अक्षम्य- भाग-१
काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य…शलाका-आनंदच्या आयुष्यावर गुंफलेली कथामालिका.शलाका वकील,आनंद प्राध्यापक.या कथेचा हा पहिला भाग.यापूर्वीच्या कथामालिकांसारखाच प्रतिसाद अक्षम्यला मिळेल ही आशा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी नवलिखाणाची प्रेरणा आहे.
चला तर वाचू या अक्षम्य
भाग-१
अभिनंदन शलाका मॕडम.
अभिनंदन शलाका
अभिनंदन शलाका बेटा
सगळीकडून शलाकावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
आनंदचा ऊर अभिमानाने भरुन आला.
पत्रकारांच्या गराड्यात उभी असलेली शलाका,तिच्यापर्यंत सध्यातरी आनंद पोहचू शकत नव्हता.जरा लांबूनच त्याने तिला हात दाखवला.
तो जरा लांब उभा असला तरी सगळे त्याला ऐकू जात होते.
तिचे लोकांनी केलेले कौतुक त्याच्या कानापर्यंत पोहचत होते. साध्याशा शलाकाचा समावेश आजपासून तडफदार वकिलांमध्ये होणार होता. त्याला कौतुक वाटले तिचे.
पत्रकार शलाकावर प्रश्नांचा भडीमार करत होते.
तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते?
तुमच्या यशाचे श्रेय कुणाला?
प्रेरणा मला आसपासच्या समाजाकडून मिळते.माझ्या यशाचे सर्व श्रेय आनंद देशमुख यांना.
आज मी आहे ते केवळ माझे पती आनंदमुळे.
त्यांचा हात पकडूनच मी इथवर पोहचले. मुळात त्याच्यामुळेच मी कायद्याचा अभ्यास केला.
शलाकाने असे म्हणताच सगळ्यांचे लक्ष आनंदकडे गेले.
सर्वांनी त्याला दोन शब्द बोलण्याची विनंती केली.
मी शलाकाबद्दल काय बोलणार?
हे सर्वस्वी तिचे कर्तृत्व आहे.
तिचा मला खूप अभिमान वाटतो.
तिची मेहनत,हुशारी आणि तिला असलेले सामाजिक भान यामुळेच ती इथपर्यंत पोहचली.
कमजोर केस,पुराव्यांचा अभाव, वरुन येत असलेला दबाव तरीही न डगमगता शलाका ही केस केवळ लढलीच नाही तर ती जिंकली सुद्धा.
ज्या अश्राप मुलीची केस शलाका जिंकली ती धावत येऊन शलाकाच्या पाया पडली.
शलाकाने तिला उठवले.तिच्या पाठीवर थोपटले.
आनंद तिच्या आईवडिलांना म्हणाला,
आजपासून नक्षत्राची जबाबदारी आमची.
नक्षत्रा जवळच्याच खेड्यात आईवडिलांसोबत राहत होती. तिच्या नावासारखीच सुंदर असलेली नक्षत्रा जेमतेम बारावीत गेलेली.
नक्षत्राचे वडील पाटलाच्याच शेतात कामाला होते आणि तिची आई पाटलाच्या वाड्यावर घरकाम करायची.
कधीकधी ती आईसोबत तिला मदत म्हणून वाड्यावर जायची.
आई नको म्हणायची पण ही हट्ट करुन जायची.
आईला नक्षत्राने कामापेक्षा शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे वाटायचे. नक्षत्रा आणि तिची बहीण नाजूका दोघीही अभ्यासात हुशार होत्या.
शिक्षण घेतील तर त्यांचे आजचे आयुष्य बदलेल.पुढे आपल्यासारखे गरीबीचे चटके सोसावे लागणार नाहीत या विचाराने नक्षत्रची आई नक्षत्राला काहीही कामे सांगायची नाही.
पण सुट्ट्यांमध्ये तरी माझी आईला मदत होईल असे वाटून नक्षत्रा आईसोबत जायची.
