक लागलेली असायची. दूर शेता कडून येणाऱ्या वाटे कडे डोळे लावून बसायचा. दूरवरुन डोक्यावर गवताचे ओझे आणि हातात शेळी घेऊन आई येताना दिसली की खूप आनंद व्हायचा त्याला.
गवताचे भारे अंगणात टाकून शेळी बांधे पर्यत आईचा पदर धरून मागे मागे फिरत रहायचा. मग आई घरात जायची. पटकन चुली मधील राख भरून टाकायची. बाहेरून गोवऱ्या आणि बाभळीचे सरपण घेऊन घरात यायची. दिवा लावायची . चुल पेटवायची मग चुलीवर चहा ठेवायची. शेतातुन आणलेली भाजी काढायची . त्या बरोबर मुगाच्या किंवा चवळीच्या शेंगा काढून द्यायची. चहा होई पर्यंत तो शेंगा खात बसायचा . शेळीच्या दुधाचा चहा पिऊन झाला की तो दिवसभर शाळेत काय झाले ते आईला सांगायचा. चुली वरील गरम गरम भाकरी बरोबर भाजी खाऊन घ्यायचा.घरच्या ओट्यावर घरातील सर्व जण बसायचे.
पौर्णिमेच्या आधी आणि नंतर काही दिवस छान चांदणे पडायचे. मग शेजारच्या आज्जी काकू कोणी येऊन बसत. गोष्ट सांगत . आजूबाजूला पडलेला चंद्र प्रकाश, शांतता छान वाटायची. उगाच जमिनीवर पडून आकाशात किती तारे असतील ते मोजण्याचा वायफळ प्रयत्न करायचा. ते बघत बघत झोप कधी लागायची समजत नसे.किती सुंदर दिवस होते ते.
कुठून तरी बाईक चा आवाज आला आणि त्याची तंद्री तुटली. दुर वरुन येणाऱ्या पाय वाटे वरून एक बाईक येत होती. शेजारच्या काकू मुला बरोबर बाईक वरुन शेतातुन आल्या होत्या. आता गाव बदलले होते. कोणी पायी जास्त चालत नाही.
दूर वरून येणारी आई दिसली तशीच अनेक वर्षा पुर्वी होती तशीच डोक्यावर गवताचे ओझे, हातात शेळी .फक्त आई आता थकली होती. जवळ आली. त्याला बघून आनंदी झाली. तो पुढे गेला. गवत घेतले. शेळी बांधली. आई कडून चावी घेतली . घरात गेला पाणी आणून आईला दिले. त्याने आईला गॅस घेऊन दिला होता . त्यानेच चहा केला. गॅस वर आईने कुकर लावला. त्याच्या साठी चपात्या केल्या. तो नको नको म्हणत होता.
पण तुला आता भाकरीची सवय नसेल राहिली ना …
असे म्हणून तिने त्याला ते जेवण दिले. त्याला ओरडून आईला सांगावे वाटत होते.
आई मला परत चुली वरील भाजी-भाकरी हवी गं . पण त्याने ते मनात ठेवले कारण त्याला माहीत होते .असे वरणभात चपाती आई फक्त तो आल्यावर करते . आपल्या बरोबर ती दोन तीन घास चांगले खाते . म्हणून तो गप्प राहतो . आईचे लक्ष नाही हे बघून तो दुपारची टोपल्यातील भाकर घेऊन खातो . त्याच्या कडे सगळे आहे पण आई त्याच्या बरोबर राहत नाही. तिला शहरातील वातावरण आवडत नाही. कारण तिचे आयुष्य शेतात गेलेले असते ना .
तो जेवून बाहेर येतो .आता पण तसाच प्रकाश पडलेला असतो . फक्त आता कोणी बसायला येत नाही. कारण आता शेजारच्या आज्जी काकू घरात टीव्ही बघत असतात . एक होता राजा कधीच हरवलेला असतो .आकाशातील तारे मोजण्या पेक्षा मुले घरात मोबाईल वर गेम खेळत बसतात . तो मनात म्हणतो
हरवला गाव माझा ..
आशा नवले ,मुंबई.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
आठवणीतील गाव आणि आता बदललेले गाव…ह्दयस्पर्शी लिखाण
वास्तव चित्र… खूप छान
सत्य
सुरेख लेख