Marathi बालपण कविता
Marathi बालपण कविता

Marathi बालपण कविता

खेळायाला वेळ कुणी द्या

Marathi बालपण कविता

बालपणीचा खेळ कुणी द्या
बोलायाला  वेळ कुणी द्या
झोके घेऊन गात सख्यांशी
खेळायाला वेळ कुणी द्या….
वाटत होते तेव्हा मजला
हे छोटे पण नको
आता वाटते लहान व्हावे
हे मोठेपण नको
पुन्हा खेळण्या लपंडाव तो
संसारातून वेळ कुणी द्या
झोके घेऊन गात सख्यांशी
खेळायाला वेळ कुणी द्या….
कधी रुसणे कधी फुगणे व्हावे
कधी व्हावे धडपडणे
कधी हसणे कधी रडणे व्हावे
आणिक थोडे चिडणे
कधी माझे कधी तुझेच चुकले
भांडायाला वेळ कुणी द्या
झोके घेऊन गात सख्यांशी
खेळायाला वेळ कुणी द्या….
सुकले आहे संघर्षाने
चेहर्‍यावरचे फूल
थकले आहे आज चालूनी
उचलेना पाऊल
वाटते शिरावे कुशीत आई च्या
विसाव्यास त्या वेळ कुणी द्या
झोके घेऊन गात सख्यांशी
खेळायाला वेळ कुणी द्या….

सुवर्णा पाटुकले
सातारा

स्वप्नांचा बाजार

रंगवला एकदा मनात
सगळे स्वप्ने मांडत
गेली एका रांगेत
मांडून झाली स्वप्ने रांगेत
अन् रंगले मी स्वप्नात
हे माझे पहिले स्वप्न
घेऊन गेले बालपणात
मिळेल का बालपण
स्वप्नांच्या बाजारात
नाही म्हणून उत्तर आले
गेली मग दुसऱ्या स्वप्नात
यौवनातली स्वप्नेही मिळतील
का बाजारात
होती जेव्हा यौवनात
तेव्हा नाही जगली तू
घर,करियर,मुले
फक्त रमली होतीस संसारात
आता विसर बालपण,
अन् नाही तू यौवनात
तिसरे काही स्वप्न असेल तर
ते माग बाजारात.
मी बसले आठवत
स्वप्न माझे रंगीत
मला बनायचे फुलपाखरुबालपण
आणि संचार करायचा मुक्त
घेऊन फुलांचा सुगंध
करायचे स्वतःला सुगंधीत
इंद्रधनुष्याला स्पर्शन्या
पोहचायचे मला नभात
हे स्वप्न तुझे तू
रंगव फक्त तुझ्या मनात
फुलपाखराचा सुगंध
इंद्रधनुष्याचे रंग
नाही मिळेल
स्वप्नांच्या बाजारात.

 

 

उन्मुक्त बालपण होतं ते

मनमुक्त जगणं होतं ते
निसर्गाच्या सानिध्यातले उन्मुक्त बालपण होतं ते
उनाड वारा पित पित
डोंगर दऱ्यातून
भटकलो होतो
जरी चढताना धाप
लागुन कितीवेळा तरी
थकलो होतो
झाडे वेली पानें फुलें
वाटत होते सगेसोयरे
मनातली गुजं बोलताना त्यांच्याशी
सहज
मोकळे होत होतो
डुंबणं होतं, पोहणं होतं
गावातुन वाहणाऱ्या नदीच्या पाण्यावर अक्ख्या गावाचं
जगणं होतं
काठावर बसुन तिच्या
अनेक वेळा पाहिला होता
सुर्य अस्तास जाताना
आणि दिवसभर गजबजलेली ती
भासली होती शांत, उदास
काठ तिचा रिकामा होताना
दिवस दिवस सतत
कोसळणारा पाऊस पाहिला होता
दुथडी भरून वाहणाऱ्या
नदी नाल्यांचा प्रपात पाहिला होता
भिजुन, थिजुन, मलुल झालेला हिरवा आसमंत,
टपटप करीत वाकलेला
पाहिला होता
गारठलेल्या तनास आणि मनास तेव्हा
पेटलेल्या चुलीची ऊब होती
कुडकुडवणारी थंडी होती
गडद धुक्याची चादर होती
दवाने ओथंबलेल्या
कमरेएवढ्या गवतातुन
भिजत भिजत चालताना
अनेक वाटा रेखाटल्या होत्या
मदमस्त मोगरा होता
आंब्याचा मोहोर होता
कोकिळेचं कुजन होतं
काहीली करणारा ग्रीष्मही एक सोहळा वाटत होता
शाळेतुन घरी सरळ येणं
मुलांसाठीचा नियम नव्हता
आंब्यावर दगड मारत होतो
चिंचा पाडत होतो
करवंदं काढत होतो
बकुळीची फुलें
वेचत घरी येत होतो
कधी घरच्यांना त्यांत
वावगं वाटलं नव्हतं
कारण काळजी करण्यासारखी कारणे
तेव्हा अस्तित्वात नव्हती

