नंदाचे नवीनच लग्न झाले होते.काही दिवस सासरी राहून झाल्यावर शहरात राहायला येण्याचे ठरले होते. आई वडिलांनी लग्न खूपच थाटामाटात केले होते नंदा त्यांची लाडाची मुलगी होती. खेड्यामध्ये लवकरच लग्नाची घाई करतात .नंदाच्या बाबतीत पण तेच घडले.लग्नाकरीता मुले बघायला सुरूवात झाली.इतक्यात लग्न करायचे नंदाला आवडले नव्हते.तिचे आईजवळ सारखे सुरू राहायचे
” आई मला अजून शिकायचे आहे , नौकरी करायची आहे.स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे.लग्न तर करायचे आहेच न ”
पण तिचे कोण ऐकणार ?
नंदाच्या आईने वडिलांना सांगून बघितले पण काहीच फायदा झाला नाही उलट तिला काय कळत,मुलींच लग्न लवकर झालेल बर राहत.आपली जबाबदारी कमी होऊन जाईल.वय वाढले की चांगले मुले मिळत नाही.
आई काय बोलणार ? चूप राहण्यापलिकडे काही दुसरा पर्याय नव्हता.मुले बघायला सुरूवात झाली होती. नंदाच्या आवडीशी कोणाला काही घेणेदेणे नव्हते वडिलांना जो मुलगा आवडेल त्याच्याशी लग्न करून मोकळे व्हायचे , आणि प्रत्येक आई..वडील मुलांच हितच बघणार .नंदाचे वडीलपण हेच बघत होते नंदाला साजेसा…निर्व्यसनी मुलगा हवा होता.आपल्या नंदाला सुखात ठेवणारा , तिची काळजी घेणारा , श्रीमंत नसेल ते चालून जाईल फक्त आपल्या नंदावर त्याने भरपूर प्रेम करावे एवढेच त्यांना वाटायचे.
नंदाला पाहुणे बघायला सुरू झाले. तिला कुणीही नापसंत करण्याचा प्रश्नच नव्हता मुळातच दिसायला सुंदर होती स्वभाव सालस..मनमिळावू होता.कायम आंनदी राहायची.मैञिणी भरपूर होत्या.गप्पा सतत सुरू राहायच्या.हसणे , खेळणे सुरू राहायचे.अशातच वडिलांना विनोद जावई म्हणून पंसत आला.शहरामध्ये नोकरी करायचा .वडिलांनी कसून चौकशी केली.कसलेही व्यसन नव्हते त्याला .सरळमार्गी होता नौकरी आणि घर एवढेच त्याला माहिती होते सर्वांना तो पसंत आला.नंदाही खूष होती.फोन वर जास्त बोलणे नाही व्हायचे.विनोदनी एकदा ही फोन केला नाही.नंदाला वाटायचे कामामूळे नसेल वेळ मिळत. तिनेच दोन..तीन वेळा फोन केला पण हो…नाही या पलीकडे बोलण्यात त्याला रस नसायचा.
एखाद्याचा स्वभाव असतो अबोल असे तिला वाटायचे.
लग्नानंतर प्रथमच ते शहरात राहायला आले.विनोदनी आजीला सोबत आणले होते.नंदाचा संसार सुरू झाला होता.नवीन लग्न असूनही संसारात हौस…मौज असे काहीच नव्हते. नंदाची घालमेल सुरू राहायची , तिला बडबड करण्याची सवय होती पण विनोदला अजिबात जास्त बोलण्याची आवड नव्हती.मागे लागून सुद्धा तिला फोन मिळाला नव्हता .तिने तिच्या बडबड्या स्वभावावर बराच आवर घातला होता .शेजारी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे पण आधी आजीच समोर येत होती .नंदा दुरूनच बघत राहायची .
एक दिवस अचानक नंदाला खूप ताप आला.विनोद आॕफिस मध्ये होता.ती आजीला घेऊन दवाखान्यात निघाली ती नवीनच असल्याने पाहिजे अशी तिला माहिती नव्हती.आजीच सारखे सुरू होते
” नंदा डाॕक्टर परिस डाॕक्टरबाईकड चल बापा.बाईमाणूस असल कि बर रायते ”
नंदाला काहीच कळले नाही.शेवटी डाँक्टरला तब्येत दाखवून घरी आल्या.विनोद घरी वाट बघत होता.खूपच रागात बसलेला होता.आल्यानंतर तिच्यावर ओरडायला लागला.तिला तर काही कळतच नव्हते .
” तू लेडिज डाॕक्टर सोडून जेन्टस डाॕक्टरकडे जाण्याची हिंमत कशी केली.”
