फुलवालीकडून संदीपने मानिनीचा पत्ता घेतला पण जावे कि नाही या विचारात त्याने दोन तीन दिवस घालवले.
शेवटी चवथ्या दिवशी मनाचा हिय्या करुन संदीपने तिच्या घरी जाण्याचे ठरविले.
आज आॕफिसमधून रजा घेतली त्याने.ठेवणीतले शर्ट,पँट घातले.
मानिनीला काॕलेजमध्ये असतांना आवडणाऱ्या परफ्युमचा स्प्रे मारला.
एवढ्या श्रीमंत घरी जायचे म्हणजे व्यवस्थितच जायला हवे.
अन् त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्याच्या मानिनीला भेटायला जात होता तो.
ह्दयात दडलेल्या तिच्या आठवणी सुगंधित झाल्या ती माळत असलेल्या फुलांच्या गजऱ्यासारख्या.
तब्बल सहा वर्षांनी ते दोघे भेटणार होते एकमेकांना.
पत्ता घेऊन संदीप पुढे जात राहिला.
मध्ये फुलवालीचे दुकान लागले.
मानिनीसाठी तिला आवडणारा मोगऱ्याचा गजरा घ्यावा असाही विचार आला त्याच्या मनात संदिपने पण मनाला आवर घातला.
हे काय? हा तर झोपडपट्टीचा रस्ता.
संदीपने विचार केला, झोपडपट्टी संपल्यावर दिसेल मानिनीचा मोठा बंगला.
तो चालत राहिला.
त्याच्याजवळचा पत्ता त्याला सुलभ शौचालयाच्या जवळ घेऊन गेला.
आजूबाजूने सगळ्या झोपड्याच होत्या.दूरवर एकही बंगला दिसत नव्हता.
तो पत्ता हातात घेऊन तसाच उभा राहला विमनस्क अवस्थेत बंगला शोधत.
बाजूने एक माणूस चालला होता.त्याला त्याने विचारले.
मानिनी देशमूख इकडेच राहतात का?
त्याने बाजूच्या झोपडीकडे बोट दाखवले.
संदीपचे उरलेसुरले अवसान गळाले.
कसे शक्य आहे हे?
रोज फुलांच्या सुगंधाने दरवळणारी मानिनी शौचालयाच्या बाजूने राहते?
ह्या विचारातच तो झोपडीपर्यत पोहचला.
एक चुणचुणीत पाच वर्षाचा मुलगा अंगणात खेळत होता.
संदीपने मानिनी आहे का?
विचारले
तो घाईघाईने आई आई करत झोपडीत शिरला.
अन् मानिनीचा हात पकडून बाहेर आला.
मानिनीने संदीपकडे बघितले.
जागच्या जागी थिजली ती.किती बदलली होती मानिनी.
जुनाट कपडे घातलेली,केसांच्या लांब वेणीऐवजी जूडा बांधलेली ती आधीची वाटलीच नाही त्याला.
इथे यायच्या आधीच्या भावना सगळ्या गळून पडल्या होत्या.
कोण आले?
मानिनीच्या नवऱ्याने आतूनच विचारले.
मानिनीला नवऱ्याच्या आवाजाने भानावर आणले.
संदीपला घेऊन ती आत गेली झोपडीत.
नवऱ्याशी वर्गमित्र आहे असे सांगून संदीपची ओळख करुन दिली.
घराच्या कोपऱ्यात एक पंलग होता.
संदीप त्या दोघांच्या पलंगावर बसू शकला नाही.समोर एक खुर्ची होती.एक आवंढा गिळून तो खुर्चीवर बसला.
मानिनीचा नवरा पलंगावर बसला.
संदीपसमोर नवऱ्यासोबत पलंगावर कसे बसायचे म्हणून मानिनी बाजूलाच झोपडीच्या एका भिंतीला टेकून उभी राहिली.
सर्व जाणून घेण्याची संदीपच्या डोळ्यातील उत्सुकता तिला दिसत होती.
पण ती काय सांगणार नवऱ्यासमोर त्याला?
थोडावेळ बसून संदीप जायला निघाला.
जाता जाता मानिनीच्या मुलाच्या हातात त्याने पाचशेच्या दोन नोटा ठेवल्या.
डोळ्यातील आसवे मानिनीपासून लपवत घाईघाईने झोपडीच्या बाहेर पडला.
शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीने डोके गरगरायला लागले त्याचे.
संदीप गेल्यानंतर मानिनी मट्कन पलंगावर बसली.
काय आणि कसे सांगणार ती संदीपला तिच्या आयुष्याची कथा आणि व्यथा?
मानिनीच्या वडीलांनी श्रीमंत मुलगा बघून तिचे लग्न करुन दिले.
थोड्याच दिवसात श्रीमंत असलेला मुलगा किती कर्जबाजारी आहे हे मानिनीला कळून चूकले.
केवळ पैशांसाठी त्याने मानिनीसोबत लग्न केले होते.
मानिनीसाठी वडील पैसे द्यायला तयार झाले.
पण मानी मानिनीला हे पटले नाही.
संदीपला सोडून केवळ श्रीमंती बघून वडिलांनी लग्न करुन दिले ही सल होतीच.
देशमुखांवर असलेल्या कर्जापायी बंगला,गाडी,शेती सगळेच गेले…..
हे सगळे ती संदीपला कसे आणि का सांगणार?
आता संदीप तिचा कुणीही नव्हता.
डोळ्यात आलेली अश्रू पुसून मानिनी कामाला लागली.
संदीप घरी परतला.
येतांना फुलवालीचे दुकान दिसले त्याला.
नेहमीसारखेच फुलांचे सुंदर गजरे ओवून तयार होते.
मानिनी गजरा हातात घेऊन वापस का करायची याचे उत्तर मिळाले होते त्याला.
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली मानिनी गजऱ्याची,सुगंधाची कितीही आवड असली तरी ते विकत घेऊ शकत नव्हती.
आयुष्य मानिनीला कुठे घेऊन आले होते?
बरे झाले तिच्या मुलाच्या हातात आपण हजार रुपये ठेवले. तिच्या कामी येतील.
या विचाराने थोडे हायसे वाटले त्याला.
दुसऱ्या दिवशी आॕफिसमधून बसने येतांना सिग्नलवर गाडी थांबली.
त्याने खिडकीतून बाहेर बघितले.
मानिनी येतांना दिसली त्याला.
मनात जरा चलबिचल झाली.
मानिनी घाईघाईने बसमध्ये शिरली.
काल संदीपने मुलाच्या हातात ठेवलेल्या दोन्ही नोटा तिने संदीपच्या हातात ठेवल्या.
आणि काहीही न बोलता बसमधून उतरुन निघून गेली.
क्रमशः
पुढील कथा वाचण्यासाठी खालील लिंक बघा
https://marathi.shabdaparna.in/गजरा-भाग-३
प्रिती
Wah!! Khup sundar katha👌👌
सुंदर लिहिले
सुंदर लिहिले
उत्तम , वाचनीय ,दर्जेदार कथा मांडणी ✴️✴️✴️✴️✴️
वाह