पाणीपुरी
पाणीपुरी

पाणीपुरी

 

पाणीपुरी

समीर घाई..घाईने घरी आला. फाटकातून राॕकी बघतच होता. आल्याबरोबर त्याचा गोंधळ सुरु झाला. म्हणजे  तो रोजचाच कार्यक्रम असे.

चला लवकर फिरायला  जणू तो म्हणत होता. घरी आल्यावर समीर  आरतीला शोधायचा.तशी ती स्वयंपाकघरातच असायची. आजकाल मात्र ती घरी राहत नाही. आज पंधरा दिवस झाले. कुठे जात असेलॽ आई ..बाबाला विचारायचे तर ते तिचीच बाजू घेणार.. आरती तर मैत्रीणी बरोबर फिरायला जाते म्हणून सांगत असते रोज. काय करावे समजत नाही. समीर चांगलाच वैतागला होता.

आज राॅकीला फिरायला बाबाला  म्हणून बघू का…बाबा नक्की रागावतील पण करतो प्रयत्न.

 आरती रोज कुठे जाते ते तर कळेल मला. लग्न झाल्यानंतर  ही पहिलीच वेळ हे असे वागण्याची. मुलगा झाला  आणि तिने तिच्या  इच्छेने नौकरी सोडली. पूर्णपणे  घरात रमली. मुलगा मोठा झाल्यावर आताशी कुठे ती घराबाहेर पडत आहे. कुठेही गेली तरी मी येण्याच्या आत घरी असते.

 

चोवीस तास घरात राहणारी आरती  नेमकी संध्याकाळी  कुठे जात असेलॽ आरतीला कुठेही जायचे असेल तर  आधी फोन करून सांगते पण आजकाल काहीच सांगत नाही.  काय झाले असेल?

तिला वेळ नाही  देता येत त्यामुळे तर ती नाराज नसेल.. पण तसेही काही वाटत नाही. आरती खूप समजदार आहे.

संध्याकाळचा वेळ तर खास राॕकीकरीता राखून ठेवावा लागतो  आई बाबाचे तर त्याच्या सोबत जमत नाही. तो   त्यांच्या सोबत जाणार नाही. तरी बघतो म्हणून

 बाबा आज राॕकीला फिरायला घेऊन जाता काॽ  समीरने  जरा भीत भीतच विचारले. बाबाने चमकून समीरकडे कटाक्ष टाकला.

हे बघ समीर, तीन दिवस उपाशी राहून तू जिद्दीने त्याला घरात आणले.आमचा किती विरोध होता माहीत आहे न तुला. हात पाय  आपटून उपाशी राहून तू आम्हाला ब्लॅकमेल केले. आम्ही तेव्हाच तुला बजावून सांगितले होते कि आम्ही त्याला हात लावणार नाही.   तो  पण पाहिजे तसा लळा लावत नाही आम्हाला.   आणि तसेही तुला फिरायला  जाणे आवश्यक आहे. वजन  बघ. आमचा विरोध  असून  राॕकी घरात आला.  प्रेमविवाहाला घरच्यांनी विरोध करुन  देखील मुलाने  जबरदस्तीने मुलगी घरी  आणने काहीसा तसला प्रकार  होता. घरात येणारी मुलगी  मनात  ठरवूनच येते..थांबा ..घरी आल्यावर दाखवते खरे रुप..तसेच राॕकीचे झाले .दादा बनला आहे तो.

 

घरभर फिरत असतो. कधी तर चक्क सोफ्यावर बसतो. कुत्रा दिसल्यावर रस्ता बदलणारा मी.. पण आता मुकाट्याने बघावे लागते.

 समीर ये लवकर साने काकांनी आवाज दिला.. सोबत त्यांची ज्युली होती.

ज्युली दिसल्यावर राॅकी घाई करु लागला.  समीर घराबाहेर पडला. रस्त्यावर कुठे आरती दिसते का ते बघत होता. तिचा मोबाईल पण घरी असतो.   अरे समीर कुठे लक्ष आहे साने काकांनी आवाज दिला.

आजकाल जरा सुस्त दिसतो आहे जरा जास्तच जोरात डायटिंग सुरू आहे का.ॽ तुझ्या वाढलेल्या वजनाची जबाबदारी तुझ्या बापाने माझ्यावर टाकली आहे.  त्यात मी डाॅक्टर . लहानपणीचे मित्र आहोत आम्ही आणि घरे पण जवळ जवळ.  या सहा महिन्यात तुझे 10 किलो वजन कमी करायचे आहे.  रोज पाच वाजता फिरायची आठवण देतो तो मला.

