काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य
भाग-३
शलाका नक्षत्राची केस जिंकल्यामुळे आता जरा निवांत झाली. निवांतपणामुळे रितेपणा आला होता.तिला नेहमी वाटणारी अस्वस्थता पुन्हा उफाळून आली.
नक्षत्राची केस लढण्याला आपली अस्वस्थता तर कारणीभूत नाही? मला अगदी आतून का वाटले कि मी नक्षत्राची केस जिंकावी?
हा निरुत्तर प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात येत होता. वरवर हा प्रश्न निरुत्तर वाटला तरी त्याचे उत्तर शलाकाजवळच होते.
अशीलाची फसवणूक होऊ नये म्हणून तावातावाने केस लढणारी मी आनंदची फसवणूक करत आहे का?
हा प्रश्न तिचे काळीज आरपार चिरत होता.
लग्नापासून छळत असणारी व्यथा मी आनंदला का नाही सांगू शकत आहे?
तो दुरावेल ही भीती?
त्याच्या नजरेतील प्रेम गमावण्याचे भय?
त्याला समजल्यानंतर त्याला होणारे दुःख ?
कि जे झाले त्यात माझी काहीच चूक नव्हती म्हणून.
पण कधी ना कधी आनंदला ते सांगावे लागणारच.त्याला सांगितल्याशिवाय माझे मन रिते होणार नाही.
आनंदसारख्या माणसापासून अजून किती दिवस मी लपवणार?त्याला सांगेपर्यंत मी न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगत राहणार.
आनंदला सांगायचे तर आहे पण धीर होत नाही.
त्याची काय प्रतिक्रिया होईल या विचारानेच भीती वाटते.
आणि मुक्ता?
आई,आई
मुक्ता धावत येऊन शलाकाला बिलगली.
शलाकाची विचारश्रृंखला थोड्यावेळासाठी का होईना खंडित झाली.
आनंदही मुक्तासोबतच घरी आला.
मुक्ता काय शिकवले शाळेत?
आनंदने विचारले.
फक्त नाव विचारले बाबा आज.
आमची मुक्ता काय बनणार मोठी झाल्यावर?
मी ना बाबांसारखी शिकवणार मोठ्ठ्या शाळेत.
अग काल तर तुला आजोबांसारखे पोलीस बनायचे होते.
मनोहररावांनी आत येत विचारले.
पोलीस पण बनायचे आहे. तुमच्यासारखे कपडे आणि डोक्यावर टोपी घालणार मी.
सगळे हसायला लागले.
मुक्ता झाल्यापासून हसरे घर अधिकच हसरे झाले होते. घराच्या आनंदात वाढ झाली.
मुक्ताला घेऊन आजीआजोबा जवळच्या बागेत गेले.
काय शलाका मॕडम काय केले दिवसभर? आनंदने विचारले.
काही नाही.वाचत बसले होते.
तुझ्या blog च्या बऱ्याच कथा वाचायच्या राहून गेल्या होत्या.त्या वाचल्या.
कशा वाटल्या?
सगळ्या कथांमध्ये ओतप्रोत भावना भरलेल्या. वेदना,संवेदना.
कथा वाचायला घेतली कि पूर्ण झाल्याशिवाय सोडवत नाही. कथा वाचता वाचता ती नजरेसमोर दिसायला लागते.सिनेमासारखी आपल्या नजरेसमोर एकेक दृश्य फुलायला लागतात. ताकद आहे तुझ्या शब्दांमध्ये,कल्पनांमध्ये.
पण आनंद मला एक गोष्ट समजत नाही.
कोणती?
तू नेहमी आनंदी असतो.पण तुझ्या कथेत तुझ्या व्यक्तिमत्त्वातील आनंद उतरत नाही.
असे का?
सगळ्या कथेत कुणाचे ना कुणाचे दुःख असतेच.
कथा लिहितांना तुझ्या मनातला आनंद कुठल्या कुठे पळतो.
