स्वप्न तहानलेले-भेट तुझी माझी स्मरते
ज्योती रामटेके
आनंदी तिथेच अंगणातील झोपाळ्यावर बसली. तिच्या बाबांनी ती लहान असतांना तिच्यासाठी लावला होता.
लहान असल्यापासून तिच्या मनातील गुपितांचा झोपाळा साक्षीदार होता.
सर्व मैत्रीणी सोबत
दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे……गीत गायच्या.
आनंदी त्या मैत्रीणी,ते गीत आणि त्या गीतातील भावना सगळे आठवत राहली…….
झोपाळा अनंत आठवणींना उजाळा देत होता. आंनदीच्या डोळ्यासमोर लहानपण दिसू लागले. दिवस निघाल्यापासून ते रात्री पर्यंत किती तरी घडामोडी तिथे बसून होत होत्या.
लहानपणी आंनदी उंच झोका न्यायची.. अग हळू पडशील नं.. कानात आईचा आवाज आला.
किती झुलणार ग,चल जेवायला. बाबांनी आवाज दिल्याचा भास झाला. तिला झोपाळा आवडतो म्हणून बाबानी छान झोपाळा बनवून आणला होता. अभ्यास करता.. करता बरेचदा झोपाळ्यावर झोपून जायची आंनदी.मग बाबा उचलून घरात पंलगावर टाकायचे.
इथे आल्यापासून पुर्वी, रुद्र मजेत होते.काय हवे, नको मामी बघायची.राणी, पिहू सोबत खूष दिसत होती मुले.
धवलचा फोन वाजला.काय सुरू आहे आंनदी. मुले कशी आहेत. करमत नाही ग घरात. घर कसे सुने,सुने वाटते.
दिवसरात्र तुझ्या सहवासाची सवय. खूप काही हरवल्यासारखे वाटत आहे. पण या वेळी मनसोक्तपणे माहेरी रहा. दादाच्या लग्नानंतर,तू एका दिवसाच्या वर राहिली नाही.
इथे नोकर.. चाकर असूनही तू स्वस्थ बसत नाही. आराम कर चांगला.दादा, वहिनी कसे आहेत. मस्त मैत्रिणींना भेट. आणखी हो मुलांना वाडा दाखवायला घेऊन जा.मजा वाटेल त्यांना.
मुले मस्त आहेत. दिवसभर खेळत असतात. दादा, वहिनी मजेत आहेत. खूप जीव लावतात, मला मुलांना. सही करुन झाली कि निघते मी.
मला उगीचच तुझी काळजी वाटत राहते.इथे सतत आई, बाबांचा भास होत राहतो.किती आठवणी आहेत त्यांच्या.घरातल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श झाला कि त्यांची आठवण येते. मग उदास वाटत राहते.दादा गेला आहे आॕफीसला. काल तो जरा अंधार पडल्यावर घरी आला.त्या अंधारात बाबा घरामध्ये येत आहेत असे वाटले.
बाबासारखा दिसतो तो आजकाल. मला तर वाटते काही दिवसांनी हुबेहूब बाबासारखा दिसेल तो. आवाज अगदी तसाच.
दादाची मोठी मुलगी राणी अगदी माझ्यासारखी दिसते.तिचे हसणे, बोलणे माझ्यासारखे.या सर्व गोष्टी आता अनुभवते मी. सहवासाने नाती फुलतात.
मी दादा वहिनी बद्दल मनात अढी धरुन बसली होती.पण इथे आल्यापासून ती अढी सैल होत आहे. दादाने सही करायला बोलावले आणि मनात पडलेली अढी घट्ट होत गेली. दादाने अजून विषय काढला नाही. त्याला वेळ मिळेल तेव्हा काढेल तो विषय.
रात्र झाली. वहिनी रोज आंनदीला विचारुन स्वयंपाक करायची. सुगरण आहे वहिनी. आईच्या हाताची चव तिच्या स्वयंपाकाला आहे. मी तर पाहून.. पाहून आई सारखा स्वयंपाक शिकली. दादांचे लग्न झाल्यावर काही वर्ष आई होती.आईने तिला पण शिकवले असणार. दादा आला.
जेवायला बसले सर्व.स्वयपांक चविष्ट होता. पोळ्या तर नरम,पातळ आई जशा करायची तशा.
आंनदी निरजाच्या हाताच्या स्वयंपाकानी तुझी भुक तर जात आहे नं
दादा गंमत करत होता.
किती चविष्ट जेवण बनवते वहिनी.अरे आईच्या हातासारखी चव आहे तिच्या हाताला.माझे वजन भरपूर वाढणार घरी जाईपर्यंत.
आंनदी उद्या दिपा कडे जाऊन ये. आज भेटली होती ती.तू आली म्हटल्यावर काय फुलला तिचा चेहरा.दादा सांगत होता.
आंनदी,आज काय केले दिवसभर? नदीवर जाऊन यायला हवे होते. तुला माहीत आहे एवढ्या उन्हाळ्यात नदीला भरपूर पाणी आहे.तिला खळखळून वाहतांना बघायला खूप मजा वाटते.तिथल्या दगडांचा आकार काय सुंदर आहे.पाण्यात पाय टाकून बसण्याची मजा आहे.
आपल्या लहानपणी कपडे धुवायला आईसोबत जात असू. तिथे बायांच्या सुख.. दुःखाच्या गोष्टी, त्यांच्या व्यथा. मनातली सल या सर्व गोष्टींची चर्चा होत असे.
गावातील नदी म्हणजे स्त्रियां करता आंनदी कट्टा होता.जना आजी तर रोज आईजवळ रडायची.मला तर नवल वाटायचे.
आई मग सांगायची अरे, आपले दुःख हलके करते बिचारी.तेव्हा काही कळायचे नाही पण आता कळते त्या गोष्टीचे गांभीर्य.मन हलके करायला पण जवळचे कुणीतरी हवे.
दादा बोलत होता. आंनदीला मात्र नदीच्या काठावर बसलेला कनक डोळ्यासमोर दिसू लागला.लहानपणापासून कित्येकदा नदीवर खेळायला, फिरायला कनक सोबत जायची.बरेचदा दीपा सोबत असायची.नदीच्या वाळूत मनसोक्त खेळणे,कपडे भरवून घरी येणे रोज असायचे.
मोठे झाल्यावर काठावर बसून नदीत पाय सोडून बसणे, वाळूत नाव लिहिणे.. मिटवून टाकणे सुरु झाले. नदीकाठावरील कपडे धुवायला येणाऱ्या बांयाचे सुख.. दुःख कळायला लागले. पाण्याचा खळखळाट, कनकच्या भेटी,भेटीतील अनवधनाने झालेले स्पर्श आवडू लागले.
कनक तिची वाट बघत गात राहायचा.
गीत आसावले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
तू मला अर्थ दे अजून तरी
शब्द ओलांडले मी तुझ्यासाठी….
आणि नदीवर भेट झाल्यानंतर कुठे एकमेकांना दिसलो कि
भेट तुझी माझी स्मरते……गायचा.
गाणे त्याचा श्वास होता.आणि मी त्याचे आयुष्य ….
कनक कुठे आहेस तू…….
Previous Part
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा





गावातील जीवनच चित्र छान
Khup chhan katha
अप्रतिम लिखाण …👌