Marathi पाऊस कविता
Marathi पाऊस कविता

Marathi पाऊस कविता

Marathi पाऊस कविता

सर्वांना मोहवणारा पाऊस.त्याच्याच ह्या मृदगंधी पाऊस कविता

आसमंत दाटूनआला-पाऊस कविता

भिजण्याच्या क्षणाची आतुरता न्यारी
बरसणा-या धारांची किमया भारी
छत्री उडाली जशी आकाशी
झेपावले तुझ्या बाहुपाशी
निसटत्या स्पर्शाचा क्षण आठवला
आज आसमंत पुन्हा दाटून आला

ओघळणारे टपोरे मोती सजले होते
कुंतल भिजून ओलेचिंब झाले होते
मनाच्या तारुने किनारा सोडला होता
तो शहारलेला क्षण पुन्हा आठवला
आज आसमंत पुन्हा दाटून आला

हातात बोटे तुझी गुंफलेली होती
हृदयात स्पंदने थोडीशी वाढली होती
डोळ्यांचे इशारे मला छेडीत होते
भावनांना हेलकावे देत होते
तो स्वप्नवत क्षण आज आठवला
आज आसमंत पुन्हा दाटून आला

बरसणारा आसमंत, चमकणारी दामिनी
साक्षीला ठेवून दोघांनी आणाभाका
घेतल्या त्याच क्षणी
त्या शपथांचा सुवर्ण दिस आठवला
आज आसमंत पुन्हा दाटून आला

अवेळी बरसणा-या धारा
नखशिखांत भिजवून गेल्या
एकटीला ओलीचिंब करुन गेल्या
आसवांच्या थेंबात न्हावून निघाले
गहिवरलेल्या क्षणांचा वर्षाव झाला
आज आसमंत पुन्हा दाटून आला

शीला रंगारी

 

बरसणारा पाऊस-

 

अखंड जलधारा कोसळत राहाव्यात
तृप्त करून
तप्त तप्त धरित्रीला
झाडांनी सचैल न्हाऊन घ्यावे
पान पान धुऊन घेत
बरसणाऱ्या पावसाने
नदी नाल्यांनी खळखळुन
वाहावे
दुथडी भरून पाण्याने
रोम रोम धरित्रीचा
बहरून यावा
प्रत्येक टपोऱ्या थेंबाने
कुंद होऊन
भरून यावा आसमंत
काळ्याकाळ्या ढगांनी
मनामनांत उमटावी
पावसाची गाणी
हुरहुरत्या आठवांनी
पडणाऱ्या पागोळ्या
आणि अखंड जलधारा
डोळ्यात साठवत
पाहत राहाव्यात विस्मयाने

सौ वीणा विश्वास चव्हाण

हिरवा संसारआला

पाऊस पाऊस
रान सार ओलचिंब
धरतीच्या गर्भामधी                                                                                                                                                                          उभ्या संसाराच कोंब

काळ्या मातीचा सुगंध
पसरला रानोरानी
मिरगाच्या पेरणीन
आनंदला शेतधणी

ओटी बांधली पोटाला
धन पेरीत मातीत
तिफणीच्या चाड्यावर
दान मोत्याचं उधळीत

काळ्या मातीत सांडले
जोंधळ्याचे शुभ्र मोती
बरसल्या अमृतधारा
धन शिवार पिकविती

तिफणीच्या चाड्यामाग
उभा शिवार पेरला
काळ्या मातीच्या पाटीवर
हिरवा संसार कोरला

सौ.राजश्री म. हिमगिरे (विभुते)

सप्त रंगाचे फवारे

नभी बांधिले तोरण
सप्तरंगी इंद्रधनू
कोसळती जलधारा
पारदर्शी वस्त्र विणू…

सप्तवारू उधळले
सुर्य ढगात लपला
पावसाचा एकेक थेंब
मोत्यापरी हा जपला…

वारा घालितसे पिंगा
झाडं आनंदे नाचती
सौदामिनी चमकता
चिंब भिजलिसे माती…

तृप्त झाली वसुंधरा
गंध मातीचा पसरे
गंधी रंगला कृषक
भूक तहान विसरे…

दिन उगवला थोर
नभी वाजती नगारे
थेंब थेंब उधळती
सप्त रंगाचे फवारे…

सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते)
नांदेड

असा पडला पाऊस

असा पडला पाऊस,
रान सार पाणी पाणी
कोंब मातीच्या आडून
झाकी जन्माआधी पापणी..

उरी बाळगून स्वप्न
हिरव्यागार शिवाराचं
बीज पेरलं दोनदा
देणं काढून सावकाराचं…

हरवला किती दिस
नाही भिजलं आंगण
एकाएकी आला दारी
गावा घालीत रिंगण.

आला रहायला घरी
चार दिसाचा पाहुणा
कुठं कुठं ठेवू त्याला
पाणी घरादारात मावना.

आला गावातही पूर
घर सार स्वच्छ केलं
होत नव्हतं शेर पसा
पाण्यासंग वाहून गेलं.

होता शेताचा आधार
पीक घेती जलसमाधी
जीव मातीत कोंडला
स्वप्न फुलवण्या आधी…

डोई सावकाराचा भार
जाई मातीत खचून
उभ्या जगाचा पोशिंदा
गेला मनात उसवून…

✒️सौ राजश्री म. हिमगिरे(विभुते)

मृगनक्षत्र

भेगाळली भूमी
ऊर फाटूनिया
मिरगाची वाट
डोळे लावूनिया…..