दुसऱ्या शहरात काॕलेजमध्ये शिकणाऱ्या पाटलाच्या मुलाची विलासची नजर तिच्यावर पडली. देखण्या नक्षत्राची त्याच्यावर भूरळ पडली,तिच्यासाठी वेडापिसा झालेला विलास खेड्यात फेऱ्या मारु लागला. त्याने नक्षत्राला एकटी बघून आर्जवे केली पण नक्षत्रा बधली नाही.तिने हे आईच्या कानावर टाकले.आई आता वाड्यावर एकटीच जात होती.नक्षत्रा घरी येत नाही म्हणून तो तिला भेटायला तिच्या घरी गेला.घरी एकटीच असलेली नक्षत्रा बघून त्याने डाव साधला.
त्याने केलेले लज्जास्पद कृत्य लपविण्याचे काम पाटील आणि पोलिसांनी मिळून केले.
पण मुलीवरचा अन्याय गरीबीतही अब्रु जपलेले नक्षत्राचे आईवडील सहन करु शकत नव्हते.
त्यांनी खूप प्रयत्न करुन पोलीसस्टेशनमध्ये तक्रारीची दखल घ्यायला भाग पाडले.
केस कोर्टात गेली. पण पाटलाच्या भीतीने केस लढायला कोणी तयार होत नव्हते.आनंदला त्याच्या एका मित्राकडून नक्षत्राबद्दल समजले,त्याने शलाकाला सांगितले. नव्यानेच वकीली सुरु केलेल्या शलाका देशमुखने नक्षत्राची केस लढण्याचे ठरवले.
केस हरण्यासाठी पाटलाने शलाकाला आमिष दाखवले.राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला.बाकी लोकांनीही तिला नवीन आहेस,सुरुवातीलाच अशी केस नको घेऊ असे सुचविले.पण लहानपणापासून आदर्शवादी कुटुंबात वाढलेली आणि आनंद देशमुख सारख्या तत्वनिष्ठ जोडीदाराची साथ असल्यावर शलाकाने माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता.
आणि आज तिने नक्षत्राला न्याय मिळवून दिलाच.पण
त्यासाठी शलाकाला खूप धैर्य ठेवावे लागले.
नक्षत्राचे आईवडील पुन्हा पुन्हा हात जोडून शलाकाचे उपकार मानत होते.
नक्षत्राच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च आनंद करणार असे आश्वासन नक्षत्राच्या आईवडिलांना आनंदने दिले. शलाका,आनंद घरी निघाले.
घरी त्यांची तीन वर्षाची लेक मुक्ता आणि आनंदचे आईवडील,शलाकाची आई वाट बघत होते..
आनंदने फोन करुन ही आनंदाची बातमी घरी कळवली होती.
या केसमध्ये महिन्यांपासून शलाका बिझी होती.
अपराधी बडा असामी असल्यामुळे त्याला शिक्षा मिळेल कि नाही ही शंका होती.
पण आज केस जिंकल्यामुळे ते ओझे मनावरुन उतरले.
आज रात्री खूप दिवसानंतर आनंदचा मित्र मोहितच्या घरी सगळ्या मित्रांनी भेटण्याचे ठरवले.
मुक्ताला आईबाबा सतत बिझी राहत असल्यामुळे आजीआजोबांची सवय झाली होती.
मुक्ताला घरी ठेऊन शलाका-आनंद मोहितच्या घरी पोहचले.
सगळे शलाकाने केस जिंकली त्या आनंदात होते.
क्रमशः
कथाकल्पना-विशाल भोवते
शलाका केस जिंकली.तिला नवी उमेद मिळाली.आनंदी ,चैतन्यमय वातावरण तयार झाले.आता पुढे वाचत रहा अक्षम्य
पुढील भागाची लिंक
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
सुरुवात भारी
खूप छान सुरुवात
Chhan
अप्रतिम kthanak mam