४- तिची आजी

भाग-४
तिची आजी
रामचा हात पकडून आलेल्या सीताईच्या हातून रामचा हात सुटला.पुढे येणाऱ्या संघर्षावर तिला आता एकटीनेच मात करायची होती…..आता पुढे वाचा 
भाग-४
सीताई रामशिवाय एकटी पडली.
तिला माहेरी कोणी नव्हतेच.
बहीण बाजूच्याच गावी असली तरी  कुटुंबाच्या व्यापामुळे भेटी होणे दुरापास्तच.घरी एकटी असली कि राघूमैनाची जोडी बघता बघता रामचे वाक्य आठवायची,
राघूमैनाची जोडी आपल्यासारखीच आहे सीता.
रामचे हे वाक्य आठवले कि तिचे डोळे झरझर झरायचे. तिचा राघू उडून गेला होता.
 घरी शेती भरपूर होतीच. राम आणि सीताईने मेहनतीने  अजून शेती वाढवली होती.शेतीची सगळ्या चुलत भावंडांमध्ये वाटणी झाली.
सीताईचे परिक्षेचे दिवस आता सुरु झाले.
प्रभाकर अजून सहावीतच होता.एकटीने एवढा व्याप कसा सांभाळायचा कि प्रभाकरला हाताशी घ्यायचे -तिला निर्णय घेता येत नव्हता.विठ्ठल आणि  हरिदास मदतीला होते पण घरचे कोणीतरी लक्ष ठेवायला असल्याशिवाय शेती होत नाही.
प्रभाकरच्या मदतीशिवाय शेती,गुरं,ढोरं सांभाळणे अशक्य होते.आणि त्याची मदत घेतली तर त्याचे शिक्षण  पूर्ण  होणे शक्य नव्हते. तिनही मुलांना शिकवायचे हे रामचे स्वप्न अपूर्ण राहणार. प्रभाकरच्या लक्षात आईची होणारी तडफड लक्षात आली. तो म्हणाला,आई मी शेत सांभाळतो.मनोहर आणि श्रीधर शिकतील कि.
प्रभाकरने आईच्या मदतीसाठी शाळा सोडली. पण जन्मभर ही गोष्ट लक्षात ठेवली.
सीताई घरची कामे, शेतीतील कामे,मुलांकडे लक्ष ठेवणे यातच व्यस्त झाली. राम गेल्यावर काही जवळचे नातेवाईक आपले खरे रुप दाखवायला लागले. एवढी शेती सीताईला काय करायची असे त्यांना वाटायचे.शिवाय एकटी बाई,मुले लहान शेती सांभाळू शकणार नाही असे त्यांना वाटायचे.
तिने शेती नातेवाईकांना स्वस्त भावात विकावी अशी त्यांची अपेक्षा.पण रामने मेहनतीने कमावलेली शेती रामच्या मुलांचीच राहणार ही सीताईची जिद्द.
तिची जिद्द नातलगांच्या लक्षात आली आणि त्यांनी  शेतीचा नाद सोडला.
पण तिच्याबाबतीतीत गैरसमज केल्या गेले. 
सीताई लहानपणापासून काटकसरी होती. कुणाकडून काही घ्यायचे नाही आणि कुणाला काही दयायचेही नाही अशा तिच्या स्वभावाचाही नातलगांना त्रास व्हायचा. राम असेपर्यंत तिचा हा स्वभाव लक्षात आला नाही कुणाच्या.
राम जो जे मागेल त्याला ते देणे या स्वभावाचा होता.पण आता त्यांना सीताईला काही मागितले कि मिळणारा नकार पचविणे जड जात होते.
