दोन घरे…..दोन आयुष्ये-मराठीकथा
अंजली पहाटेच उठली.उठली कसली झोपलीच नाही
वंढा गिळला.हुंदका आवरला,डोळ्यातून गळू पाहणाऱ्या आसवांना थांबविले.
आज शेवटची तारीख होती…दोघांमधील बेबनाव कायमचा संपणार होता. आणि दोघांमध्ये असणारे बंधही.
वेळ पाळण्यात वक्तशीर असणारी अंजली आज मात्र उशीर व्हावा अशी प्रार्थना करीत होती. …वेळ पाळण्यावरुनही किती भांडणे व्हायचे साकेतसोबत…
त्याचे आपले नेहमीचेच
अंजली किती घाई असते ग तुला…जरा म्हणून निवांतपणा नाही…..प्रत्येक गोष्ट वेळेवर हवी तुला.
आणि ती-
साकेत अरे,एखादे काम तरी वेळेवर करत जा रे.
कधीही तू वेळ पाळत नाही.कायम उशीरच करत असतोस.
विचारांच्या तंद्रीतच अंजली कोर्टात पोहचली.
तिला आठवले,
तीन वर्षापूर्वी इथे आले होते मी साकेतसोबत. जोडीने.त्याचा हात हातात पकडून. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता एकमेकांशी लग्न केले होते. इथेच.
साकेत आज तिच्या आधीच उभा होता कोर्टात…
कधीही वेळ न पाळणारा साकेत आज मात्र वेळेआधी हजर…..अंजलीला आता मात्र आसवे थोपवणे जड गेले…..
एकदा…एकदा तरी साकेतचा हात हातात घ्यावा…ही भावना स्पर्शून गेली मनाला……
का?कशासाठी हे सगळे?
अजून जरा तडजोड करता आली असती का?
हो नक्कीच ….विचारांचे आवर्तने सुरु
झाले…. काही आठवणी आठवल्या…
लग्नाआधी स्वयंपाकाची आवड नसणारी मी साकेत खवय्या आहे म्हणून कितीतरी पदार्थ उत्तम बनवायला शिकली. तोही माझ्यामुळे बऱ्याच गोष्टी करायला शिकला.मला पसारा आवडत नाही म्हणून जागच्याजागी वस्तु ठेवायला लागला.
माझ्या आवडी तो आणि त्याच्या आवडी मी जपायला लागले.
म्हणजे तडजोड तर दोघेही करत होतो.पण तरीही असे का झाले?
लग्नानंतरचे मोरपंखी दिवस अत्तरासारखे उडून गेले.मीच कमी पडले असेल का कुठे ?
ते दिवस मी कसे हरवू दिले?
का उडू दिले मी ते दिवस?
साकेत आणि माझ्या पहिल्या भेटीची आठवण असलेले निळे मोरपीस नाही जपता आले मला.
साकेतचा संशयी स्वभाव .
नाही सहन करु शकले मी त्याने माझ्यावर केलेले आरोप. एकमेकांवर प्रेम असूनही विश्वासाच्या अभावाने नाते विस्कटून टाकले आमचे.
त्याच्या आरोपांमुळे हतबल झालेली मी माझी बाजू मांडायला कमी पडली.
मुळात साकेतने माझ्यावर संशय घ्यावा हेच धक्कादायक होते माझ्यासाठी. आणि त्याचा त्याला पश्चाताप न होणे हे त्याहून भयंकर. पण मी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करु शकले असते.
माझा स्वाभिमान आड आला असेल का?
आता संपले ते सगळे. हातातून निसटल्या सर्व गोष्टी. एकमेकांवरचे प्रेम,सहवासात अनुभवलेले क्षण…सगळेच संपले.
मॕडम….वकिलाच्या हाके सरशी आठवणींची श्रृंखला तुटली….
हो..आला का आपला नंबर?तिने साकेतकडे बघून विचारले….
नाही नाही .माझा नंबर..
आता आपले असे काही उरले नाही. …
दोघेही आपापल्या वकिलांबरोबर आत गेले…
divorce पेपरवर सह्या केल्या. डोळ्यातील आसवांमुळे सगळे धूसर दिसत होते.
एका सहीने दोघांचेही आयुष्य एकमेकांपासून विलग झाले.
तीन वर्षापूर्वी इथे आले होते मी साकेतसोबत. जोडीने.त्याचा हात हातात पकडून. घरच्यांचा विरोध न जुमानता एकमेकांशी लग्न केले होते इथेच.
याच कोर्टात त्यांचे आयुष्य एकमेकांच्या आयुष्याशी जुळले होते आणि आज याच कोर्टाद्वारे ते एकमेकांपासून विलग झाले होते.
वास्तू तीच.
प्रसंग बदलले कि वास्तूचे संदर्भही बदलतात.
आता दोघांच्या दोन वाटा….दोन घरे…..दोन आयुष्ये…..






एका कागदाने तुटण्यासारखे नाजूक नसावे सहजीवन.
उत्तम रचना लघु कथेची
Chan lihile