झुळूक वाऱ्याची
स्पर्शूनी भूमीस
गुज सांगे कानी
जणू ती मातीस……

धूळपेरणी ही
करुनिया सारी
वाट त्या मृगाची
पाहे शेतकरी…..

गरजत होता
आसमंत सारा
मृगाच्या सरींनी
शहारली धरा……

भिजूनी निघाली
आसुसली रान
हिरवी ही शाल
पांघरली छान……

गीत कोकीळेचे
कुहू कुहू कानी
मृगाची चाहूल
होई हर्ष मनी…..

मृगनक्षत्र हा
देतसे दिलासा
बेधुंद होऊनी
ये रे ये पावसा…..

सौ.पद्मजा जोशी

पाऊस

मन हुळहुळलं नाही
मन हुरहुरलं नाही
पाऊस आला, पडुन गेला
पण ह्यावेळी
तान त्याच्या पडण्याची
हृदयापर्यंत पोहचली नाही
काळ्या ढगांनी खुणावलं नाही
मृदगंधाने मोहरवलं नाही
वाहणाऱ्या गार वाऱ्याची शिरशीरी नसानसांत पोहचली नाही
संवेदना बोथट झाल्या
जाणीवा पुसट झाल्या
अनेक पावसाळे पाहता पाहता
हळवं मन जणु जरठ झालं
जे कधी
पावसाच्या नुसत्या चाहुलीने आनंदुन जायचं
पडणाऱ्या जलधारा डोळ्यांत साठवत
कौतुकाने पाहत राहायचं
पावसात भिजण्यासाठी
आसुसायचं
मृदगंधाने मोहरून जायचं
आता तसं काहीही झालं नाही
नुसत्या कोरड्या डोळ्यांनी
पाऊस बघणं झालं
भावनांचं कोंदट होणं राहुन गेलं
आणि
एक भीती सरसरून गेली,
निसर्गाचं काहिलीसारखं तापणं
त्याचं उमलणं,
त्याचं फुलणं
त्याचं प्रत्येक ऋतुत बदलणं
कदाचित
आता हृदयात कधी झंकारणार नाही
म्हणुन मन खट्टु झालं

सौ वीणा विश्वास चव्हाण

आला पाऊस पाऊस

सर सर झाडावर
बरसती धुंद सरी
जणू थय थय नाचे
मोर आज भुईवरी,,,,

दिसे इंद्रधनू नभी
सप्तरंगी रंगासवे
होई हर्ष अवणीस
गात गीत ओठी नवे,,,

हुंदडती बागडती
पक्षी झाडे वेलीवर
धुंद बेधुंद होऊनि
झेप घेती झाडावर,,,,

आला पाऊस पाऊस
थंडगार हा बोचरा
जाई ग्रीष्माचा उकाडा
ऋतू आला हा हसरा,,,

सौ.पद्मजा जोशी

आले लावण्य भरास

हिरवाईचा ग शालू
सृष्टी नेसुनी नटली
कंच हिरवी पाहता
वसुंधरा ही लाजली,,,

सारी सृष्टी बहरली
फुला फळांची आरास
झाडां वेलींवर जणू
आले लावण्य भरास,,,

पक्षी ही करी गुंजन
लता नि वेलींवरती
दव हे गोजिरवाणे
पाऱ्या सम चकाकती,,,

मन मोहक सौंदर्य
खुणावत असे मना
नाचे मोर अंतरंगी
करी गोड खाणा खुणा,,,

होई प्रसन्न हे मन
पाहता दवबिंदूना
विसरले देहभान
थेंबांस न्याहाळताना,,,,

म्हणूनच गावेसे वाटते,,,

घन ओथंबून   येति
बनात राघू घिरती,
पंखावरती सर ओघळती
झाडांतून झरझरती ,,,,
घन ओथंबून येति,,,,,

अवखळ पाऊस

पावसा मला आवडतं

तुझं अवखळ येणं,

आक्रंदलेल्या मनाला

चिंब भिजवून जाणं…

हरवून जाते मी…..

तू आल्यावर येणाऱ्या

मातीच्या सुगंधात,बहरतं मन,

कितीतरी दिवसाचं कोरडलेलं….

तुझं सतत येणं भावतच हृदयाला..

खिडकीतून डोकावत …

तुझं तुषार रुपात मला स्पर्शून जाणं…

पावसा मला आवडतं

तुझं अवखळ येणं,

अंगणी येतोच जणू तू

अवचित ओली चिंब साद घेऊन…

फुलावसंही वाटतं ,झुलावसही वाटतं

वैतागलेल्या मनाला उभारी देऊन जातं….

पावसा मला आवडतं

तुझं अवखळ येणं….!

मनु अतुल

नाशिक

वळीव

भेगाळलेली जमीन
आटलेले नदी नाले
तापलेले रान अणि
सुकलेली पाने फुले
सर्वांनाच हवा होता
तो पहिला पाऊस…
काल दाटून आले ढग
बरसू लागल्या सरी
पहिला वहिला पाऊस
आली अंगावर शिरशिरी
टळून गेली संध्याकाळ
काजळल्या दिशा चारी
पाणावले डोळे तुझे
आसवे माझ्या दारी
पावसाची ही दोन रूपं
भिजवून गेली तनमन
आणखी होता तिसरा पाऊस
माहित नव्हता त्यांना पण
बाहेर कोसळणारा अणि
डोळ्यांतून पाझरणारा ही फसला
माझ्या मनातला मुका वळीव
कुणालाच नाही दिसला.

सुवर्णा पाटुकले
सातारा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!