 

अहो काका.गेली दोन महिने झाले.. माझ्यावर लक्ष ठेवून आहेत सगळे. मला प्रचंड आवडणारी पाणीपुरी.. वडापाव या लोकांनी बंद केला माझा.आरतीला पण प्रचंड आवडते पाणीपुरी पण माझ्यासाठी ती पण खात नाही आहे.मलाही वाईट वाटते पण काय करणार.दोन दिवस झाले कि आम्ही दोघे बाहेर जात होतो खायला.माझ्यामुळे घरात गोड..धोड, तळलेले पदार्थ सर्व काही बंद आहेत. जिभेवर नियंत्रण ठेवणे किती कठीण आहे हे आता कळत आहे मला. मला आवडणारी  सर्व खाद्य पदार्थ स्वप्नात येतात.  वडे भजे..पुरी.. काय..काय सांगू ..आॕफीस मध्ये होणाऱ्या पार्ट्यांना पण जात नाही.

 

बाबा पडले मिल्ट्री मॅन, घरात कडक शिस्त आजही चार वाजता उठून फिरायला जातात.सर्व काही वेळेत झाले पाहिजे असे फर्मान असते त्यांचे.मी वाया गेलेला,बेशिस्त  असा त्यांचा समज .. म्हणजे चुकीचाच.

 

आरती घरात आल्यापासून तर  मला बोलणी वाढतच गेली.

आरती बाबाप्रमाणे शिस्तेची भोक्ती. सकाळी पाच वाजता उठून योगा करते.  घरात सगळ्यांची काळजी घेते. माझ्यापेक्षा तिचेच घरात लाड आहेत. मी लहाणपणापासूनच आळसी ..  लवकर न झोपणे.. मोबाईलवर गेम खेळणे.. उशीरा   उठने.. तेलकट खाणे त्यामुळे  वजन वाढले ते वाढलेच.

 

वाढू दे रे होईल कमी.. चल माझ्याबरोबर घरी वजन करु तुझे. या पंधरा दिवसात सुकल्या सारखा दिसतो तू. काकाने वजन काटा काढला.

अरे समीर एक किलो वजन कमी काका ओरडले. कमाल झाली.  समीर   काही दिवसातच तू स्लिम ट्रिम होणार अगदी तो रोशन सारखा काय नाव त्याचे. ऱ्हितिक… काका जोराने हसले .. समीरला उगीचच राग आला.

 काय सांगू ?आरती संध्याकाळी कुठे जात असेल या काळजीने वजन कमी झाले हे कसे सांगणार . काकु नेहमीप्रमाणे फोनवर  काॅलनीतले गाॕसीप मैत्रिणीला सांगत होत्या. काका आसपास राहून  ऐकत होते बघ समीर , आमच्या घरी पण CID आॕफीसर आहे  काका जोराने हसले..   समीर घाईत घरी आला. राॕकीला जेवण दिले.

 

आरती घरी आली होती.  जेवण नेहमीप्रमाणे कमीच केले तिने. आजकाल खूष दिसते.  एक किलो वजन कमी झाले  असे सांगितल्यावर  सगळे  आश्चर्यचकित झाले. उद्यापासून जरा जास्त फिर.. बाबांनी  आज्ञा केली.

 दुसऱ्या दिवसी बरोबर साडेपाच वाजता डाॕ काका जुलीला घेऊन आले. एक तास फिरुन  झाल्यावर अर्धा तास तरी गप्पाटप्पा रंगायच्या. समीरला बरेचदा कंटाळा यायचा पण काय करणार ॽ

 अरे समीर , काल जरा  वाईटच बातमी ऐकली.. तुझ्या काकुच्या आतेभावाचा म्हणे डिव्होर्स होणार. काल घरी गेलो तर फोनवर चर्चा सुरु होती. समोरची व्यक्ती कोण होती कळले नाही..  मात्र काकुच्या बोलन्यावरुन  काय झाले ते समजले.. मी तर ऐकून चाट पडलो. काय बोलावे कळत नव्हते. एकदा घरी आले होते ते. गोड जोडी होती त्यांची.

अगं  ती तर आदर्श जोडी होती. आपल्या घरी आले तेव्हा Made for each other वाटत होते. लग्नाला दहा वर्षे झाली. मुलगा पण आहे. काय झाले अचानक काका विचारत होते.

