३आत्मचरीत्र-न लिहिलेले-कथामालिका
(वडिलांची उणीव होतीच तरीही चंद्रकला,सरु आणि आईमुळे शरदचे बालपण समृद्ध होते….पुढे नवनवीन माणसे आयुष्यात आल्यावर शरदचे आयुष्य कसे बदलत गेले….. वाचत रहा….आत्मचरीत्र-न लिहिलेले)
भाग-३
तेव्हा आमच्या खेड्याजवळच्या गावात आठवड्यात एकच दिवस बाजार भरायचा.
बैलगाडीत शेतकरी माल आणायचे.
आता रस्त्यावर गाड्या पार्क राहतात तशा तेव्हा बैलगाड्या,छकडे रस्त्याच्या एका बाजूला उभे असायचे.मातीचे रस्ते धूळ उडवणारे रस्ते असायचे पण धुळीची अॕलर्जी हा शब्द तेव्हा कानी पडला नव्हता.
आठवड्याभराचे सगळे सामान बाजारातच मिळायचे.
शिवाय कपडे,खेळणी,चांदीचे पैंजण,भांडी…या सगळ्या गोष्टी तिथे मिळायच्या. बाजार म्हणजे मला उत्सवच वाटायचा.आदल्या दिवसापासून उद्या बाजारात जायचे आहे याचा आनंद मनात संचारायचा.
रोजच्या जेवणासाठी घराच्या पुढे असलेल्या अंगणात उगवणाऱ्या भाज्याच आधार असायच्या.
कारल्याच्या वेलीवर येणारी कारली,वालाच्या वेलीवरच्या शेंगा, ताजी टमाटे,वांगी..अशी मोजकीच पण चविष्ट भाजी खायला मिळायची.
कोहळ्याचा वेल बोंड बनवायला लावायची आई.
ताजी भाजी तोडून त्याची चुलीवर केलेली भाजी,सोबत ज्वारीची निखाऱ्यावर भाजलेली भाकर
याची सर शांतनूच्या online मागवलेल्या पिझ्झा,बर्गरला कशी येणार?
आणि ऊठसुट शाॕपिंगची सवय असलेल्या आजच्या पिढीला तेव्हाचा आठवडीबाजार समजेल?आठवड्यातून एकच दिवस आठवणीने सगळे सामान आणावे लागायचे.खूप अप्रुप वाटायचे.
मातीची चुल आजी,आई घरीच बनवायच्या.
कसलेही शिक्षण नसलेल्या दोघी चुल किती तंतोतंत बनवायच्या.
मुख्य चुलीवर मोठे भांडे आणि बाजूला असलेल्या ऊल्यावर छोटे भांडे ठेवायची.भांडे काळे होऊ नये म्हणून चुलीवर ठेवण्याआधी त्याला माती लावायची.
जेवणासाठी घरात मोजकीच भांडी असायची.
चारपाच ताटल्या आणि तेवढ्याच वाट्या.
वेगवेगळ्या प्रकारची डिनरसेटस् वापरणाऱ्या पिढीला एकाच ताटलीत बहीणभावाने जेवण्यातील मजा कळेल?
घराच्या दारात विहीर होती.
थोडा मोठा झाल्यावर शरद रहाटावरुन पाणी ओढायचा.
घरात पाणी साठवायला मोजकीच भांडी.
एक आईच्या लग्नात आंदण आलेला गंगाळ
आणि एक मोठा रांजण बस्स एवढेच. .
आई विहीरीवर चढून बादलीला दोरी बांधून झपझप पाणी ओढायची.
आईचा दिवस पहाटेच सुरु व्हायचा.घर,अंगण फड्याने झाडून झाले कि सडा,सारवण,चुलीवर पाणी गरम करुन आंघोळ,स्वयंपाक करुन शेतात न्यायला एका कपड्यात शिदोरी बांधून नऊ वाजता शरद सोबत आई निघायची.
बहीण दिवसभर आजीच्या भरवशावर.
बाबांच्या अचानक जाण्याने आजी खचली होती.बाजूला काका,काकु राहायचे.पण आजी आधीपासून बाबांसोबतच राहायची.
आई सांजवेळी घरी यायची. आजी कंदिल आणि दिवा साफ करुन लावायची.
पुढची सगळी कामे त्या मिणमिणत्या प्रकाशातच व्हायची.
आई एखाद्या दिवशी शेतावर मजुरीला गेली नाही तर चुलीत जाळायला लाकडांची मोळी आणायची.विटलेल्या लुगड्यांची




