५-तिची आजी-marathi katha
मी जाईल दादा. तिथे वसतिगृह आहे तिथे राहून शिक्षण घेईल.
जिल्ह्याचे ठिकाण आणि वसतिगृहाचे नाव ऐकून सीताईचे डोळे भरुन आले. तिथे राम गेला आणि परतला नव्हता.तिच्या डोळ्यातील पाणी प्रभाकरच्या नजरेपासून लपले नाही.वातावरण निवळायला तो बोलला,
बरं बरं बघू.वेळ आहे अजून.
प्रभाकर असा बोलला पण त्यालाही आता मनोहरच्या पुढील शिक्षणाची काळजी वाटत होती. एवढ्या लहान वयात,अनोळखी गावात त्याला कसे ठेवायचे ही चिंता मन पोखरत होतीच. वसतिगृहाशिवाय काहीही पर्याय समोर दिसत नव्हता.मानोहरच्या जाण्याच्या कल्पनेने त्याच्याही काळजात कालवाकालव व्हायचीच…….पुढे
भाग-५
तिची आजी
बघता बघता मनोहरचे सातवीचे वर्ष संपले. मुळातच हुशार असलेला मनोहर आई आणि दादाच्या कष्टामुळे जास्त अभ्यास करायला लागला. सातवीत चांगल्या गुणांनी पास झाला.
आता आठवीपासून वसतिगृहात राहायला जायचे हे नक्की झाले.सीताईला मनोहरने वसतिगृहात राहूनच शिकावे लागेल हे पटवून दिले. मनोहर गावातील पहिला मुलगा होता जो वसतिगृहात शिकायला चालला होता.
जाण्याचा दिवस उजाडला. सीताईने एका पिशवीत मनोहरचे दोनचार कपडे भरले,थोडे खायचे सामान सोबत दिले.
प्रभाकरने बैलगाडी जुंपली. सोबत श्रावण होताच.श्रावण म्हणजे प्रभाकरची सावलीच जणू. रामच्या वेळेपासून असलेलाहरिदास त्याचा हा मुलगा प्रभाकरच्याच वयाचा.हरिदाससोबत तोही नेहमी घरी यायचा. वडील गेल्यानंतर प्रभाकरला त्याचा खूप आधार वाटायचा.
तीनचार वर्षात श्रीधरलाही वसतिगृहात जावे लागणार होते म्हणून प्रभाकरने त्यालाही सोबत घेतले.
सीताईने भरल्या डोळ्याने मनोहरला निरोप दिला.
आधी दया आणि आता मनोहरने घर सोडले होते.
काही दिवसांनी श्रीधरही जाणार या कल्पनेने तिच्या ह्दयात कालवाकालव झाली. म्हणजे तिला प्रभाकरचीच सोबत कायम राहणार होती.
प्रभाकर,मनोहर,श्रीधर यवतमाळला पोहचले.
प्रभाकर याआधी एकदा येऊन गेला होता. पण मनोहर आणि श्रीधर पहिल्यांदाच आले होते. त्याचे शंभर माणसांचे गाव कुठे आणि हे शहर कुठे. दोघेही भाऊ अचंबित होऊन बघत होते.रस्ते,त्यावरुन धावणारे टांगे…सगळेच त्यांच्यासाठी नवीन होते. तिघेही वसतिगृहात पोहचले. ते एकच वसतिगृह होते तेव्हा तिथे.
मनोहरला वसतिगृह कसेही असले तरी आयुष्याची काही वर्ष विनातक्रार इथे काढायची होती.
रात्र व्हायच्या आत वापस घरी पोहचायचे होते म्हणून प्रभाकर,श्रीधर आणि श्रावण परत फिरले. मनोहर आता तिथे एकटाच होता.त्याचे घर सुटले होते. नवीन अवकाश त्याच्यापुढे उभे होते.
तिघेही घरी परतले. घरात पाऊल टाकल्याबरोबर मनोहरची उणीव जाणवली. सीताईने वसतिगृहाबद्दल माहिती विचारली. तिनेच सगळ्यांना धीर दिला.काळजावर दगड ठेवायची तिला सवय झाली होती.