 कोणाची दृष्ट लागली कोण जाणे. सोन्यासारखा संसार होता. काही कमी नव्हते . पण तिची बुद्धी शेण खायला गेली. अहो ते आजकाल गेट टुगेदर काही का आले नं

 वर्गातली पोर.  पोरी भेटतात . जुन्या आठवणीत रडतात पडतात म्हणे ते. . कोण कोणाला आवडत होत ते पण सांगतात. आपला संसार  किती दुःखी आहे हे  ठासून सांगतात म्हणे.  आपण एक सिनेमा बघितला होता   पती पत्नी और  वो त्यात कसा तो हिरो आॕफीसमधल्या मुलीला आपली बायको पागल आहे म्हणून सांगत असतो . तसलाच हा प्रकार.  खासकरून मुली. म्हणजेच आता बाया याला बळी पडतात.अशा सहानुभूतीच्या लाटेत एखादी  राणी सारखी मुलगी वाहत जाते.तू मला आवडत होती तेव्हा या एका वाक्याने सुरुवात झाली आणि घटस्फोटापर्यंत पोहचले.. वाईट झाले..

समीरला धडधडायला झाले. चेहरा उतरला.पायाखालची जमीन सरकली. देवा माझा संसार असाच वाया जाईल काॽ त्याच्या डोळ्यात पाणी आले.आरती आणि माझी जोडी आदर्श  म्हणून मित्र परिवारात प्रसिध्द आहे. त्यांचे भांडण झाले कि सर्वप्रथम मला फोन करतात. आता कोणाला तोंड दाखवू ॽ काका हे सगळे सांगून छान फिरत होते. राॕकी आणि ज्युली खेळत होते.  समीर  झाडाखाली बसून होता. विचारांचे चक्र घिरट्या घालत होते.तीन महिन्यांपूर्वी आरती गेट टुगेदर करायला गेली होती.

देवा.. तसे काही झाले असेल का.ती साधी..भोळी आहे ..मी तर तिच्या वाचून जगूच शकणार नाही. कोणी सुरु केले असेल हे गेट टुगेदरॽ

जी जखम बरी झाली तिला जिवंत करुन तिची खपली काढून चिघळण्याची काय गरज…

 

अरे समीर काय झाले.. Tension मध्ये दिसतो आहेस. काही नाही  काका.चला घरी निघू.

 

समीर घरी आला.  आरती आली होती. त्याच्या उकळलेल्या भाज्या तयार होत्या.. आज पंचवीस दिवस झाले.. आरती बाहेर जात आहे. तिच्या वाचून या घराचे काय होणार ती आहे म्हणून तर या घरात सुखाचा झरा वाहत आहे.. आई.. बाबा तर तिच्यावर जीवापाड प्रेम करतात.त्याने  डायनिंग टेबल कडे बघितले ते दोघे मजेत जेवण करत होते.. शेव भाजी टेस्टी झाली ग आरती… बाबांचा आवाज आला.माझ्या वजनामुळे तर  आरती कंटाळली नसेल . मागे एकदा  गमती मध्ये ती बोलली होती मला जाड लोक आवडत नाही म्हणून. मी माझ्या वजनाबद्दल  सजग राहावे म्हणून असेल.  त्याने त्याचे समाधान केले.

 

दुसरा दिवस उजाडला. आजचा 29 दिवस  आरती फिरायला जात आहे. सकाळी योगा केल्यावर संध्याकाळी जायची काय गरज. किती धावपळ असते तिची फिरुन आल्यावर .. आता आज सुट्टी टाकतो आणि शोध लावतोच  एकदाचा.

 

बाॕसला फोन केला तर तो चिडला.  दोन महिन्यांपूर्वी तुझे डायटिंग सुरू होते तेव्हा तुला चक्कर येत होते तेव्हा आठ दिवस घरी लोळत होता न.. आता सुट्टी मिळणार नाही. रविवारी पण आॕफीस ठेवले. देवा काय करु आता?

 

आता एकच उपाय  डिटेक्टीव.  शहरातील प्रसिद्ध डिटेक्टीव समीरने शोधला.बायकोच्या वागण्यात काय बदल दिसतो का.. काही कुणासोबत गुंतली आहे  काॽसर्व डिटेल माहिती सांगा . काही लपवू नका.