मग काय सीताई म्हणजे महाकंजूष,माणूसकी नसणारी स्त्री असे म्हणायला नातलगांनी कमी केले नाही. नंतर तिचा हाच स्वभाव तिची ओळख बनली. तिच्या नणदा आणि पूर्णा कायम तिला साथ द्यायच्या. पूर्णा आता रोज रात्री सीताईच्या घरी झोपायला यायची. तिच्याकडे बघून  सीताईला स्वतःचे दुःख  कमी वाटायचे. पूर्णा खूप  लहान वयातच विधवा झाली होती.तिला जगण्याचा काहीच आधार नव्हता.सीताईच्या पदरात पाच मुले होती.तिला जगायला मुलांचा भक्कम आधार होता.
पण कशाही पद्धतीने विचार केला तरी रामची आठवण येणे कमी होत नव्हते. 
तिचा बोलका स्वभाव हळूहळू अबोल झाला. वयाच्या तिशीत आलेला एकटेपणा,नातलगांचे कटू अनुभव  आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने ती काहीशी रुक्ष आणि कठोर झाली. 
दिवस कुणासाठी न थांबता भरभर जात होते.
सीताई आपले घर,शेती,मुले यातच गुंग असायची.
अध्येमध्ये नणदा भाभी भाभी करत भेटायला यायच्या. तेवढ्यापुरती दुःखाची देवाणघेवाण व्हायची.
प्रभाकर लहान वयातच अंगावर पडलेल्या जबाबदारीने लवकर मोठा झाला.गीताही सहा वर्षाची झाली.
मनोहर सातवीत  आणि श्रीधर चवथीत गेला.
बाजूच्या गावी सातवीपर्यंतच शाळा होती. सातवीनंतर जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे  शिक्षण घ्यायला जावे लागायचे. मनोहरच्या शिक्षणाचे पुढे काय हा प्रश्न सीताई आणि प्रभाकरपुढे निर्माण झाला.
मनोहर जात्याच शांतवृत्तीचा आणि भावाच्या शब्दात राहणारा होता.दादाला घर सांभाळण्यासाठी शाळा सोडावी लागली हे तो विसरु शकत नव्हता. आईचे कष्ट तो लहानपणापासून बघत होता.
श्रीधरचे तसे नव्हते. एकतर तो खूप लहान असतांना वडील  गेले.तो स्वभावाने खोडकर होता. शाळा,अभ्यास या गोष्टी त्याला नको वाटायच्या. तो लहान असल्यामुळे सीताईच्या जास्त लाडका होता.
प्रभाकरने सीताईला विचारले,
आई मनोहरच्या पुढच्या शिक्षणाचे काय करायचे?
सीताई रामची मुलांना शिकवण्याची इच्छा विसरली नव्हती.
सीताई- तू परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकला नाही.पण मनोहर,श्रीधर आणि  गीताला भरपूर शिकवू. 
मनोहर दोघांचे बोलणे ऐकतच होता.
तो बोलला,हो आई,दादा मी शिकणार.
पण कसे? आपल्या गावातून अजून कोणीही जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला गेले नाही. 
मी जाईल दादा. तिथे वसतिगृह आहे तिथे राहून शिक्षण घेईल.
जिल्ह्याचे ठिकाण आणि वसतिगृहाचे नाव ऐकून सीताईचे डोळे भरुन आले. तिथे राम गेला आणि परतला नव्हता.तिच्या डोळ्यातील पाणी प्रभाकरच्या नजरेपासून लपले नाही.वातावरण निवळायला तो बोलला, 
बरं बरं बघू.वेळ आहे अजून.
प्रभाकर असा बोलला पण त्यालाही आता मनोहरच्या पुढील शिक्षणाची काळजी वाटत होती. एवढ्या लहान वयात,अनोळखी गावात त्याला कसे ठेवायचे ही चिंता मन पोखरत होतीच. वसतिगृहाशिवाय काहीही पर्याय समोर दिसत नव्हता.मानोहरच्या जाण्याच्या कल्पनेने  त्याच्याही काळजात कालवाकालव व्हायचीच.
क्रमशः
Previous link
सीताईला आयुष्यात  किती परीक्षा द्याव्या लागतात…वाचत रहा कथामालिका तिची आजी
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!