Marathi Poem-पद्मजा जोशी
Marathi Poem-पद्मजा जोशी

Marathi Poem-पद्मजा जोशी

किती सांगायचंय तुला

Marathi Poem-पद्मजा जोशी

नेत्री दाटलेले अश्रू
ओघळती गालावर
सांग कसा ठेऊ ताबा
दुभंगल्या मनावर

माजे काहूर मनात
भय वाटतसे मला
ओसंडून वाहे मन
कधी कळणार तुला

सख्या केंव्हा तरी घे रे
समजून भावनेला
झाली दाटी आता खूप
सांगू देरे आज मला

गुजगोष्टी कानगोष्टी
किती सांगायचे मला हृदयातला सोड गुंता
भाव माझ्या मनातला

दबलेल्या भावनांना
उंच भरारी घेऊ दे
करू दे वाट अश्रूंना
ओघळूनिया जाऊ दे

सख्या भाव मांडताना
देते तुजसी मी ग्वाही
थकलेल्या भावनांना
सांगायचे आहे काही

संसाराचा गाडा

कधी कधी जीवनात
खेळ नियतीचा चाले
चढ उतार झेलीत
संसाराचा गाडा हाले।।1।।

होई मनाची काहिली
मागे वळून पाहता
झेप घेत स्वप्नांसवे
होई धेयाची पूर्तता ।।2।।

करी संसार नेटाचा
ठेवी मनांत जिव्हाळा
झळ सोसता सोसता
येई सारी अवकळा ।।3।।

दिन रात गाळी अश्रू
काळेभोर माझे डोळे
लाही लाही होती कधी
माझ्या मनाचे उन्हाळे ।।4।।

धीर देत वाटचाल
केली मीच सुखकर
साथ लाभता मनाची
झाले स्वप्न ही साकार ।।5।।

 

माय मराठी मराठी

माय मराठी मराठी माझी
तिचा करू गौरव खास,
गुणगान माझ्या मराठीचे
गात गात करू सेवा रात्रंदिवस….।।1।।

माझ्या मराठीची अवीट गोडी
काना ,मात्रा, उकाराने सजते,
मराठमोळ्या गोड गोजिऱ्या मराठीचा अभिमान आम्हाला वाटते …।।2।।

मराठीची माझ्या सांगू किती महती
बोला कधी काव्यात,कधी गद्यात नसे कुठली तमा,
लावण्या,भारुड,कश्यातही सूर लावूनी
गवळण, पोवाड्यात रमा….।।3।।

नाकात नथ हातात बांगड्या
माझ्या मराठीची तर्हाच न्यारी,
नऊवारी साडीत खुलून दिसते
साजशृंगार करूनी उभी मराठमोळी नारी….।।4।।

करू गौरवाचं आज गाणं
गाऊ मराठी मराठी
खरेच आम्ही भाग्यवान
बोलू मराठी मराठी..।।5।।

 

 

मनभावन अर्पण

मनी साजना ठेवुनी
प्रेम भाव मी जगते
आठवण येता तुझी
तन मनी मोहरते

मनप्रीत ही जाणते
तुज आयुष्य अर्पण
हृदयीचा श्वास माझा
अंतरीचे तू दर्पण

मन माझे ओशाळते
स्पर्श होता सख्या तुझा
दूर तो एकांतवास
जाई हरवुनी माझा

 

पाहते प्रतिबिंब

पाहते प्रतिबिंब
संथ जलात
दंग होऊनि
चंद्रासवे पाण्यात,,,,,,

लेऊनिया पातळ
जरतारीचे
लक्ष वेधती
रुपवती साऱ्यांचे,,,,,

घेउनिया कळशी
आली सुंदरी
विसरूनिया
भाळली चंद्रावरी,,,,,

मनीचे गुज तिच्या
नयनी दिसे
खळी गालात
पाडीत मनी हसे,,,,,

पाहुनी लावन्येस
आज चंद्रहा
जणू लाजला
सांजवेळी तो पहा,,,,

 