सौ वीणा विश्वास चव्हाण

मामाचा गाव

मामाच्या गावाला जाऊ या
रस अन पोळी खाऊ या,,,,,।।1।।

मामाच्या गावची मज्याच न्यारी,
मामा नि मामी ची जोडीच भारी,,,,।।2।।

मामाच्या गावचा खळाळता ओढा,
पटपट चला आता धीर नाही थोडा,,,,,।।3।।

मामीच्या हातची खीर शेवयाची,
मुंबईत शोधून ही नाही भेटावयाची,,,,,,।।4।।

मामाच्या गावी आंब्याच्या वाड्या,
माच लावायला पुरेना की हो माड्या,,,,,।।5।।

मामाच्या गावी होई मन उधाण वाऱ्याचे,
वय विसरूनि जाई खेळांत साऱ्यांचे,,,,,।।6।।

मामाचा गावच आता कुठे हरवून गेला,
नात्या गोत्यातला जिव्हाळा सारा जणू पळवून नेला,,,,।।7।।

मामाचा गाव कधीच हरवाया नको,
जरी आली भाच्यायला जिवलग बायको,,,,।।8।।

मामाची सर कधी यायचीच नाही कुणा,
मामाच्या गावाच्या कधीच विसरू नये खुणा,,,।।9।।

✍️सौ. पद्मजा जोशी
पुसद

 

चिऊ चिऊ

चिऊताई चिऊताई
येना माझ्या घरात
घाबरू नको अशी
हळूच येग दारात,,,,

देते तुला कापूसकाड्या
बांधायला घर तुझे
आन मान नको मानू
घेऊन जा सॉक्स पण माझे,,,

झाडावर बागेतल्या
खोपा बांध छान छोटा
पिल्लांना खेळायला पण
समोर एक ठेव ओटा,,,,

वाटी भरून पिल्लांना
ठेवीन प्यायला पाणी
रोज देईन खायला
त्यांना बाजऱ्याची दानी,,,

पण एक गोष्ट सांगू का
चिऊताई तुला
सोडून दूर जाऊ नको
घरट्यात पिल्लांला,,,

अंधार पडताच जातील
ती घाबरून बिचारी
चिऊताई येणा लवकर
तोवर मी सांभाळेंन घरी,,,

शाळा चिऊ काऊ मनीची

चिऊ साजिरी
काऊ गोजिरी
मनी माऊ ही
बघा लाजरी

येग ये चिऊ
फिरून येऊ
बगिच्या मध्ये
बाजरा खाऊ

गोड ही मनी
फारच गुनी
दूध पिऊन
झोपते रानी

चिऊ काऊचे
मनी माऊचे
त्रिकुट झाले
तिघी जनींचे

दाणे हि खाऊ
दूध हि पिऊ
आपण साऱ्या
सुखात राहू

जमली शाळा
लावूनी फळा
मनिला दिसे
लोण्याचा गोळा

नको अभ्यास
मनीचा ध्यास
चिऊ काऊ ही
उडाल्या खास

✍️ सौ. पद्मजा जोशी

माझी शाळा

 

शाळा ते घर रोज एवढाच प्रवास
त्याच रस्त्यावर होती आशेची आरास
हसत बागडत निघायची स्वारी
जाता-येता करे दंगा-मस्ती भारी

पाठीवरचे दफ्तर स्वप्नांचे होते
शिकून सवरुन सायब बनायचे होते
शाळेचा फळा म्हणजे जगाचा नकाशा
त्यातच माझी दडली होती आशा

शाळेची बाई मला आई वाटायची
कधी मार द्यायची, कधी लाड करायची
गणिताच्या तासाचा भारीच कंटाळा
फाटक सरांचा होता खूपच लळा

शाळेचा माझा भारीच दोस्ताना
देशपांडे सर आठवले लिहिताना
इंग्लीशच्या तासाला पडत होता मार
Times हातात घेतला की आठवतात फार

दिवस सुंदर पाखरासारखे उडून गेले
सोनेरी क्षण ह्दयात कोरुन गेले
स्वप्नात कधी तरी येते शाळा
विचारते विसरलीस का मला बाळा?

शीला रंगारी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!