४ आत्मचरीत्र-न लिहिलेले
४ आत्मचरीत्र-न लिहिलेले

४ आत्मचरीत्र-न लिहिलेले

४ आत्मचरीत्र-न लिहिलेले

प्रभाकर आणि श्रीहरी सोबत मैत्री आयुष्यभर टिकली. नवे मित्र आले,नवे ध्येय गाठले पण या दोघांसोबतची मैत्री राहली. मैत्रीत अंतर पडत गेले पण तुटली नाही.
शाळेत सोबत जायचो,यायचोही सोबत.शाळेचा लांबचा रस्ता यांच्या सोबतीने घरापर्यंत कसा पोहचायचा कळायचे नाही.रविवारी सुट्टीच्या दिवशीही आम्ही भेटल्यावाचून राहायचो नाही…..आता पुढील भागात वाचा शरद आणि  सुगंधाची प्रेमकथा….
भाग-४
शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या कि आई आठ दिवस आम्हाला आजोळी घेऊन जायची.बाबा गेल्यावर  आजोबांनी तिला कायमची माहेरी बोलवले होते.पण आई बाबांचा गाव सोडायला तयार नव्हती.शिवाय माहेरी राहायला गेले तर माहेर राहणार नाही असे तिला वाटायचे.
आजोळी खूप मजा करायचो आम्ही.आजोबा नवीन कपडे घेऊन द्यायचे.आजी खाण्याचे पदार्थ बनवून खाऊ घालायची.
आंब्याचा आमरस,मडक्यावर भाजलेली लांब पोळी त्याला मांडे म्हणायचे…असे आवडणारे पदार्थ बनवायची,आम्ही यायला निघालो कि सोबत मुगवड्या,शेवया,कुरड्या  द्यायची.
मामा आम्हाला बैलगाडीने एस.टी.येणाऱ्या गावापर्यंत आणून द्यायचा.
मी सातवी पास झाल्यावर  मामाने एक रेडिओ घेऊन दिला.
त्या खेड्यात फक्त  माझ्याजवळच रेडिओ होता.
तो रेडिओ घेऊन सुट्टीच्या दिवशी प्रभाकर आणि  श्रीहरी सोबत गावभर फिरत राहायचो.
त्याच्याजवळ रेडिओ आहे हे सगळ्यांना समजले पाहीजे हा उद्देश.
सेलवर चालणारा रेडिओ. रोज सेल  कोण घेऊन देणार? आई महीन्यातून एकदाच मजूरीच्या पैशातून सेल घेऊन द्यायची.
कोण आनंद व्हायचा शरदला. हा आनंद वर्षातून एकदा मोबाईल बदलणाऱ्या पिढीतल्या शांतनूला कळेल?

आठवी,नववीत अभ्यासाचे महत्व कळायला लागले.शाळेत येणारे वर्तमानपत्र वाचून शिकल्यावर काय घडू शकते याची जाणीव झाली.वर्तमानपत्र वाचता वाचता वाचनाची गोडी लागली.दहावीत गेलो.पास व्हायचे होतेच.पास झालो.प्रभाकर,श्रीहरी दहावीतच राहले.
दहावी पर्यंत दोनच ड्रेस होते त्याला.आलटून पालटून तेच घालायचे.
गणवेश हा प्रकार नव्हता त्याच्या शाळेत.कंपास बाॕक्स,waterbottle, school bag,
crayon,वेगवेगळ्या आकाराच्या waterbottle…हे असले काहीही नव्हते.
 गावात दहावीपर्यतच शाळा होती.दहावी झाल्यानंतर आता कुठे शिकायचे? दहावीनंतरचा प्रवास सुरु होणार होता.
त्या प्रवासाआधी सुगंधा आठवणीत झिरपायला लागली.
सुगंधा माझे तेव्हाचे मोरपीसी स्वप्न.आयुष्यातील गुलाबी आठवणींनी सजलेले हळवे पान.
सुगंधा आजोळी मामाच्या शेजारी राहायची. माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान.आम्ही आजोळी  गेलो की  सुगंधाच्या घरी मी आणि सरु दिवसभर येत जात राहायचो.मामा आणि तिच्या घराला कुडाचे कंपाऊंड होते.
सुगंधा आईवडिलांना एकटीच मुलगी होती.त्यामुळे उन्हाळा आला की ती आमची वाट बघायची.
ती,मी,सरु,अजून एक दोघे दिवसभर खेळत असायचो.
भातूकली खेळतांना खोटा संसार मांडायचो.मला भातूकली खेळायला आवडायचे नाही.पण जबरदस्तीने सुगंधा मला खेळात घ्यायची.
तो खोटा खेळ खेळता खेळता दोघेही एकमेकांसोबत खऱ्या संसाराची स्वप्ने पाहू लागले.सुगंधाच्या ओढीने आजोळची गोडी वाढली होती.ते जास्त आवडायला लागले.

मी जरा मोठा झाल्यावर आई आणि सरु आमच्या गावी परत यायच्या. मी मात्र सुट्या संपेपर्यत तिथेच थांबायचो.
सुगांधासोबत शेतात जायचो.रानमेवा गोळा करायचो.तिच्यासाठी झाडावर चढायचो,तिच्या साठी कविता लिहायचो,तिच्या साठीच आजोळी थांबायचो.त्या वयातील प्रणयरम्य भावना शब्दात वर्णन्यापलिकडे होत्या.
सगळा प्रणयखेळ नजरेतून चालायचा.न बोलता आम्हाला एकमेकांचे मन उमजले.नजरेपेक्षा शब्द कमी महत्त्वाचे झाले होते. गुडघ्यावर बसून सुगंधाला प्रपोज केले नाही पण प्रेम खूप  केले.मनोमन तिनेही मला वरले होते.
क्रमशः

शरदचे आयुष्य कसे बदलत गेले….वाचा पुढील  भागात

प्रिती गजभिये
(प्रिय वाचक,तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्हीही लेख,कथा,कथामालिका ,रसग्रहण….marathi.shabdaparna.in वर पाठवू शकता)

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!