सप्तरंगी इंद्रधनुष्य
ज्योती रामटेके
पाच वाजले आणि रंगोलीची घाई सुरू झाली. पलाशची घरी येण्याची वेळ झाली होती. पटापट तिने रंग ठेवले. दिवसभर रंगाचा चाललेला खेळ रोज सहा वाजता बंद करणे तिच्या जीवावर येत होते पण काय करणार? आईचा आदेश होता तसा. चित्राला जिवंत करण्याचे कसब तिला जन्मतःच मिळाले होते. आईने रांगोळी रेखाटली कि ती बघत बसायची.मी काढते म्हणून रडायची,रुसायची.
आई मग तिला रांगोळीत रंग भरायला बोलवायची.रंगसंगती छान जमायची तिला.बाबा तर रोज आईला म्हणायचे.. बघ तुझ्यापेक्षा किती सुरेख रंग भरते ती.
बाबाने तिला चित्रांचे पुस्तक आणि रंग आणून दिले.
दिवसभर रंगांच्या दुनियेत असायची ती.जे दिसेल त्याला रंग देऊन आकर्षक बनविण्यासाठी धडपड करायची ती.
हातात सतत कुंचला असायचा तिच्या.आई तर खूप चिडायची. अगं बाई.. या कुंचल्यातून तुला काय मिळणार देव जाणे.सतत रंगाने माखलेले असतात तुझे हात. अभ्यास आणि रंग या पलिकडे पण जग आहे म्हटले.
आता तिची कला विस्तीर्ण होत होती. तिचे शाळेत कौतुक होऊ लागले.कोणत्याही चित्राला हुबेहूब जिवंत करायची.
घरात बाबाने तिच्या पेंटींग लावून ठेवल्या होत्या.बाबा करायचे कौतुक पण आईची सतत कुरबूर.
आई तुला रंगाचा का राग येतो ग?
ती विचारायची.
अगं निसर्गात बघ जरा देवाने किती सुंदर रंगछटा बनविल्या. प्रत्येकाचा रंग वेगळा. निळाशार शांत सागर .. त्याच्या फेसाळलेल्या लाटा .. किती मनोहारी आहे सगळे. सागराच्या काठावर पसरलेली वाळू.आणि हळूहळू सारा आसमंत आपल्या कवेत घेत लालबुंद सुर्याचा गोळा कसा दिसतो नं. चुलीतले निखारे जेव्हा खूप पेट घेतात अगदी तसा दिसतो तो.अस्ताला जातो तेव्हा आकाशात लाल पिवळ्या रंगांच्या छटा काय विलोभनीय दिसतात.
नुसत्या डोळ्यांनी बघितले तरी मन सुखावते. स्पर्श न करता त्याच्याकडे बघत राहायची इच्छा होते. या जगात खरी मजा रंगामुळे तर आहे मग तो उत्साहाचा असो की
आनंदाचा.हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत किती समाधान मिळते. ..सतत रंग बदलनारे आकाश कधी बघितले का तू
सकाळी टेकडीच्या मागून तो उगवतो तो रंग या जगात कुणी तरी बनवू शकेल का. सुर्यास्त आणि सुर्योदयाचा अलौलिक सोहळा बघ जरा..
आई हसली.. तिच्या हसण्यात दुःखाची झालर दिसत होती.
अरे बाळा.. हा रंगाचा इन्द्रधनुष्य तुझ्यात कुणामुळे आला माहिती आहे.. तुझ्या आजीमुळे म्हणजे माझ्या आईमुळे. तिलाही प्रचंड आवड होती रंगाची. आजोबा सांगायचे लहानपणी ते तिला रोज सुर्यास्त बघायला नदीकाठी घेऊन जायचे.लाडाची होती ती आजोबांच्या. त्या काळात फक्त निसर्गाचे रंग बघण्याचा स्त्रीला अधिकार होता. बाकी रंगाची ओळख नव्हती तिला.
चुल आणि मुल या पलिकडे तिचे विश्व नसायचे. काही घरी तर त्यांना शाळा शिकायला बंदी असायची मग रंगकाम तर दूरच होते.
आईचे लवकरच लग्न झाले. श्रीमंत घरात गेली ती.
आयुष्यभर दडपणाखाली जगली. नदीकाठच्या सुर्यास्ताची
सतत आठवण येत होती तिला पण काय करणार?
माहेरी आली की रोज नदीकाठी सुर्यास्त बघायला जायची. तो रंगाचा खेळ तिला आवडायचा. माझ्या बाबांनी मात्र तिला कधीच घराबाहेर नेले नाही.आईने कधी हट्ट धरला तरी ते म्हणायचे …काय करायचे सुर्यास्त बघून. तो काय रोजच होतो.
