आपल्यासारखं कष्टप्रद खडतर आयुष्य मुलींच्या वाट्याला येऊ नये ‘ तिने दत्तप्रभूला मनातून हात जोडले.
स्वयंसिद्धा भाग ७
कोण होतीस तु
औरंगाबादला एकदा सुप्रियाला तिची शाळेतली जुनी मैत्रीण अचानक भेटली, निशा .
लग्नानंतर पहिल्यांदाच दोघींची भेट झाली होती. तिला सुप्रियाला बघून खूप आश्चर्य वाटले. शाळा कॉलेजमधली सुप्रिया तिच्या मते हरवली होती.
वागण्यातला बिनधास्तपणा, कामातली चपळाई, उदयोन्मुख कवियित्री नव्हती तिच्यात.
चेहरा पार कोमेजून गेला होता. शरीर कृश झाले होते, निस्तेज झाली होती सुप्रिया.
‘ खरंच माणूस संसार सागरात एवढा बदलतो’?
निशाला आधीची सुप्रिया माहिती होती . घरची परिस्थिती बेताची, तशातच एमए पर्यंतच शिक्षण घेतलं. कथा ,कविता, ललित लेख कितीतरी साहित्य लेखनात तिला पारितोषिक मिळाली होती.
पूर्वीची ती लेखणी आज सुप्रियाने का थांबवली असेल ? तिच्यासारखी निडर, वडिलांचा मुलगा होऊन सर्व कामे करणारी, इतकी मनाने शरीराने तकलादु व्हावी ?
इतका बदल कसा झाला असेल सुप्रियात ?
निशा स्वतःलाच अनेक प्रश्न विचारत होती. सुप्रियाला विचारावे की नाही या पेचात तिचा हात गळ्यातल्या मंगळसूत्रावर थांबला.
ही काळ्या मण्याची बंधने तर नसतील ना ?
एकदमच तिला विचारण्याची निशात हिम्मत होईना आणि विचारल्याशिवाय चैनही पडेना.
पूर्वी चार माणसात सहज मिसळणारी सुप्रिया आज स्वतःला अलिप्त ठेवत होती . निशाला तिच्या बोलण्यातून हळूहळू सगळं लक्षात येत होतं. कुठल्यातरी मानसिक दडपणाखाली कुढत असल्यासारखी वाटत होती.
तिच्यात कोणताच पूर्वीचा स्वैरपणा राहिला नव्हता.
काय असेल या पाठीमागचं कारण ? सासरची मंडळी? जवळची मैत्रीण म्हणून तिच्या आयुष्यातील घटना, तिचे नातेवाईक शिवाय सासरकडचे थोडेफार ओळखीचे होते.
पूर्वी ती जे लिहायची ते प्रसिद्धीसाठी नव्हे तर तिला मानसिक समाधान मिळायचे म्हणून . सुप्रियाचे सगळेच मित्र-मैत्रिणी प्राध्यापक तिचं साहित्य आवडीने वाचत प्रोत्साहन देत.
पण सासरी सुप्रियाचे साहित्य वाचण्यात निरुत्साही होते. बाकी सोडा पण माधव कडूनही तिला कधी प्रशंसा मिळाली नाही. त्याला कधी वेळच काढता आला नाही सुप्रियाच्या कथा कविता वाचायला मग प्रोत्साहन तर दूरच राहिलं.
जो तिचा सर्वस्व आहे , त्याच्याकडे बघितल्यावर काही रोमांचक लिहायला सुचावे तोच तिच्या लेखनाची किंमत करीत नसे.
फोनवर बोलताना सहज सुप्रिया निशाला बोलली होती, हे आज तिला आठवलं. पण बाकी तो खूप प्रेमळ आणि काळजी घेणार आहे हेही सांगितलं होतं .
अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळतं.
न राहून निशाने सुप्रियाला खूप सल्ले दिले, चांगलंच सुनावलं. ‘ पूर्वीचे आपले दिवस किती छान होते ना , लग्नानंतर तू अशी होशील वाटलं नाही. ऑफ पिरेडमध्ये तुझ्या घरी खाल्लेली गोड चटणी भाकरी आठवते . आपल्या कॉलेज कट्ट्यावरच्या गप्पा , सतत फिरणारे पाय, काकूंचे त्यासाठी रागावणे आणि त्यातून मिळणारा आनंद सुद्धा आठवतो ‘
निशाचा हात पुन्हा गळ्यातल्या काळ्या मण्यांवर पडला आणि तिचे विचार थांबले .
अरे! हे काय? ती तर सुप्रियाला सल्ला , धीर देत होती .
खरंच या काळ्या मण्यात एवढे सामर्थ्य असतं का ?
कधी जीवन घडवण्याचं आणि कधी बेरीज होऊनही वजाबाकीत मोडण्याचं.
पण ही गोष्ट त्या काळ्या मण्याची पोत बांधणाऱ्या नवऱ्याने का लक्षात घेऊ नये ?
सुप्रियासारखी धाडसी, स्त्रीमुक्तीच्या लढ्यात भाग घेणाऱ्या मुलीची अशी अवस्था ? एवढा बदल ?
निशाचा विश्वास बसत नव्हता. पण हेच खरं होतं.
‘ सुप्रिया तुला आठवते आपले मुथा सर तुला म्हणायचे तु ज्या घरची सून होशील त्या घरचे लोक खूप नशीबवान असतील ‘ पूर्वी कॉलेजच्या भांडणात सुद्धा सर्वांच्या पुढे असणारी सुप्रिया आज तिच्या कलेसाठी छंदासाठी बोलू शकत नव्हती.
सुप्रिया तुझ्या चार ऐवजी बारा बांगड्या वाढल्या, गृहिणी झाली की मुक्तपणे जीवन जगायचे सुद्धा विसरून गेली असे का व्हावे ?
कशाला महिला दिन साजरा करायचा.
नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत .
सुप्रिया सुन्न…. स्तब्ध….. निस्तेज…….
….. मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
⚘👌🏻mast