९-आत्मचरीत्र-न लिहिलेले
माझी आई
माझ्या आईचा जन्म झाल्यानंतर तिच्या पाठीवर मामा दहा वर्षांनी झाला त्यामुळे साहजिकच ती खूप लाडकी होती. .लहानपणापासून आई शांत स्वभावाची होती.
आजोबांनी आईचे नाव तारा ठेवले.
तेव्हा मुलींना शिक्षण द्यायलाच हवे अशी मानसिकता नव्हती.आजोबांना वाटायचे ताराला शाळेत घालावे.पण शाळा दूर होती.म्हणून आजी ताराला शाळेत पाठवायला तयार झाली नाही.
आईच्या माहेरी कुटूंब मोठे होते.आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ आणि आजोबांची एक बहीण जी सासरचे त्रास देतात म्हणून माहेरी राहायची…एकत्र कुटुंबात सगळे मिळून राहायचे .आईची आजी असेपर्यंत सगळे एकत्र होते.आजी गेल्यांतर सगळ्यांच्या वाटण्या झाल्या. मोठ्या घराचे मध्ये मध्ये भिंती बांधून छोट्या छोट्या घरात रुपांतर झाले.
सगळे वेगळे झाले पण एकमेकांवर प्रेम होते तसेच राहले.मी आजोळी जायचो तेव्हा बरीच वर्ष मला सख्खा मामा,चुलत मामा यातील फरक समजायचा नाही.
मध्ये मोठे अंगण आणि चारही बाजूला घरे.उन्हाळ्यात आईच्या चुलतबहिणी,बाहेरगावी असणारे मामा असे सगळे जमायचे.रात्री आम्ही सगळे सोबत जेवायचो आणि सगळे अंगणातच झोपायचो.खाली पातळसर अंथरुण आणि वर चांदण्यांनी भरलेली आभाळ.
आजी,एखादी मामी रात्री झोपतांना आम्हाला गोष्टी सांगायच्या.दिवसभर खेळून दमलेले आम्ही गोष्ट ऐकतांना कधी झोपायचो कळायचेही नाही.त्यामुळे खूप गोष्टींचा शेवट कधी समजलाच नाही.
आम्ही तिथे असेपर्यंत रोज एकेका मामाकडे जेवायला बोलवायचे.जेवणात बहूतेक आंब्याचा रस असायचाच आणि सोबत कुरड्या,पापड,मांडे असायचे.
सगळ्यांच्य मनात एकमेकांबद्दल अपार माया होती.सगळ्या मामींना आम्ही सगळे एकदाच जमायचो म्हणून त्रास होत असणारच.पण कधीही कुणच्या कपाळावर आठी दिसली नाही.उलट आम्ही अजून काही दिवस थांबावे म्हणून आग्रह करायच्या.
आई पंधरा वर्षाची झाली आणि नात्यातील बाबांसोबत आईचे लग्न झाले. आजोबांनी बाबांच्या आईला म्हणजे माझ्या आजीला शब्द दिला होता.शब्द दिला तेव्हा बाबांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांचेही एकत्र कुटुंब होते.वाटण्या झाल्या.आजोबांच्या वाट्याला कमी पिकणारे शेत आले.
त्यांना शब्द दिल्यामुळे आईचे बाबांसोबत लग्न झाले.दिलेल्या शब्दांना जागण्याचा तो काळ होता
आईबाबांचे लग्न झाले तेव्हा माझे एक काका शहरात राहायला गेले होते.एक काका -काकु,बाबा आणि आजी सोबत राहायचे.
नंतर काही दिवसात आई-बाबा वेगळे राहायला लागले.आजी पण बाबांसोबत आली.घराच्य बाजूला रिकामी जागा होती.तिथे कुडाच्या भिंती बांधून घर उभारले.नंतर शेवटपर्यंत तेच आमचे घर राहले.
माझा ,सरुचा जन्म,बाबा,आजी,आईचे जाणे…सगळे ह्या घराने बघितले.
सुखवस्तु घरातून आलेली आई शांत,सोशिक होतीच. तिच्या गुणांमुळे आजीने आईवर कायम माया केली.सासुपणा कधी गाजवला नाही.आईला सोडून दुसऱ्या सुनेत राहायला गेली नाही.बाबा गेल्यावर आजीने आईला खूप आधार दिला.
आईने कायम तडजोड करत संसार केला.माहेरचा मोठेपणा सासरी आणला नाही,बाबांना मनापासून सोबत केली.नेहमी हसतखेळत राहायची.छोट्या छोट्या गोष्टींवर हसायची.बाबा गेल्यावर मात्र तिचा हसरेपणा कमी झाला होता.बाबांच्या गोष्टी आठवून एकटीच रडत बसायची.अशावेळी आजी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून आईची समजूत काढायची.
मला,सरुला चांगले संस्कार दिले,शिकवले.
काॕलेजमध्ये माझे खूप मित्र विडी ओढायचे.रोज ते बघून मलाही विडी ओढण्याचा मोह व्हायचा.पण आईचा चेहरा समोर यायचा.प्रतिकुल परिस्थितीत तिने मला शिक्षणासाठी पाठवले याची जाणीव होऊन क्षणभर वाटणारा मोह नाहीसा व्हायचा.
तिने कधी कुणाकडून अपेक्षा केल्या नाही त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख कधी तिच्या पदरी आले नाही.सुखापेक्षा समाधान महत्वाचे हे आईजवळून मी शिकलो.
आईजवळ दागिने नव्हतेच.फक्त गळ्यात बाबांनी तिला लग्नात घातलेले छोटे मंगळसुत्र होते.त्यात दहा मणी आणि मध्ये दोन डोरले होते,मला नागपूरला पाठवतांना ते मोडावे लागले.मी समजलो तेव्हा तिच्या भावना. आताही ते आठवून मनाला यातना होतात.
क्रमशः









कथा मालिका आवडली.
👌👌👌🌹