आई चित्र हूबेहूब रेखाटायची. बाबांनी मात्र तिला आवडीने कधी कोणता रंग आणला नाही. काही दिवसांनी तिने चित्र काढणे सोडून दिले. हळूहळू ती रंगांच्या दुनियेतून निघून गेली. मी बघायची सर्व. त्यामुळेच मी रंगापासून अलिप्त राहली. तुझ्यात मात्र तिचा रंगाचा खेळ आलाच.
मला भिती वाटते ग.. तुझे आईसारखे झाले तर ?
आई.. आजकाल असे काही नाही. पुरुष प्रोत्साहन देतात बायकोला..
रंगोली.. खरे आहे तुझे. बदल झाला आहे. पण अजुनही काही अपवाद आहे त्याला. बायकोचे छंद जोपासण्यासाठी मोठे मन लागते. तुला समजून घेणारा जोडीदार मिळाला की झाले. मला दुसरे काय पाहिजे. तो पण या निसर्गाच्या रंगात मिसळणारा हवा.
आई.. किती काळजी करते ग… हे बघ लग्न झाले की पहिले पोर्ट्रेट त्याचेच काढणार . बघून घेशील. आई हसली.
देवा.. रंगोलीच्या मनासारखे घडू दे सर्व.
आई.. हे काय, केली देवाला प्रार्थना.. अगं स्वतःसाठी मागत जा काही. मला काही नको आता. मनासारखा जावई मिळाला की झाले. आई चल बस आज तुझ्यावर नंबर. आज तुझे पोट्रेट काढते.
नको ग बाई.. चार .. पाच तास एका जागेवर बसणे जमायचे नाही मला. पुतळयासारखे बसवून ठेवते तू.
तुझ्या बाबाचे काढ.त्यांना भरपूर वेळ असतो.त्यांनी कधी तरी घरातली जबाबदारी घेतली का? सतत मित्र.. मंडळी.
आणि फिरणे.नाहीतर आहेच टीव्ही. सुट्टीचा अख्खा दिवस त्या टीव्ही समोर जातो.
रंगोलीचे काॕलेज संपले..घरात लग्नाची चर्चा सुरू झाली. पलाश सर्वांना आवडला.
आईने बजावून सांगितले होते कि लग्नानंतर लगेचच आपल्या कलेचे घरात प्रदर्शन मांडायचे नाही. आधी पलाशला काय आवडते ते बघायचे. त्याच्या कलाकलाने घे सर्व. आधी त्याच्या आवडीला जप. तुझे आईसारखे नको व्हायला म्हणून सांगते ग. पलाशचा स्वभाव माझ्या बाबासारखा असेल तर? विचार करूनच जीव धास्तावतो.
आई …
किती विचार करते ग. रंगोली आईवर ओरडली.
दोघी लग्नाच्या तयारीला लागल्या.आईमध्ये तर वेगळाच उत्साह संचारला होता.हल्ली आधीसारखे कामे होत नाही ग म्हणणारी आई दिवसरात्र कामे करत होती. रंगोली मनात हसायची. लग्नाचा दिवस उजाडला.
दोघांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. पलाश जबाबदार.. समजदार होता. पलाशची आवड ..निवड अद्याप तिला कळली नव्हती. पलाश तसा कलासक्त होता. त्याने प्रथमच सुंदर, गोड रंगाची साडी आणली.रंगाची पारख दिसते पलाशला रंगोली मनातून सुखावली..
आठ दिवसांनी तिचा वाढदिवस. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस.काय देणार पलाश? तिला उत्सुकता वाटत होती.
आज वाढदिवस.. सकाळपासून आई.. बाबांची आठवण येत होती तिला. आज पलाश चार वाजताच घरी आला.रंगोली चल लवकर बाहेर जायचे आहे. दोघे निघाले.
अरे पलाश कुठे निघालोय आपण.
तो काहीच बोलला नाही. दुरुन तिला तिचा आवडता अंथाग सागर दिसत होता. दोघे गाडीतून उतरले. समोर पोट्रेट ठेवून होते. पलाश खाली बसला. हळूच तिच्यासमोर रंगाचा बाॕक्स ठेवला.. रंगोली ही तुला वाढदिवसाची भेट.
आकाशात रंगाचा खेळ सुरू झाला होता.सुर्याचा लालबुंद गोळा परतीच्या प्रवासाला निघाला.लाटा बेधुंद आदळत होत्या. रंगोलीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.माझ्या सप्तरंगात आता कायम पलाशची सोबत राहणार याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. दोघे सुर्यास्त बघत होते.
पलाश.. आपण आपले आयुष्य असेच रंगीत.. इन्द्रधनुष्यासारखे सप्तरंगात भिजवू या.
सुर्य मावळला होता..
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
सुंदर ,प्रसन्न कथा
Wah sundr chg