माझी सखी

काही वर्षांपूर्वी नाते
जुळूनीया आले सखी
कवी मनाची मी जणू
काव्य गाई सदा मुखी

काव्य हीच माझी प्रिय
जिवलग सखी असे
कवी मज बनविले
जेंव्हा ध्यानी मनी नसे

घेता हातात लेखणी
करी शब्दांची गुंफण
सखी सोबती सदैव
नाचे प्रफुल्लित मन

रोज उजाडे दिवस
नवा सखीसवे छान
पाही वाट आतुरतेने
माझी लेखणी नि पान

होऊ दे भरभराट
तुझ्या नी माझ्या साथीची
राहो सदैव मनात
ओढ काव्य लेखनाची

नाते हे तुझे नी माझे
काव्यातुनी बहरले
साहित्यात रमताना
मीच माझी न उरले

नित्य चारोळ्यांच्या सवे
कवितेने दिली साथ
जीवनात चाले तिचा
घेऊनिया हाती हात

 

अवतरल्या तारका

जणू निळ्या नभातून
खगांसवे जलात उतरल्या
सागरात हुंदडण्या
अप्सराच या अवतरल्या,,,,

हळुवार पावलांनी जल
उडवीत लाटांसवे
सावरती अलगत दोघी
पोशाख रंगीत नवे,,,,

न्याहाळीती आपुल्याच
उमटत्या पाऊलखुणा
धाव घेई हळुवारपणे पुढे
पाठी सोडूनि लाटांना,,,,

आज हर्ष जाहलासे बहू
तारकांच्या अंतर्मना
सख्या साजिऱ्या देखण्या
आज विसरल्या देहभाना,,,

हुंदडती मुक्तपणे जलात
वाटे पाहुनीया हेवा
स्वर्ग सुख हेच समजूनी
लुटती मनसोक्त मेवा,,,

महागाई

कसा जगेलं माणूस
हाती नसताना काम,
महागाई डोईवर
रोज मरे आत्मा राम ।।1।।

कसा हाकलावा गाडा
घरदारं संसाराचा,
नशिबाच्या संगे पुन्हा
कहर हा कोरोनाचा।।2।।

रोज राशनचे भाव
होती डोईजड सारे,
डाळ तांदुळाच्या विना
कुपोषितं बाळं मरे ।।3।।

काय करील माऊली
रोज पीठ मिठाविना,
महागाई संग आला
जीवघेणा हा कोरोना ।।4।।

श्रीमंतांचा चाले गाडा
मजुरांचे होती हाल,
घर संसाराचा गेला
महागाई मुळं ताल।।5।।

नसे कुणालाही पर्वा
बळी राजाची राबत्या,
रोज रोज बळीराजा
माझा करी आत्महत्या।।6।।

पुरे झाली थट्टा आता
महागाई वाढण्याची,
माणुसकी ठेवा जागी
दिशा दावा जगण्याची।।7।।

टीचभर पोटासाठी
कष्ट करितो माणूस,
दिसभर घाम गाळी
एका भाकरीची आस।।8।।

माझिया माहेरा

माझिया माहेराची
सांगू किती महती
फळफुलांच्या बागेत
किलबिल पक्षी गाती….

माझिया माहेरात
वाहे वात्सल्याचा झरा
सांगावा घेऊन दादाचा
प्रेमाने जारे तू पाखरा….

माझिया माहेरा असे
बाबा सवे भाऊ दोन
प्रेमळ लोभस भावजया
वाढवी माहेराची शान…

सासर मिळो कितीही
सुरेख अन श्रीमंत
तिथं भासे सदाकाळ
गोड माहेराची खंत….

येवो वयाची पन्नाशी
अन होवो जेष्ठ नागरिक
तरीही आयुष्यभर येते
माहेराची सय आपसूक…

नसे जगात कुठही
भाऊबहिनी वाणी माया
प्रत्येकीवर राहो देवा
माहेराची हळुवार छाया.

आई वडिलांच्या सवे
असे जीवनाला अर्थ
माहेराविना भासे
सगळं आयुष्य व्यर्थ…

आई बाबांचे जपावे
प्रत्येकीने सासरी संस्कार
माहेराच्या आठवणीत
द्यावा कुटुंबाला आकार…

करावे संस्कृतीचे जतन
घेऊनि माहेराचा वसा
कुशलतेने सासर घरी
उमटवावा संस्कार रुपी ठसा…