नंदा तर अंचबित होऊन बघत होती
” अहो पण हा काय गुन्हा आहे का?डाॕक्टर कुणीही असो गुण महत्त्वाचा ”
” एक शब्दही बोलू नको.या घरात मी जे ठरविल तेच होईल या नंतर तू माझ्यासोबतच कुठे पण जायचे
कोणासोबत गेलेले मला खपणार नाही”.
नंदाला त्याच्या स्वभावाची कल्पना होती पण एवढे भयानक रूप प्रथमच बघत होती.
” अहो पण हे सर्व कशासाठी ? मला व्यसनी नवरा नको होता पण तुमचा हा संशयी स्वभाव कधी ओळखताच आला नाही.आणि तुम्ही तर माझ्या चारित्र्याची कसून चौकशी केली होती.वरची व्यसने ओळखू येतात पण आतील संशय…नाही ओळखू आला.खरे म्हणजे तुमचे मनच बीमार आहे या बीमारीचा कुठेच इलाज नाही
मी तुमच्या मनासारखी वागते माझ्या सर्व इच्छा अपेक्षा मी केव्हाच मारून टाकल्या .कोणाशी बोलायचे नाही..हसायचे नाही चोवीस तास घरामध्ये पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखे फडफड करत राहायचे अजून कसे वागायचे ते तरी सांगा? तुम्ही आखून दिलेली लक्ष्मणरेखा मी कधीही ओलांडली नाही.
नंदा खूप रडत होती.आताच माहेरी निघून जावे आणि कायमची या पिंजऱ्यातून सुटका करावी.मुक्त व्हावे या बेडगी…दिखाऊ संसारातून असे तिला वाटत होते.पण आपल्या आईला ..वडिलांना काय वाटेल त्यात ती आई पण होणार होती.समोरचे प्रश्न डोळ्यासमोर दिसत होते.मुलांना आई वडिल दोघेही हवे असतात.त्यांच्या भविष्याच काय?मुले झाल्यावर कदाचित विनोदचा स्वभाव थोडा तरी बदलेल अशी आशा नंदाला वाटायची
नंदाचा कोंडमारा सुरू होता.काही दिवसांनी तिला छान गोंडस मुलगी झाली.पण परिस्थितीत काही बदल झाला नाही.सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच सुरू होत्या.घरात बाळ आल्यावर काहीतरी बदल होईल ही आशा धूळीस मिळाली होती.नंदा आता अबोल झाली होती.एखाद्यावेळी फाटकाच्या आत दिसायची.काही दिवसांनी आजी गेली.
विनोदचे आॕफिस दिवसभर असायचे.नंदा घरी एकटीच असायची पण आता तिलाच कोणाशी बोलायची इच्छा होत नव्हती .तिचे मन मरून गेले होते.तिच्या आयुष्यातील आंनद , सुख केव्हाच हरपले होते .विनोदच्या संशयी स्वभावाचे नंदा उध्वस्त झाली होती.तिचे सारे स्वप्न संशयाच्या धूक्यात नाहीसे झाले होते .
हास्याचा धबधबा असणारी नंदा हसणे गमावून बसली होती.या सर्व गोष्टीचे रूपांतर कधी मानसिक आजारात झाले हे तिलाही कळले नाही .इतकी सुंदर , सालस , हुशार , हसरी नंदा आता एक मानसिक रूग्ण झाली होती.
अचानक घरातून निघून जायची .
नंदाला दवाखान्यात दाखविले औषध देण्यात आली पण तिच्यात काहीच बदल झाला नाही.
तिला खरच औषधाची गरज होती का? तिला फक्त सुखी संसार पाहिजे होता. हसरा नवरा , हसरे घर तिला हवे होते बाकी तिला काहीच नको होते.तिच्या अपेक्षा तरी काय होत्या ?
तिला फक्त आंनद हवा होता औषध सुरूच होती पण वेळ निघून गेली होती .आणि एक दिवस नंदाने आपले आयुष्य संपविले..आत्महत्या केली .दुःख
वेदना , छळ ..या सर्व गोष्टीतुन मुक्त झाली .
खरच का ती आत्महत्या होती ? की ठरवून केलेला खून .
हो..खूनच होता तो…पण कसा सिद्ध करणार .
तिच्या भावनांचा खून ….तिच्या सुंदर निरागस स्वभावाचा खून.खूप काही अव्यक्त भावना सोबतीला घेऊन कायमची नंदा निघून गेली. पिंजऱ्यातील पक्षी तरी आवाज करतात , कधीकधी तर खूपच गोंगाट करतात.
त्यांना तेवढी तरी मुभा असते.पण नंदाला ती मुभा पण नाही मिळाली.मिळाले तर काय …..फक्त पिंजरा
इतकेच मला जातांना
सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते.









छान लघुकथा
किती दुःख नंदाच्या आयुष्यात.
छान रेखाटली तिची व्यक्तीरेखा
मस्त लिहिलं