काही गुन्हे अक्षम्य असतात.
मुक्ता शाळेत जायला लागली.शलाकाचे आयुष्य तसे सुरळीत सुरू होते पण तिचा भूतकाळ तिचे आयुष्य सुरळीत होऊ देतो का? तिच्या मनाला कुरतडणारा भूतकाळ वारंवार उत्तर नसलेला प्रश्न बनून तिच्यापुढे उभा राहतो.संवेदनशीलआनंदवर,त्याच्या लिखाणावर प्रेम करणारी शलाका अस्वस्थ मनावर का मात करु शकत नाही….
अक्षम्य
भाग-४
आनंद शलाका या जेवायला.
आईने आवाज दिला.
सगळे मिळून जेवायला बसले. आनंदच्या आईने आज शलाकाच्या आईलाही जेवायला बोलवले होते.
अरे वा! आई आज माझ्या आवडीचे श्रीखंड-पूरी.
हो ग.तू केस जिंकल्याच्या आनंदात केली.त्यादिवशीच करणार होती.पण तुम्ही मित्रांकडे गेलात म्हणून मग आज बनवले.
रात्रीचे जेवण सगळ्यांनी मिळून घ्यायचे असा त्या घरचा आनंद लहान असल्यापासून दंडक होता.
आनंद शलाका कधीतरी मित्र मंडळीसोबत बाहेर गेले तर एखाद्या दिवशीच सोबत जेवण नाही व्हायचे.
आनंदचे बाबा मनोहरराव पोलिस अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते.
प्रामाणिक अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. पोलिसस्टेशनमध्ये जरी ते शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते असले तरी घरात त्यांचे वेगळे रुप होते.
घरात त्यांचे असणे म्हणजे सतत निखळ आनंदाचा झरा वाहत राहणे. सतत आनंदी राहण्याचा त्यांचा स्वभाव होता.म्हणून त्यांनी मुलीचे नाव आनंदी आणि मुलाचे नाव आनंद ठेवले.
आनंदची आई सुमन सर्वार्थाने मनोहररावांना साजेशी. मनोहरराव नौकरीनिमित्त सतत बाहेर असायचे. अशावेळी आनंद आणि त्याची बहीण आनंदीची पूर्ण जबाबदारी सुमती पार पाडायची. आनंदी आणि आनंद लहानपणापासून अभ्यासू आणि हुशार होते.
आनंदी आनंदपेक्षा चार वर्षांनी मोठी
जरा लांब असलेल्या शहरात तिचे लग्न झालेले
आनंदी डाॕक्टर बनली.संवेदनशील स्वभाव असलेला आनंद साहित्यात असलेल्या आवडीमूळे साहित्याकडे वळला.
मनोहररावांनी मुलांवर आपली मते लादली नाहीत.त्यामुळे
मुलांनी काय करावे हे ज्याचे त्याने ठरवले.
मनोहरराव सतत बाहेर असले तरी मुलांची निकोप वाढ व्हावी यावर त्यांचा कटाक्ष असायचा.विशेषतः भावनिक वाढ.
आईवडिलांविना वाढलेल्या मनोहररावांना भावनेचा कोंडमारा किती जीवघेणा असतो हे माहित होते.
तुमचे शरीर आपसूक वाढतच राहते .ते निसर्गाचे काम निसर्ग पार पाडतो.पण मनाला भावनेची आणि भावनेला निचरा होण्याची गरज असते.ती गरज फक्त आपली माणसेच पूर्ण करु शकतात. म्हणून ते आवर्जून वेळ मिळाला कि मुलांना द्यायचे.
त्यांना लहानपणी वेगवेगळ्या नातेवाईकांकडे आश्रितासारखे राहावे लागले. घराची ऊब त्यांना कधी मिळाली नाही. नातलगांचे घर त्यांचे कधी बनले नाही.म्हणून त्यांना घर,कुटुंब यांच्याबद्दल विशेष प्रेम होते.
सुमती त्यांचा मित्र सदाशिवची लहान बहीण. लहानपणापासून अनाथ म्हणून सदाशिवच्या कुटुंबाची नेहमी मनोहररावांना सहानुभूती मिळायची. वेळप्रसंगी मदतही मिळायची.सुमतीबद्दल त्यांना तेव्हापासूनच प्रेम वाटायचे.परिस्थितीमुळे ते व्यक्त करु शकले नाहीत.पण पोलीसखात्यात नौकरी मिळाली,त्यांनी सुमतीला मागणी घातली.सुमतीशी लग्न झाले आणि घरपण अनुभवायला मिळाले.