दयाचे पत्र आले. दुसऱ्या बाळंतपणासाठी ती माहेरी येणार होती. दयाचे माहेरी येणे कमीच होते.तिचे यजमान कडक स्वभावाचे होते. सासुरवाडीच्या लोकांना सतत घालूनपाडून बोलायचे.पण जावई आहेत म्हणून त्यांना कोणी काही म्हणू शकत नव्हते.त्यात दयाचा स्वभाव अतिशांत होता
मनोहरचे खुशालीचे पत्र आले.तो तिथे मन रमवण्याचा प्रयत्न करत होता. एकदोन सवंगडी मिळाल्याचा उल्लेख होता.आई,दादाने काळजी करु नये असे लिहिले होते.शाळेला सुट्ट्या लागल्या कि मी येतोच असे लिहिले होते.
दयाला घ्यायला कोणीतरी या असे तिच्या यजमानाचे पत्र आले. जावई रुसू नये म्हणून घ्यायला जाणे आवश्यक होते.ही जबाबदारी प्रभाकरवरच आली. तो एका चुलत्याला सोबत घेऊन गेला. दया राहायची जबलपूर मध्यप्रदेश मध्ये.
दोघेही रेल्वेने गेले.रेल्वेत बसायची दोघांची पहिलीच वेळ होती. आधी बसने नागपूर तिथून जबलपूर असा प्रवास होता.
प्रभाकर नागपूरला प्रथमच गेला.
अबब!किती मोठे शहर!
डोळे दिपले त्याचे ते शहर बघून. रेल्वे रात्रीची होती.दिवसभर दोघे नागपूर फिरुन रात्री रेल्वेस्टेशनला आले.
संध्याकाळी सात वाजता अंधारात गुडूप होणारे त्याचे गाव आणि रात्रीचे आठ वाजले तरी वीजेवर चालणाऱ्या लाईटींच्या प्रकाशात उजळणारे शहर काही तुलनाच नव्हती.
नाना आपल्या गावी कधी येणार रे अशी लाईट?
आपलं गाव खूप मागे आहे गड्या.खूप वर्ष जावी लागतील.
तेव्हा प्रवासाचे खूप अप्रुप वाटायचे.
जीवन आतासारखे वेगवान नव्हते.एकप्रकारचा निवांतपणा होता. निसर्गाला मान होता. सूर्याबरोबर उठणे आणि सूर्याबरोबर झोपणे हा निसर्गनियम प्राणीपक्ष्यांबरोबार माणसेही पाळायचे.त्यामुळे आपसूक जीवनातही निसर्गाचे रंग मिसळायचे. लोकांना आनंद आपल्या माणसात,आपल्या घरात मिळायचा,आनंद शोधायला बाहेर भटकायची गरज नाही वाटायची.
प्रभाकरचा पहिला रेल्वे प्रवास. रात्री ची वेळ असल्यामुळे त्याला बाहेरचे जास्त काही दिसत नव्हते.पण मजा वाटत होती. पहाटे पहाटे दोघांनाही रेल्वेतून बाहेर बघितले तर पळणारी झाडे दिसू लागली.
प्रभाकरला सगळे नवलच वाटत होते. दोघेही जबलपूरला पोहचले. हेही एक मोठे शहर.पत्ता लिहून असलेली चिठ्ठी त्याने बाहेर काढली. एवढ्या मोठ्या शहरात आता दयाबाईचे घर कसे शोधायचे याच विचारात दोघेही पडले. तेवढ्यात प्रभाकर,प्रभाकर असा लांबूनच दाजीचा आवाज आला. प्रभाकरने मान वळवली.त्याला दाजी येतांना दिसले.
क्रमशः
प्रभाकर बहिणीला भेटायला निघाला.त्याचा रेल्वेतील पहिला प्रवास.काय होते पुढे …वाचत रहा कथामालिका
तिची आजी
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा






खुप छान… सजीव कथानक
पहिला रेल्वे प्रवास, मोठे शहर, सगळेच अप्रूप.
छान कथा
मस्त!
पुढे काय होणार ची आतुरता….