सौ.पद्मजा जोशी
पुसद

********************

सखी माझी छत्री

अंग अंग शहारून
टाके झोंबणारा वारा
बरसती सरीं वर सरीं
बेभान हा आसमंत सारा,,,,

ग्रीष्मातली लाही लाही
लोप पावेल धारांसवे
रंगीत छत्र्यासंगे झाले
वर्षाऋतूचे आगमन नवे,,,,

वाट पाहे वर्षाऋतूची
प्रेमी युगुल आतुरतेने
प्रणयात न्हाऊनि गीत
गाऊ छत्रीत जोडीने,,,

सुचे प्रणयगीत पावसात
छत्रीच होईल साक्षीदार
रंगबिरंगी छत्र्याच बनल्या
प्रेमियुगुलांचा आधार,,,

भिजुनी अवनी सारी
दरवळे सुगंध मातीचा
रिमझिम कोसळती धारा
नभि मुक्त संचार मेघांचा,,

नटलेल्या अवनीवरी
मृदुगंध पसरवी शाल
घेऊनि डोईवर छत्री
बांधू स्वप्नातील ताज महाल,,,,

करा योग रहा निरोग

जगुया जीवन
आरोग्य जपून
योग हा करून
निरंतर,,,,,

थोडेसे धावुन
होऊ प्रफुल्लित
सूर्य नमस्कार
घालूनिया,,,,

करू प्राणायाम
ओमकारा सवे
मनशांती मिळे
अंतर्मना,,,,

सकाळी सकाळी
ध्यान योग नित्य
मिळे सुआरोग्य
समस्तांस,,,,

जपूनिया मंत्र
योग अभ्यासाचा
आनंद मिळवा
जीवनात,,,,

एकवीस जून
नव्या उत्साहात
करू हा साजरा
योगादिन,,,,

सख्या तुज

नेत्री दाटलेले अश्रू
ओघळती गालावर
सांग कसा ठेऊ ताबा
दुभंगल्या मनावर ।।1।।

माजे काहूर मनात
भय वाटतसे मला
ओसंडून वाहे मन
कधी कळणार तुला ।।2।।

सख्या केंव्हा तरी घे रे
समजून भावनेला
झाली दाटी आता खूप
सांगू देरे आज मला ।।3।।

गुजगोष्टी कानगोष्टी
किती सांगायचे मला

हृदयातला सोड गुंता
भाव माझ्या मनातला ।।4।।

दबलेल्या भावनांना
उंच भरारी घेऊ दे
करू दे वाट अश्रूंना
ओघळूनिया जाऊ दे ।।5।।

सख्या भाव मांडताना
देते तुजसी मी ग्वाही
थकलेल्या भावनांना
सांगायचे आहे काही ।।6।।

भेटीचे क्षण

ते डोंगर माथ्यावरून ,झाडाझुडुपांमधून पाझरणारे छोटे छोटे झरे…
नागमोडी वाटा काढून पाझरत पाझरत डोंगर उतारावर दिसणारे चकाकणारे जणू खुणावीत आपल्याला बोलावणारे, झुळु झुळु वाहत जाणारे झरे आतुरतेने वाट पाहत कोसळतात,,,

त्या सुंदर अशा वाहणाऱ्या दऱ्याखोऱ्यातून धावणाऱ्या
नद्यांसोबत कधी एकदा जाऊन भेटेन याची,,,
एकदा का नदी सोबत मिलन होताच तिच्या मायेच्या धारेत मिसळुन खळाळून वाहताना मन भरून तृप्त होऊन आतुरतेने वाट पाहती त्या अथांग सागराच्या मधोमिलनाची,,,,

दरी खोऱ्या तून, नाद घुमू दे एकच होण्यासाठी

तो संथ असा वाहणारा झरा, होऊनी एकरूप दिसावे,
अथांग अशा गराला येऊन जेंव्हा भेटतो तो क्षण आणि उचंबळून आकाशाकडे उंचच उंच हेलकवणाऱ्या त्या लाटा,,, यांची भेट न भूतो न भविष्य ती,,,,अशी

असे भेटीचे क्षण, जणू

हा सागरी किनारा
बेधुंद बोचरा वारा,,,,,
झाले नदीनाले एकरूप
आसुसला आसमंत सारा,,,,

होता मिलन सागरात
झाली नदी ही अथांग,
हे अनमोल क्षण भेटीचे
फिटले जणू झरे ओढ्यांचे पांग,,,,,,

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!