असे होते खरे.
पण शलाका कथा लिहित जातांना ती कथा आपली राहते कुठे ?
मुळ कल्पना आपली असली तरी नंतर कथेतील पात्रांची हुकूमत चालते.माझ्याबाबतीत तरी असेच होते.
मी लिहायला सुरुवात करतो.पात्र निर्माण करतो.नंतर ते पात्रच मला पुढे घेऊन जातात. माझा मी उरत नाही तेव्हा.पात्रांच्या हुकूमानूसार लेखणीतून शब्द पाझरत जातात.
पात्र हसले कि हसरे शब्द बाहेर पडतात.पात्र दुःखी झाले तर शब्दातही दुःख ओघळत राहते.
पण आनंद नेहमी ते पात्र दुःखीच दिसतात. आणि दुःख पण कसले तर बहूतेक वेळा अपराधीपणाचेच असते.
नेहमी कसल्या ना कसल्या अपराधाची सल त्यांना बोचत राहते.
शलाका, मला वाटते कळतनकळत आपल्या सगळ्यांच्याच हातून काही ना काही अपराध होत असतात.
काही अपराध फक्त आपल्यालाच माहीत असतात.
दुसऱ्यांना माहीतच नसल्यामुळे शिक्षा होण्याचा प्रश्न नसतो.
पण आपले मन. ते पुरेसे असते आपल्याला शिक्षा द्यायला.
मनाने दिलेली शिक्षा सर्वात मोठी असते.
ती एकट्यानेच भोगायची असते.
आणि विशेष म्हणजे या शिक्षेला कोर्टाने सुनावलेल्या एक वर्ष,दहा वर्ष अशा शिक्षेसारखी मर्यादा नसते.
ती आजन्म सोसत राहावी लागते.
तिथे कोणाही वकिलाची वकिली चालत नाही कि अपील करायला वरचे कोर्ट नाही.जी शिक्षा मन देईल ती गुमान भोगायची.काही चॕलेंजच नाही बघ मनाच्या शिक्षेला.
तू खूप संवेदनशील आहेस म्हणून असा बोलू शकतोस आनंद.पण अशी कित्येक माणसे असतात जी अपराध करुन मोकाट सुटतात आणि त्याची त्यांना ना खंत असते ना खेद असतो.
अग, तुझ्या कोर्टात पुराव्या अभावी मोकळे सुटतात. मनाचे कोर्ट तसे नाही ना.मनाजवळ भक्कम पुरावे असतात. त्याने तुम्हाला अपराधी मानले कि संपलेच सगळे.आयुष्यभर तुमची सुटका नाही. तो अपराधगंड जन्मभर तुमचा पाठलाग करत राहतो.
आनंद बोलता बोलता खूप थकल्यासारखा वाटला.आवाजही ओढल्यासारखा वाटला.
आनंद तुला कोणत्या अपराधाची बोच सलते?
मनात काही असल्याशिवाय एवढे सगळे बाहेर नाही पडणार.
नाही ग शलाका, सगळा कल्पनेचा खेळ असतो.लेखक,कवी लिहितात ते कल्पनेतील असते.स्वतः बद्दल लिहिले तर ते आत्मचरित्र नाही का बनणार?
तेच तर.तुझ्या सगळ्या कल्पना दुःखी,अपराधीच का?
आनंद कधी कधी मला वाटते मी तुला पुरेशी ओळखते पण कधीतरी तुझ्या मनातला एक कोपरा माझ्यासाठी अनोळखी आहे असेही वाटते.
ए वेडाबाई तसे काही नाही. आनंदला तूच पुरेपुर ओळखतेस.
हो ना.मग उद्यापासून आनंदी कथा लिहिणे सुरु कर.
बरं.तू म्हणशील तसे
पुढील भागाची लिंक
क्रमशः
मुळकथा कल्पना -विशाल भोवते
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.








पुढच्या भागाची उत्सुकता
अति उत्तम