 

मी काय लपवणार.. आरती साधी..भोळी आहे  हो ..तिला डावपेच नाही कळत म्हणून तर मला भीती वाटत आहे.मला फक्त आरती कुठे जाते हे सांगा. ठीक आहे .उद्या तुमची बायको घरून निघाली कि फोन  करा.दोन तासात तुम्हाला रिपोर्ट देतो. आज समीरला हलके वाटत होते. उद्या कळेलच सर्व. सोबतच शरीराचा भार हलका वाटत होता.बहुतेक वजन कमी झाले असणार.

 

बरोबर वेळेवर काका आले. दोघे निघाले.. नेहमीप्रमाणे गप्पा सुरू झाल्या.अरे समीर दोन दिवस मी बाहेरगावी जात आहे आत्याकडे

 अॕडमिट केले त्यांना. पोराचा मोडणारा संसार नाही सहन झाला त्यांना.भरला संसार मोडला तिने.  हसरे घरटे उध्वस्त झाले. समीर आतून घाबरला. समीर  तुझा चेहरा का पडला. आजकाल आॉफीसचा जास्त ताण आहे काॽ

 

नाही हो काका मी ठीक आहे..  तुमचे गेट टुगेदर झाले का हो काका?

 समीरने विचारले. काका जोरात हसले.. अरे समीर ,मी कायम मुलांच्या शाळेत. एकही मुलगी नाही. नंतर मेडीकलचे शिक्षण. मागे शाळेचे झाले होते गेट टुगेदर. मजा आली. कितीतरी वर्षांनी भेटलो सगळे मित्र.

गेट टुगेदरची संकल्पना किती सुंदर आहे न समीर,..

 

 किती तरी वर्षींनी एकमेकांना भेटायचे. कोण कसे दिसते ते बघण्यात पण मजा वाटते. शाळेतले ते निरागस चेहरे आता  राकट दिसायला  लागतात .. काॕलेज मधल्या सुंदर ललना संसारात  रमल्या असतात. काळ लोटलेला असतो मधल्या काळात कोण कुठे काही  कळत नाही सगळे आपापल्या संसारात दंग. आता वय वाढली.मुले मोठी झाली .काढायचा वेळ..  गेट टुगेदरच मुळी नव्याने  ओळख होण्यासाठी आहे.सुख ..दुःख वाटून घ्यायचे. धीर द्यायचा .. ्जीवनाच्या उत्तरार्धात   पुन्हा लहान होऊन मजा करायची.जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा.. कडु गोड आठवणी विसरायच्या असतात..काही वेडी लोक असे वागतात आणि गेट टुगेदर..  बदनाम होतात. सुंदर निर्मळ नाते फक्त मैत्रीचे ते कलंकित न करता जपायचे.  समीर ऐकत होता. काका आज  जीवनाचे तत्वज्ञान सांगून गेले. दोन तास झाले  डिटेक्टीवचा फोन कधी पण येऊ शकतो.  मनात देवाचा धावा सुरू ठेवतो. फोन वाजला..

 

समीर झाडाखाली  बसला. काका दोंघासोबत खेळत होते… तिकडून डिटेक्टीव हसत होता. समीरला त्याचा राग आला.. हे काय हसत आहात तुम्ही.

 

अहो सर ..हसणार नाही..तर काय करणार.. तुमची बायको रोज पाणी पुरी आणि वडापाव खायला येते. .त्या दुकानात महिनाभर खाण्यावर आॕफर होती.. तुमच्या आई बाबाच्या परवानगीने सुरू होते सर्व. मी समोर बसलो आणि सांगितले मी समीरचा मित्र . आरती दचकली.  आता समीरला  सर्व कळेल याची तिला भिती वाटली . मग मीच हसत विचारले. समीरला नाही आणले सोबत तेव्हा आरतीने खरे सांगितले.

 

  तुमच्या वाढत्या वजनामुळे सांगायचे नव्हते आरतीला तुम्ही दुःखी व्हायला नको म्हणून तिने लपवले आणि आश्चर्य म्हणजे ही आॕफर तुमच्या आई बाबानी  तिला सांगितली..

 मागून काका आवाज देत होते.. समीर धावत होता.. वेल डन समीर,असा धावला तर दोन महिन्यात ह्रितिक रोशन..

समीरचे लक्ष नव्हते.

समीर घाईने घरी आला. मनातील मळभ दुर झाले होते.

घरात  पाणी पुरीच्या वास येत होता.. उकळलेल्या भाज्या आणि पाणीपुरी घेऊन आरती उभी होती.

समीर .. तुझे  एक किलो वजन कमी झाले म्हणून आज पाणीपुरी.. आरती हसत होती .

 

ज्योती भोवते -रामटेके

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!