सुमतीशी लग्न झाल्यावर नवराबायकोपेक्षा मैत्रीचे नाते दोघांमध्ये फुलत गेले.
मुलांनाही त्यांच्याबद्दल जवळीक वाटायची. म्हणूनच आनंदी प्रेमात पडली तेव्हा सगळ्यात आधी तिने तिचे गोड गुपीत वडिलांजवळ उघड केले.
मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने सुमतीने केलेला विरोध मनोहररावांनी मोडून टाकला.
आधी मुलांचा आनंद आणि मग जात असे सांगत त्यांनी सुमतीला समजवले.
आनंदनेही शलाकाशी लग्न करायची इच्छा आधी बाबांजवळच बोलून दाखवली. तेव्हा मनोहररावांची बदली दुसऱ्या शहरात होती.
शलाकाचे कुटुंब जवळपासच राहणारे.विरोध करण्याला कारण नव्हते.
फक्त आनंदच्या घाईचे त्यांना आश्चर्य वाटत होते.एकाच महिन्यात लग्न करायचे असा त्याचा हट्ट होता. बरे प्रेमविवाहही नव्हता. पण त्यांच्यावर तेव्हा कामाचा खूप दबाव राहत होता त्यामुळे आनंदसोबत तेवढे बोलणे झाले नाही. पण आताही कधी आनंद अस्वस्थ असला कि आधी त्यांच्याच लक्षात येते.
खूपदा आनंदशी एकदा मोकळेपणाने बोलावे असेही त्यांना वाटायचे.
आनंद…शलाकाने आवाज दिला.
काय ग?
अरे आईकडे जरा दोन दिवस जावून यायचे म्हणते.
जा कि.त्यात काय विचारायचे.
मुक्ताला नेते सोबत.
बरं.चारपाच घराआड तर आईचे घर आहे शलाका.
यावेळी का ग दोन दिवस?
अरे खूप दिवस झाले. मी जावून राहलेच नाही.आई नेहमी राहायला बोलवते.
बरं.पण परवाच भेट झाली आईसोबत.
हो रे. पण घरालाही भेट द्यायची असते ना.बाबांनी फुलवलेली बाग,बागेतील फुले,अंगणातला झोपाळा ह्या सगळ्यांनाच मला भेटायचे असते.
आनंद हसत बोलला,बघ निर्जीव वस्तुंना सुद्धा तू किती आवडतेस.मग माझ्यासारख्या जिवंत माणसांचे काय होत असणार?
चल,चिडवतोस नं मला.
जा.मी काॕलेजमधून येतांना मुक्ताला शाळेतून तिकडेच सोडून देईल.
चालेल.
शलाकाचे माहेर चार पाच घरे सोडून होते.तिचे लग्न झाले तेव्हा आनंदच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरुममधून तिचे घर दिसायचे. दोघांच्या घराच्या मध्ये तेव्हा एकही घर नव्हते.
शलाका आईवडिलांची एकूलती एक लेक.तिचे वडील प्रभाकरराव काॕलेजमध्ये प्राचार्य होते. काॕलेजमध्ये फार दरारा होता त्यांचा. काॕलेज असूनही तिथे त्यांनी शाळेसारखी शिस्त लावली होती. खूप चांगले उपक्रम सुरु केले होते.गरीब विद्यार्थ्यांना कायम मदतीचा हात दिला. केवळ त्यांच्या मदतीमुळे त्यांचे बरेच विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे झाले होते.
आनंद त्याच काॕलेजमध्ये शिकला होता. त्या घरचा जावई झाल्यावरही तो प्रभाकररावांशी अदबीनेच राहायचा.आनंदही त्याच काॕलेजमध्ये प्राध्यापक बनला.
दोन वर्षापूर्वी प्रभाकरराव ह्दयविकाराने गेले.
शलाकाची आई लीलावती आता घरी एकटीच राहायची.एका शाळेत शिक्षिका असलेल्या शलाकाच्या आईने शलाकाचे लग्न झाल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
पुढील भागाची लिंक
क्रमशः
कथेची मुळ कल्पना-विशाल भोवते
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.