स्वयंसिद्धा भाग ६
ऊन सावल्यांचा खेळ
सुप्रियाला वाटलं तसं काहीच नव्हतं .
पहिल्या बाळंतपणाला तिला खूप त्रास झाला होता त्यामानाने यावेळेस लवकर सुटका झाली, दोन्ही जीवांची.
दोघीही सुखरूप होत्या यातच सगळे आनंदात होते.
तिच्या सासूबाई जरा नाराज होत्या . साहजिकच ना !
तिचे आई-वडील आणि सासू-सासरे एकाच काळातील. मुलगा होण्यासाठी आई-वडिलांनी वाट पाहिलीच ना.
बाळाचे लोभस रूप बघून सासु बाईंनी सहज हात पुढे करून बाळाला कुशीत घेतलं.
डिलिव्हरी नॉर्मल झाली तरी त्यावेळेस चिकनगुनियाची साथ सुरू होती. दक्षता म्हणून दवाखान्यातला मुक्काम वाढवला.
बारसे झाले. सई नाव ठेवलं .
थोरली शाल्वी धाकटी सई.
सुप्रियाचा नांदेडला मुक्काम असतानाच माधवनी लातूरचे सामान औरंगाबादला शिफ्ट केलं होतं. म्हणून सुप्रिया थेट औरंगाबादलाच गेली. सासू-सासरे सोबत होतेच.
सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत तिथेच थांबले.
नवीन वातावरण नवीन शेजारी शाल्वीची पण नवीन शाळा. सगळं ठीक चाललं होतं . शेजारी जवळपास सुप्रियाच्या वयाचे असल्याने सगळ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. प्रसंगी एकमेकींना साथ देत होत्या. अडीअडचणी सांभाळत होत्या. छोट्या गावातून आलेली सुप्रिया औरंगाबाद सारख्या शहरात चांगली रुळली. आत्मविश्वास वाढला.
एका शाळेत नोकरीही करू लागली. पण नोकरीचा आनंद जास्त दिवस टिकला नाही तिचा.
सासू-सासरे नांदेड सोडून औरंगाबादला यायला तयार नव्हते. सासरे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार जमला होता. त्यांना औरंगाबादला करमत नव्हते. सासरच्या घरी प्राचीन एक मंदिर आहे तिथली पूजा नैवेद्याच्या कारणाने सासूबाई जास्त दिवस नांदेड सोडून राहू शकत नव्हत्या.
माधवला आजूबाजूच्या गावांमध्ये visit साठी जावे लागे.
सुप्रियाला नोकरी सोडावी लागली. तिची नोकरी जेमतेम एक महिन्याची .
माधव कडून जास्त अपेक्षा ठेवणे शक्य होत नव्हते. त्याच्यावर कंपनीचा आधीच ताण होता.
आता सुप्रियानी घरीच ट्युशन सुरू केल्या. त्याचाही जम बसायला थोडा वेळ लागला. त्यात तिचा वेळही सत्कारणी लागला आणि समाधानाही मिळालं .
लातूर पेक्षा सुप्रियाला औरंगाबाद जास्त आवडले.
बघता बघता सई चार वर्षाची झाली, शाल्वी तिसऱ्या इयत्तेत तर सही बालवाडीत.
नांदेडच्या फेऱ्याही तिच्या खूपशा कमी झाल्या होत्या.
दोन मुलींना घेऊन जाणे तिला त्रासदायक होत होतं, शिवाय माधवच्या नोकरीच्या तणावामुळे त्याच्या तब्येतीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं. माधव सोबत असेल तरच ती नांदेडला जात असे . अधून मधून सासू-सासरे येऊन जात.
संसार गाडा बऱ्यापैकी रुळाला लागला होता .
सगळं काही छान चाललं असलं की तिच्या मनात कापरं भरायचं , धुक धुक वाढायची. काही विपरीत नको व्हायला. खूप जपायची ती मुलींना आणि नवऱ्याला .
अशातच एक अप्रिय घटना घडलीच..
बरेच दिवस झाले होते माधव सुप्रिया कुठे बाहेर फिरायला गेले नव्हते. माधव नोकरीच्या भटकंतीला कंटाळला होता. दोन दिवस कुठेतरी जाऊ म्हणाला. थोडा change दोघांनाही हवा होतं.
अनायसे संधी होती. माधवच्या चुलत भावाच्या लग्नाचं निमंत्रण होतंच. लग्न नांदेड जवळच बिलोली या गावी होतं.
खुप दिवसांनी सगळ्या नातेवाईकांच्या भेटी होणार होत्या. सासु सासरे, सुप्रिया माधव, मुली सगळेच लग्नाला गेले. दोन दिवस धम्माल केली. बऱ्याच वर्षानंतर माधव चे चुलत भाऊ बहिण भेटले. दोन्ही मुलींना बघून सगळ्यांना आनंद झाला.
औरंगाबादला जातांना एक दिवस नांदेडला मुक्काम करायचं ठरलं. पुन्हा नांदेडला लवकर येणं होणार नव्हतं.
दुसऱ्या दिवशी निघण्याच्या गडबडीत छोटी सई गरम पाण्याच्या भांड्यात पडली. कंबरेखाली पुर्ण भाजल्या गेली.
एवढासा जीव प्रचंड आग कशी सहन करणार ? नुसती रडारड.
तिचं वेदनेने रडणं बघून सुप्रिया आणि सासुबाई दोघीही रडायला लागल्या. सासरे तर घाबरून नुसते आत बाहेर करत होते.
आधी तत्काळ घरुगुती प्रथमोपचार नंतर दवाखाना.
सई च्या शरीराबरोबर सुप्रियाच काळीज होरपळलं होतं. एवढासा जीव तो , पण सहन करत चार महिने झुंज देत राहिला. सई पूर्णपणे बरी होण्याला सहा महिने लागले.
सुप्रियाला बालपणीची तिच्यासोबत घडलेली घटना आठवली. इतिहासाची पुनरावृत्ती……
‘आपल्यासारखं कष्टप्रद खडतर आयुष्य मुलींच्या वाट्याला येऊ नये ‘ तिने दत्तप्रभूला मनातून हात जोडले.
……मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.








